Wednesday, November 13, 2019

प्रवास : अमृतसर : गोल्डन टेम्पल

    'गोल्डन टेम्पल'बद्दल खूप ऐकलं होतं. 'रंग दे बसंती'मुळे एकंदरीतच पंजाबच्या कल्चरबद्दल थोडं आकर्षण वाढलं होतं. ए. आर. रेहमानच्या 'इक ओंकार सतनाम'मुळे त्यात मोलाची भर पडली होती. सिनेमातल्या गोष्टी शंभर टक्के खऱ्या मानून त्याला भुलून जाणाऱ्यातली मी नाही. पण एखाद्या गोष्टीबद्दल कुतूहल निर्माण झालंच, तर चांगलंच आहे की ! आता गोल्डन टेम्पल प्रत्यक्षात बघता येणार याचा खूप आनंद होता. पण एकीकडे एक भाबडी भीती होती मनात. मला श्रीमंत आणि ग्लॅमरस देवळांत जाण्यात फारसा रस नसतो. म्हणजे कळत्या वयाप्रमाणे तो रस कमी होत गेला. कारण मला अशा देवळांमध्ये कधीच हवं तितका वेळ शांतपणे मनाचं समाधान होईपर्यंत बसता आलेलं नाही. यात मी देवळांना दोष देत नाहीये, मी कुठेतरी कमी पडले असेन. पण थोडक्यात, याआधी तरी माझं आणि अशा देवळांचं हार्ट-टू-हार्ट कनेक्शन काही झालं नव्हतं. त्यामुळे पुन्हा एकदा हाच अनुभव येणार की काय याची थोडी भीती होती. पण गर्दीतल्या शांततेचा अनुभव मी तिथे घेतला. बरं, बसले कुठे होते, तर झाडाखाली. गाभाऱ्यात गेलेच नाही. मी काहीतरी कदाचित मिस केलं असेन, पण मला जी शांतता अपेक्षित होती, ती आजूबाजूला अनेक माणसं असतानाही मिळाली याचा आनंद आहे. कबीर म्हणतातच की, मोको कहाँ ढूंढें बन्दे, मैं तो तेरे पास में । खरंय !