'शांती'स्तूप
'शांतीस्तूप' या नावामुळे माझ्या मनात या वास्तूचं एक विशिष्ट चित्र निर्माण झालं होतं. टूरच्या शेवटच्या २ दिवसांपैकी हे एक ठिकाण असल्याने थकलेल्या शरीराला विरामासाठी आशेचा एक किरण दिसत होता. शिवाय 'लेह'मध्ये पूर्ण २ दिवस मुक्काम असल्याने आमच्या हातात ब-यापैकी वेळ होता. फुरसत के चार पल मनाच्या गाठीशी बांधून 'शांतीस्तूपा'च्या पायथ्याशी उतरलो. 'पायथा' म्हणजे आपल्या रायगड नि कळसुबाईशी तुलना नसावी, पण गिरीभ्रमणाशिवाय अशी बरंच चढूनबिढून जायची सवय आता शहरी माणसांना राहिलेली नाही, म्हणून साधारण कल्पना येण्यासाठी 'पायथा' हा शब्दप्रयोग. असो, तर, गाडीतून उतरून शांतीस्तूपाच्या दिशेने आम्ही जाऊ लागलो. म्हटलं, आता शांतीशी भेट होईल, पुढे होईल, असं जरा उजवीकडे वळलो की होईल, ठिके बाबा, किमान त्या स्तूपाजवळ होईल, छे! पण नाहीच हो ! ती शांती काही शेवटपर्यंत सापडली नाही. उलट बघावं ते नवलच ! त्या शांतिस्तूपावरच घोळका करून २५ एक जणांचं 'थेपलाप्रेमी' कुटुंब त्यांचे
#eatinggoals सेट करत होते. एकमेकांना मोठ्याने हाकामारून आरडे ओरडे काय, ग्रुपफोटो काढताना हास्यकल्लोळ काय! शी शी!
शांतीस्तूपावर कोरलेल्या सगळ्या बुद्धांनी जीवंत होऊन एकेकाच्या चांगली हाणली पाहिजे असं मला जाम वाटत होतं. पण 'बुद्धं शरणं गच्छामि' म्हणत शाब्दिक मार्गाने ते कार्य करायची जबाबदारी मी घेतली. प्रचंड चकचकीत बायका होत्या. कुणाला हितोपदेश करावा, यासाठी प्रचंड चॉईस होता मला. शेवटी काळी ५ च्या निषादाच्या आसपास गेंगाण्या आवाजात कोकलणा-या बाईची निवड मी केली. लालचुटूक टॉप, फोटोशॉपलाही लाजवेल इतकी करेक्ट मॅचिंग लिपस्टिक, टॉकटॉक शूज इत्यादींनी नटलेल्या बाईंना म्हटलं, "आंटी, ये 'शांती'स्तूप है l Atleast यहाँ तो शांती रखो और आपके पूरे family को बोलो l प्लीज, रिक्वेस्ट है l" बाई ओशाळल्या. म्हणाल्या, "सॉरी, सॉरी". हा सामंजस्य करार करून खाली उतरले आणि 'मेडिटेशन सेंटर' होतं तिकडे कुतूहल म्हणून जाऊन बसलो. बसलो आणि मेडिटेशन केलं इतकी वरची पातळी काही आपली नाही, पण किमान जागेचा आणि संकल्पनेचा मान राखून किंवा इतर चार लोक शांत बसल्येत म्हणजे या खोलीत शांत बसणं अपेक्षित असावं, इतकी सामान्य बुद्धीसुद्धा लोकांनी वापरू नये ? खरंच चीड आली मला तिथे. मला असं वाटतं नेहमी की बहुतांश भारतीयांना सोशल एटीकेट्स पाळता येत नाहीत. का कळत नाही लोकांना कुठे कसं वागायचं ? किमान लडाखच्या भागात तरी माझं हे निरीक्षण होतं की तिथे आलेले बरेच परदेशी लोक हे अतिशय अभ्यासपूर्वक, आधी जागेची माहिती घेऊन आलेले होते. फार मनापासून ते माहिती गोळा करत होते, त्या त्या जागेचे नियम पाळत होते. बाहेरची माणसं आपल्याकडे येऊन इतकं शिस्तीने वागू शकतात, आणि आपल्याला 'पिकनिक स्पॉट' आणि 'पर्यटन स्थळ' यात फरक करता येऊ नये ? सतत मनात येत होतं, या परदेशी माणसांच्या मनात कसं चित्र निर्माण होत असेल भारताचं ? ते परत आपल्या देशी जाऊन मित्र-मंडळींना काय सांगत असतील ? बाहेरचे लोक आपल्या बुद्धीची कीव तर करत नसतील ना ? का आपले लोक अशी संधी देतात त्यांना ?
लोकहो, केवळ लडाखलाच नाही, कुठेही गेलात आणि पर्यटक त्या त्या जागेचा रुतबा समजून वागत नसतील, तर आवर्जून त्यांना तसं वागण्यापासून रोखा. लोक निर्लज्ज असतात, "तुम्हे क्या करना है" वगैरे प्रश्नांना कदाचित तुम्हांला सामोरं जावं लागेल, पण शांततेने शक्य होईल तितक्या माणसांना त्या त्या जागेत नियमाने वागण्यास सांगा. तुमचा फिरण्याचा फार वेळ आणि श्रम यात घालवू नका, पण "हमे क्या करना है" म्हणून पुढेही जाऊ नका. आपण इतर वेळी देशासाठी फार काही करू शकत नाही, ही चांगली संधी आहे!
No comments:
Post a Comment