Thursday, May 6, 2021

इतर : We are a gift to the world!


रोज एक बुलबुल माझ्या खिडकीतून लांबवर दिसणाऱ्या उंचावरच्या एका वायरवर बसलेला असतो. आकाशात बसून कुजन करत मनमुराद आनंद लुटताना त्याला पाहिलं की मलाच काय आनंद होतो! पहिल्या दिवशी दिसला तेव्हा वाटलं, अरे वा! आज सुंदर योग आहे. पण नंतर लक्षात आलं की रोज संध्याकाळी ५ ते ६ च्या दरम्यान तो तिथे येतोच. मला आपला तेवढा निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा दिलासा पुरेसा आहे आनंदून जाण्यासाठी. रोज मी खिडकीत झाडांच्या शेजारी बसून चहा पिते आणि हा आलाय की नाही पाहते. कधी मी आधी येते, कधी तो. इथे आवाजही अगदी स्पष्ट ऐकू येतो. गंमत वाटते. त्याला माहिती नसेल, रोज कोणीतरी त्याच्या 'असण्याचा' आनंद घेत आहे! आपलंही असंच काहीसं असेल ना?! Each one of us is a gift to the world because each one of us is gifted. मग जे काही या जगात घेऊन आलो, ते या जगाला कृतज्ञतापूर्वक परत देणं आपलं कर्तव्य नाही का ?! सध्या दिवस इतके मलूल आहेत की सगळ्या सुख-सोयी आपल्याकडे आहेत; आपल्याला त्याची जाणीवही आहे. पण आजूबाजूची परिस्थिती तरीही कधीतरी मन खिन्न करते. त्याचा परिणाम म्हणून आपल्या मनात विचार येऊ शकतो, माझं काय महत्त्व ?! माझ्या असण्याने, नसण्याने कोणाला काय फरक पडणार आहे ?! किंवा माझी कोणाला काळजी, इत्यादी. पण असं कसं ? आपल्या नकळत आपण कित्येकांना आनंद देत असूच की ! सध्याचा काळ आणि 'मारवा' राग यांच्यात फार साम्य वाटतं मला. 'मारवा' ऐकला आणि तुमच्या मनावर मळभ दाटून आलं नाही, मनात काहूर माजलं नाही, असं फार क्वचित होतं. झालेलं काहीच नसतं. अगदी सुखवस्तू घरात बसून आपण तो राग ऐकत असतो. पण तो त्या रागाचा स्थायीभाव आहे. तसं, सध्याच्या काळात मनावर मळभ दाटणार आहे, हे धरुनच चालू. प्रहर बदलला की राग बदलतो, तसा काळही बदलेल आणि वातावरण प्रसन्न होईल, यात शंका नाही. तेव्हा कोणी 'यमन' गात ते व्यक्त करत असेल तर कोणी 'देस'चा आनंद घेत असेल. पण तोपर्यंत आपल्याला कुठल्या गोष्टी 'gift' म्हणून मिळाल्या आहेत, त्याचा शोध घेऊ आणि आपल्या ओंजळीत मावेल इतका आनंद आणि सकारात्मकता दुसऱ्याच्या ओंजळीत देण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर अवतीभवती असणाऱ्या लहान-लहान पण मन प्रसन्न करणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊ. प्रत्येक दिवस आनंदात घालवायचा प्रयत्न करू आणि जमल्यास आनंदाचा क्षण अनुभवाला देणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आभार मानू. रोज मी त्या लांबवर असणाऱ्या बुलबुलला मनोमन सांगते, की अरे मी पाणी ठेवलंय खिडकीत तुम्हां पक्षांसाठी ! ते प्यायला ये कधीतरी घरी. कधी आलाच, तर थँक्यू म्हणायचंय मला त्याला. बघू कधी भेट होत्ये ! तोपर्यंत इथूनच त्याला अतिशय मनापासून thank you! He is unaware that he is a gift to somebody; just like us!

ता. क. फोटो blurr आहे. Google वर छान फोटोज् मिळाले असते, पण हा तोच बुलबुल आहे, जो मला दिसतो आणि तो special आहे. म्हणून त्याचाच फोटो!

- भक्ती आठवले
०६.०५.२०२१