Saturday, August 4, 2018

संगीत : सहेला रे...

    लहानपणी शास्त्रीय संगीत शिकत असताना हळुहळू जेव्हा त्याची व्याप्ती लक्षात येऊ लागली, आपण शास्त्रीय संगीत ऐकलं पाहिजे हे जेव्हा कळू लागलं, तेव्हा एकएका स्वररत्नांची नावं कानावर पडू लागली. त्यातलंच एक नाव गानसरस्वती किशोरीताई आमोणकर. ताईंबद्दल ऐकलं होतं. त्यांचं गाणं अद्वितीय आहे, त्यांनी संगीताबद्दल प्रचंड चिंतन मनन केलं हे सगळं माहिती होत होतं. पण त्यावेळी माझ्या बालबुद्धीकडे त्यांच्या विचारांची व्याप्ती काय असेल याची कल्पना करण्याची शक्ती नव्हती.

    २०११ मध्ये 'पु. लं. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी'मध्ये एका कार्यक्रमाच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी गेले होते. पत्रकारीतेमध्ये बरेचदा असं होतं की तुम्हांला फक्त ठिकाण आणि वेळ सांगितली जाते एखाद्या कार्यक्रमाची. तिथे जाऊन आयत्यावेळी विषय पूर्ण कळल्यावर आपल्या बुद्धीच्या जोरावर पत्रकार शेवटी डेस्कला काय कंटेन्ट आणतो, त्यावरून त्याच्या चतुरस्रतेचा अंदाज येतो. अशीच पत्रकारीतेत नुकतीच प्रवेश केलेली मी त्या प्रेस कॉन्फरन्सला गेले होते. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेममुळे बराच वेळ प्रेस कॉन्फरन्स सुरूच होत नव्हती. सगळे पत्रकार ताटकळत थांबले होते. तेवढ्यात एकदम शांतता झाली. मी दाराकडे पाठ करून बसलेले असल्यामुळे कोणीतरी आलं हे कळलं. पण कोण ते कळेना. आणि बघते तर एखाद्या शाईच्या डोहाचा रंग ल्यालेली टेम्पल बॉर्डर आणि डाळींबी रंगाची साडी नेसलेल्या अतिशय देखण्या किशोरीताई आत आल्या आणि स्थानापन्न झाल्या. त्या दिवशी त्यांनी उच्चारलेलं प्रत्येक वाक्य हे खोल डोहाप्रमाणे होतं. डोहाकडे बघत असताना त्यावरचे तरंग पाहून आपल्याला आनंद होतो, पण डोहाच्या खोलाची व्याप्ती लक्षात घेतली तर काहीतरी नवं गवसतं! त्यांचं बोलणं फार आनंददायी होतं, त्यांचे विचार प्रत्यक्ष ऐकता आले मला, तेही पत्रकारितेच्या सुरूवातीलाच, याहून भाग्य ते काय! आज काही वर्षांचा कामाचा अनुभव गाठीशी घेऊन किशोरीताईंचे जेष्ठशिष्य आणि सुप्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर यांचा कार्यक्रम एनसीपीएमध्ये कत्ये. किशोरीताई आणि मोगुबाई कुर्डीकरांनी रचलेल्या बंदिशी ते सादर करतायत. आज डोहाच्या गाभ्याच्या खोलीचा नुसता अंदाज आलाय, गाभा जाणून घेण्यासाठी किशोरीताईंचं अजून बरंच गाणं ऐकाचंय, आत झिरपवायचंय, कायम प्रयत्न सुरू ठेवेन!
सौजन्य : wikimedia commons

Tuesday, July 31, 2018

प्रवास : Ladakh : In love with Ladakh - 5

कृतज्ञतेचं ओझं

    निसर्गाकडून आपण सतत मागत असतो, आपल्याला त्याने सतत खूष ठेवावं अशी अपेक्षा करतो. उन्हाळ्यात तलावातलं पाणी चमचमलं पाहिजे, आपल्या सोयीनुसार पावसाळी पिकनिक ठरली तरी त्यादिवशी पाऊस पडला पाहिजे, शेकोटीची मजा घेता यावी किमान इतकी तरी थंडी पाहिजे, याशिवाय झाडाच्या सावल्यांपासून इंद्रधनुष्यापर्यंत सगळं आपल्याला हवंय. एकदम ideal नैसर्गिक scenario असला पाहिजे आमच्या अवतीभवती. मुंबईत नाही मिळत ना हे सगळं, बाहेर जाऊ, तिथे अनुभवू. लेकीन उसने अपने ख्वाब पुरे करने चाहिये!!

    निसर्ग मनुष्यासारखा नाही! त्याचं मन आभाळाएवढं आहे! तो आपल्याला मुक्त हस्ताने सगळं देतो! आम्ही खारदुंगला पास ला गेलो तेव्हा प्रचंड थंडी होती, तरी snowfall होईलसं वाटलं नव्हतं! पण वा-याबरोबर बर्फाचे कण आमच्या गाडीच्या काचेवर येऊ लागले आणि आमची excitement खारदुंगलापेक्षाही टॉपला गेली! गाडीतून हात बाहेर काढण्याचा मोह कसा आवरेल? माझ्या आयुष्यातला पहिला snowfall ! यासाठी त्याचे आभार कसे मानायचे? किती बदल झाले असतील निसर्गामध्ये एक snowfall घडण्यासाठी! त्याचं आणि आपलं टायमिंग इतकं जुळावं की चोवीस तासांपैकी खारदुंगलाच्या त्या अर्ध्या-पाऊण तासाच्या प्रवासात आपल्याला snowfall अनुभवायला मिळावा ?! शिवाय मेघदूताची आठवण यावी असे ढग, जांभळ्या रंगापासून हिरव्या रंगापर्यंत हरतर्हेचे डोंगर, कापूस पिंजून ठेवावा तसं दाट दाट धुकं होतं ते वेगळंच आणि यात भर म्हणजे हे सगळं अनुभवावं World's Highest Motorable Road वर! काही माणसांचा चांगूलपणा सहन होत नाही ना, तसं काहीसं होतं तिकडे. त्याची कृपा स्विकारण्याचं बळ नसतं आपल्यात, सहन होत नाही ते ! अपराधी वाटतं कुठेतरी खोल, आत. तेव्हा ते खजिलतेचं ओझं वैयक्तिक नसतं, 'मनुष्याने' निसर्गाला गृहित धरल्याचं असतं, लाखो झाडं कापणा-या, शेकडो डोंगर फोडणा-या, समुद्रात भराव टाकणा-या हजारो हातांनी केलेल्या कर्माचं फलित असतं. आपला हात निसर्गाकडून काही ना काही घेण्यासाठी सतत आ वासून तयार असतो! पण मातीत एखाद्या 'बी'ची रूजवण करण्यासाठी पाच बोटं एकत्र येत नाहीत!
    
    लडाखच्या ट्रीपमध्ये त्याने इतकं भरभरून दिलं की निघताना मला रडू आवरलं नाही. ही प्रचिती अनेकांनी घेतलीये. गाडीतून बाहेर बघता बघता, एखाद्या vally मध्ये बसलो असताना, कधीही, कुठेही, पण रडू कशाचं येतं तेच कळत नाही.
परत आलं की मुंबईत ट्रेनमधून प्रवास करताना दोहोबाजूला साचलेले plastic चे डोंगर बघवत नाहीत, खाडीचं गलिच्छ स्वरूप बघून राग येतो माणसांचाच, फुटपाथवरून चालताना हिरव्या जाळीतली छाटलेली खोडं पाहून काळीज पिळवटतं! किती ओरबाडतोय आपण त्याला! किती गुंतलोय आपल्याच व्यापांत, ज्याच्या जीवावर जगतोय, त्याच्यासाठी काय करतो आपण? उत्तर - काहीही नाही.
    
    Contentful माणसांना जगाला काही ओरडून सांगण्याची गरज नसते. त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येकजण काहीना काही शिकतो आपणहून. तो आहे तसाच आहे, न बोलता आपल्या ब-याच जाणिवा जागृत करणारा. तो तसाच आहे, निस्वार्थ वृत्तीने आपली झोळी भरणारा. तो तसाच आहे, आपल्याला सामावून घेणारा! बदलतोय आपण. आपली पात्रता खजिल होण्याचीच आहे! मी तर म्हणेन तिथे जाऊन आलेल्या प्रत्येकाच्या वाट्याला हा अनुभव आला पाहिजे; निसर्गावर प्रेम करणारे लोक वाढण्याची शक्यता आहे!

Thursday, June 21, 2018

प्रवास : Ladakh : In love with Ladakh - 4

'शांती'स्तूप

    'शांतीस्तूप' या नावामुळे माझ्या मनात या वास्तूचं एक विशिष्ट चित्र निर्माण झालं होतं. टूरच्या शेवटच्या २ दिवसांपैकी हे एक ठिकाण असल्याने थकलेल्या शरीराला विरामासाठी आशेचा एक किरण दिसत होता. शिवाय 'लेह'मध्ये पूर्ण २ दिवस मुक्काम असल्याने आमच्या हातात ब-यापैकी वेळ होता. फुरसत के चार पल मनाच्या गाठीशी बांधून 'शांतीस्तूपा'च्या पायथ्याशी उतरलो. 'पायथा' म्हणजे आपल्या रायगड नि कळसुबाईशी तुलना नसावी, पण गिरीभ्रमणाशिवाय अशी बरंच चढूनबिढून जायची सवय आता शहरी माणसांना राहिलेली नाही, म्हणून साधारण कल्पना येण्यासाठी 'पायथा' हा शब्दप्रयोग. असो, तर, गाडीतून उतरून शांतीस्तूपाच्या दिशेने आम्ही जाऊ लागलो. म्हटलं, आता शांतीशी भेट होईल, पुढे होईल, असं जरा उजवीकडे वळलो की होईल, ठिके बाबा, किमान त्या स्तूपाजवळ होईल, छे! पण नाहीच हो ! ती शांती काही शेवटपर्यंत सापडली नाही. उलट बघावं ते नवलच ! त्या शांतिस्तूपावरच घोळका करून २५ एक जणांचं 'थेपलाप्रेमी' कुटुंब त्यांचे #eatinggoals सेट करत होते. एकमेकांना मोठ्याने हाकामारून आरडे ओरडे काय, ग्रुपफोटो काढताना हास्यकल्लोळ काय! शी शी!

    शांतीस्तूपावर कोरलेल्या सगळ्या बुद्धांनी जीवंत होऊन एकेकाच्या चांगली हाणली पाहिजे असं मला जाम वाटत होतं. पण 'बुद्धं शरणं गच्छामि' म्हणत शाब्दिक मार्गाने ते कार्य करायची जबाबदारी मी घेतली. प्रचंड चकचकीत बायका होत्या. कुणाला हितोपदेश करावा, यासाठी प्रचंड चॉईस होता मला. शेवटी काळी ५ च्या निषादाच्या आसपास गेंगाण्या आवाजात कोकलणा-या बाईची निवड मी केली. लालचुटूक टॉप, फोटोशॉपलाही लाजवेल इतकी करेक्ट मॅचिंग लिपस्टिक, टॉकटॉक शूज इत्यादींनी नटलेल्या बाईंना म्हटलं, "आंटी, ये 'शांती'स्तूप है l Atleast यहाँ तो शांती रखो और आपके पूरे family को बोलो l प्लीज, रिक्वेस्ट है l" बाई ओशाळल्या. म्हणाल्या, "सॉरी, सॉरी". हा सामंजस्य करार करून खाली उतरले आणि 'मेडिटेशन सेंटर' होतं तिकडे कुतूहल म्हणून जाऊन बसलो. बसलो आणि मेडिटेशन केलं इतकी वरची पातळी काही आपली नाही, पण किमान जागेचा आणि संकल्पनेचा मान राखून किंवा इतर चार लोक शांत बसल्येत म्हणजे या खोलीत शांत बसणं अपेक्षित असावं, इतकी सामान्य बुद्धीसुद्धा लोकांनी वापरू नये ? खरंच चीड आली मला तिथे. मला असं वाटतं नेहमी की बहुतांश भारतीयांना सोशल एटीकेट्स पाळता येत नाहीत. का कळत नाही लोकांना कुठे कसं वागायचं ? किमान लडाखच्या भागात तरी माझं हे निरीक्षण होतं की तिथे आलेले बरेच परदेशी लोक हे अतिशय अभ्यासपूर्वक, आधी जागेची माहिती घेऊन आलेले होते. फार मनापासून ते माहिती गोळा करत होते, त्या त्या जागेचे नियम पाळत होते. बाहेरची माणसं आपल्याकडे येऊन इतकं शिस्तीने वागू शकतात, आणि आपल्याला 'पिकनिक स्पॉट' आणि 'पर्यटन स्थळ' यात फरक करता येऊ नये ? सतत मनात येत होतं, या परदेशी माणसांच्या मनात कसं चित्र निर्माण होत असेल भारताचं ? ते परत आपल्या देशी जाऊन मित्र-मंडळींना काय सांगत असतील ? बाहेरचे लोक आपल्या बुद्धीची कीव तर करत नसतील ना ? का आपले लोक अशी संधी देतात त्यांना ?

    लोकहो, केवळ लडाखलाच नाही, कुठेही गेलात आणि पर्यटक त्या त्या जागेचा रुतबा समजून वागत नसतील, तर आवर्जून त्यांना तसं वागण्यापासून रोखा. लोक निर्लज्ज असतात, "तुम्हे क्या करना है" वगैरे प्रश्नांना कदाचित तुम्हांला सामोरं जावं लागेल, पण शांततेने शक्य होईल तितक्या माणसांना त्या त्या जागेत नियमाने वागण्यास सांगा. तुमचा फिरण्याचा फार वेळ आणि श्रम यात घालवू नका, पण "हमे क्या करना है" म्हणून पुढेही जाऊ नका. आपण इतर वेळी देशासाठी फार काही करू शकत नाही, ही चांगली संधी आहे!



 







Monday, June 18, 2018

प्रवास : Ladakh : In love with Ladakh - 3

Out of coverage area!

Tour सुरू झाल्यापासून ४ दिवसांनी मिळालेल्या पहिल्यावहिल्या wifi च्या पासवर्डचा फोटो आहे हा! 😁

लडाखमध्ये फोनला रेंज मिळते का? हा बहुतेक जणांचा प्रश्न असतो.
उत्तर - BSNL आणि Airtel च्या postpaid कनेक्शनला काही ठिकाणी रेंज मिळते, बाकी सगळे स्टार्ट टू एन्ड ढगात असतात. त्यामुळे in case of emergency, आपल्या गाईडचा नंबर आप्तेष्ट मंडळींना देऊन ठेवणं सर्वात इष्ट.
खरं सांगू तर मला खूप छान वाटत होतं रेंज नाहीये बघून. माझं Airtel postpaid कनेक्शन आहे. मध्ये मध्ये रेंज मिळत होती. But I didn't care that much. रहावं की थोडं स्वतःसोबत! इथे असतोच आपण सतत दुस-यांच्या बाबतीत अप टू डेट. कोणी काय पोस्ट केलं, माझ्या लेटेस्ट डिपीला किती लाईक मिळाले, व्हॉटस्अपवर किती मेसेज साचले, कोणी 'in relationship with अमूक तमूक' स्टेटस टाकलं, इ. इ. पण अशा रेंज नसलेल्या ठिकाणी जाणं हा चांगला मौका असतो स्वतःची स्वतःशी रिलेशनशीप डेव्हलप करण्याचा. Rather ती होतेच, आपण स्वतःला तेवढी स्पेस दिली तर! हे आजुबाजूचं सौंदर्य बघताना मला कसं वाटतंय, मला आवडतंय का, इथले लोक कसे राहत असतील, आपण आपल्या कुठल्या गरजा कमी करू शकतो? अशा थोड्या स्वतःशी गप्पा झाल्या तर नक्की काहीतरी छान सापडतं आपोआप. काहीतरी शोधण्याचा अट्टाहास नको, पण पुरेसा प्रयत्न मात्र असू दे; की परत आल्यावर असा स्वानुभव लिहीताना जाम भारी वाटतं! Enjoy your own company!
Best wishes!



Saturday, June 16, 2018

प्रवास : Ladakh : In Love with Ladakh - 2

The Pangong Tso!
'Tso' म्हणजे Lake.
पँगाँगचा केवळ २५ ते ३०% भाग भारतात आहे. उरलेला भाग चायनामध्ये आहे. भारतात जो भाग आहे, त्याची लांबी ४० किलोमीटर आहे. म्हणजे एकूण हा लेक किती मोठा असेल याची कल्पना आपण करू शकतो. या लेकचे पाणी खारट आहे. त्यामुळे अन्न शिजवण्यासाठी या पाण्याचा उपयोग तेथिल माणसे करत नाहीत.
हाच लेक जर शहरी भागांत असता तर Lake Rafting किंवा तत्सम काहीतरी व्यावसायिक मार्ग शोधून माणसांनी त्याचा उपयोग करून घेतला असता. पण लडाखी रहिवाशांनी तसं काही केलेलं नाही, पँगाँगचं नैसर्गिक सौंदर्य जपलं आहे. का या माणसांविषयी प्रेम वाटणार नाही सांगा!

Friday, June 15, 2018

प्रवास : Ladakh : In love with Ladakh - 1

लेह-लडाख!
काही जागा अशा असतात की जिथे शहरी माणसांच्या व्याख्येत बसणा-या कम्फर्टेबल सोयी नसल्या तरी तिथे चैन की नींद मात्र लागते. आजुबाजूला निसर्गाचं सौंदर्य अक्षरश: भरभरून दिसत असतं. सुरूवातीचे काही दिवस वगळले की नंतर हळुहळू camera बंद करून ठेवावासा वाटतो. निसर्गापुढे हरल्याचं आणि निसर्गामुळे हरखून गेल्याचं एक वेगळंच समाधान लाभतं. खरं सांगू तर ५००-६०० फोटो काढल्येत. पण सोशल मिडियावर एकही टाकावासा वाटत नाहीये. कारण camera ही त्या सौंदर्याला न्याय देऊ शकलेला नाहीये. असं वाटतं, कशाला देखावा करायचा त्या सौंदर्याचा! किती सामान्य आहोत आपण त्या डोंगरांपुढे, आभाळापुढे, पाण्यापुढे, मातीपुढे, दगडांपुढे! तिथल्या माणसांचा साधेपणा कणभर जरी माझ्यात झिरपला, तर माझं माझ्यावरचं प्रेम वाढेल! ओळख नसतानाही 'जुले' म्हणून निखळपणे हसणारी मंडळी, 'अतिथी देवो भव' म्हणून प्रेमाने जेवू-खावू घालणारी मंडळी, आजुबाजूने वेगवेगळ्या गाड्यांतून पास होत असताना नुसता हात दाखवून 'काही लागलं तर आहे रे मी' असा शब्देविण संवादू करणारी मंडळी ही कुठल्या ग्रहावरची आहेत?! Pangong ची लांबी किती, Nubra Vally ची खोली किती, कुठल्या रूतूत किती तापमान असतं ही सगळी मापं गुगलवर मिळतील, पण इथल्या माणसांच्या मनाचा साधेपणा कसा मोजावा?!
मला वाटतं, जे अजून गेले नाहीत, त्यांनी तरूणपणीच एकदा तरी लेह-लडाखला भेट देऊन याच. 'तरूणपणीच' कारण तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी लागणा-या शारिरीक क्षमतेकडे दुर्लक्ष करता येत नाही. आणि एकदा जाऊन आलात, की मनाचा एक तुकडा तिथल्या एखाद्या डोंगरातच हट्ट धरून बसलेला नाही आढळला तर सांगा!
फोटो नाही टाकत. बाकी कुणाला कुठल्याप्रकारची माहिती हवी असेल, तर जरूर विचारा! शक्य तितकी मदत आनंदाने करेन! 
जुले !