कृतज्ञतेचं ओझं
निसर्गाकडून आपण सतत मागत असतो, आपल्याला त्याने सतत खूष ठेवावं अशी अपेक्षा करतो. उन्हाळ्यात तलावातलं पाणी चमचमलं पाहिजे, आपल्या सोयीनुसार पावसाळी पिकनिक ठरली तरी त्यादिवशी पाऊस पडला पाहिजे, शेकोटीची मजा घेता यावी किमान इतकी तरी थंडी पाहिजे, याशिवाय झाडाच्या सावल्यांपासून इंद्रधनुष्यापर्यंत सगळं आपल्याला हवंय. एकदम ideal नैसर्गिक scenario असला पाहिजे आमच्या अवतीभवती. मुंबईत नाही मिळत ना हे सगळं, बाहेर जाऊ, तिथे अनुभवू. लेकीन उसने अपने ख्वाब पुरे करने चाहिये!!
निसर्ग मनुष्यासारखा नाही! त्याचं मन आभाळाएवढं आहे! तो आपल्याला मुक्त हस्ताने सगळं देतो! आम्ही खारदुंगला पास ला गेलो तेव्हा प्रचंड थंडी होती, तरी snowfall होईलसं वाटलं नव्हतं! पण वा-याबरोबर बर्फाचे कण आमच्या गाडीच्या काचेवर येऊ लागले आणि आमची excitement खारदुंगलापेक्षाही टॉपला गेली! गाडीतून हात बाहेर काढण्याचा मोह कसा आवरेल? माझ्या आयुष्यातला पहिला snowfall ! यासाठी त्याचे आभार कसे मानायचे? किती बदल झाले असतील निसर्गामध्ये एक snowfall घडण्यासाठी! त्याचं आणि आपलं टायमिंग इतकं जुळावं की चोवीस तासांपैकी खारदुंगलाच्या त्या अर्ध्या-पाऊण तासाच्या प्रवासात आपल्याला snowfall अनुभवायला मिळावा ?! शिवाय मेघदूताची आठवण यावी असे ढग, जांभळ्या रंगापासून हिरव्या रंगापर्यंत हरतर्हेचे डोंगर, कापूस पिंजून ठेवावा तसं दाट दाट धुकं होतं ते वेगळंच आणि यात भर म्हणजे हे सगळं अनुभवावं World's Highest Motorable Road वर! काही माणसांचा चांगूलपणा सहन होत नाही ना, तसं काहीसं होतं तिकडे. त्याची कृपा स्विकारण्याचं बळ नसतं आपल्यात, सहन होत नाही ते ! अपराधी वाटतं कुठेतरी खोल, आत. तेव्हा ते खजिलतेचं ओझं वैयक्तिक नसतं, 'मनुष्याने' निसर्गाला गृहित धरल्याचं असतं, लाखो झाडं कापणा-या, शेकडो डोंगर फोडणा-या, समुद्रात भराव टाकणा-या हजारो हातांनी केलेल्या कर्माचं फलित असतं. आपला हात निसर्गाकडून काही ना काही घेण्यासाठी सतत आ वासून तयार असतो! पण मातीत एखाद्या 'बी'ची रूजवण करण्यासाठी पाच बोटं एकत्र येत नाहीत!
लडाखच्या ट्रीपमध्ये त्याने इतकं भरभरून दिलं की निघताना मला रडू आवरलं नाही. ही प्रचिती अनेकांनी घेतलीये. गाडीतून बाहेर बघता बघता, एखाद्या vally मध्ये बसलो असताना, कधीही, कुठेही, पण रडू कशाचं येतं तेच कळत नाही.
परत आलं की मुंबईत ट्रेनमधून प्रवास करताना दोहोबाजूला साचलेले plastic चे डोंगर बघवत नाहीत, खाडीचं गलिच्छ स्वरूप बघून राग येतो माणसांचाच, फुटपाथवरून चालताना हिरव्या जाळीतली छाटलेली खोडं पाहून काळीज पिळवटतं! किती ओरबाडतोय आपण त्याला! किती गुंतलोय आपल्याच व्यापांत, ज्याच्या जीवावर जगतोय, त्याच्यासाठी काय करतो आपण? उत्तर - काहीही नाही.
Contentful माणसांना जगाला काही ओरडून सांगण्याची गरज नसते. त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येकजण काहीना काही शिकतो आपणहून. तो आहे तसाच आहे, न बोलता आपल्या ब-याच जाणिवा जागृत करणारा. तो तसाच आहे, निस्वार्थ वृत्तीने आपली झोळी भरणारा. तो तसाच आहे, आपल्याला सामावून घेणारा! बदलतोय आपण. आपली पात्रता खजिल होण्याचीच आहे! मी तर म्हणेन तिथे जाऊन आलेल्या प्रत्येकाच्या वाट्याला हा अनुभव आला पाहिजे; निसर्गावर प्रेम करणारे लोक वाढण्याची शक्यता आहे!
No comments:
Post a Comment