Monday, August 27, 2018

संगीत : ये वो बंधन है जो कभी टूट नही सकता...

    आत्ता नाशिक-मुंबई प्रवास करत्ये. गाणी ऐकता ऐकता 'स्वदेस'मधलं 'ये जो देस है तेरा' गाणं लागलं. माझं फार आवडतं गाणं. आजपर्यंत कितीतरी वेळा ऐकलं. पण गाण्याची ही जादू आहे. ज्यावेळी आपण गाणं ऐकतो, त्यावेळच्या मनातल्या भावनांप्रमाणे ते ते गाणं आपण अनुभवतो. आज रक्षाबंधन. माझ्या भावांना भेटले नाही. खूप मिस करत्ये त्यांना. सगळ्यांचे आपापल्या भावांबरोबरचे फोटो पाहून तर ही भावना शतपटीने दुणावली. मनात हे सगळं उपर-निचे घडत असतानाच, 'ये जो देस है तेरा, स्वदेस है तेरा, ये जो बंधन है वो कभी टूट नहीं सकता!' हे शब्द ऐकत होते. एक विचार आला मनात. वाटलं, देश आपलं रक्षण करतो, आपण या देशाची काळजी घेतो ? त्याच्यावर प्रेम करतो? किती केलं पाहिजे आपण त्याच्यासाठी?

    मला 'रक्षाबंधन' हा सगळ्यांचा सण वाटतो. भाऊ-बहिण हे नातं extra स्पेशल आहेच. पण एकमेकांचं रक्षण करण्याची जबाबदारी, त्यातलं प्रेम हे सगळं भाऊ-बहिण, पुरूष-स्त्री, माणूस-माणूस यांच्या पलिकडे गेलं तर किती छान होईल?! म्हणजे रस्त्यावरच्या कुठल्याही प्राण्यापासून, झाडापासून, पक्ष्यापासून, माणसांपासून ते अगदी वस्तूंपर्यंत. सगळ्यांचं रक्षण करण्याची भावना आपल्यात निर्माण झाली तर किती मजा येईल! आणि रक्षण करण्यासाठी कुठली आपत्ती यायची कशाला वाट बघायला हवीये! रोज एखाद्या रोपाला खत-पाणी घालणं हेही त्याचं रक्षणच आहे की! त्याच्यावरल्या प्रेमापोटी केलेलं ! असं प्रेम निर्माण झालं की किती सोपंय एकमेकांविषयी ही भावना निर्माण होणं! ओघाने आपल्या देशाविषयी! 
Let's respect, love and protect everybody, everything! Happy रक्षाबंधन!


Saturday, August 4, 2018

संगीत : सहेला रे...

    लहानपणी शास्त्रीय संगीत शिकत असताना हळुहळू जेव्हा त्याची व्याप्ती लक्षात येऊ लागली, आपण शास्त्रीय संगीत ऐकलं पाहिजे हे जेव्हा कळू लागलं, तेव्हा एकएका स्वररत्नांची नावं कानावर पडू लागली. त्यातलंच एक नाव गानसरस्वती किशोरीताई आमोणकर. ताईंबद्दल ऐकलं होतं. त्यांचं गाणं अद्वितीय आहे, त्यांनी संगीताबद्दल प्रचंड चिंतन मनन केलं हे सगळं माहिती होत होतं. पण त्यावेळी माझ्या बालबुद्धीकडे त्यांच्या विचारांची व्याप्ती काय असेल याची कल्पना करण्याची शक्ती नव्हती.

    २०११ मध्ये 'पु. लं. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी'मध्ये एका कार्यक्रमाच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी गेले होते. पत्रकारीतेमध्ये बरेचदा असं होतं की तुम्हांला फक्त ठिकाण आणि वेळ सांगितली जाते एखाद्या कार्यक्रमाची. तिथे जाऊन आयत्यावेळी विषय पूर्ण कळल्यावर आपल्या बुद्धीच्या जोरावर पत्रकार शेवटी डेस्कला काय कंटेन्ट आणतो, त्यावरून त्याच्या चतुरस्रतेचा अंदाज येतो. अशीच पत्रकारीतेत नुकतीच प्रवेश केलेली मी त्या प्रेस कॉन्फरन्सला गेले होते. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेममुळे बराच वेळ प्रेस कॉन्फरन्स सुरूच होत नव्हती. सगळे पत्रकार ताटकळत थांबले होते. तेवढ्यात एकदम शांतता झाली. मी दाराकडे पाठ करून बसलेले असल्यामुळे कोणीतरी आलं हे कळलं. पण कोण ते कळेना. आणि बघते तर एखाद्या शाईच्या डोहाचा रंग ल्यालेली टेम्पल बॉर्डर आणि डाळींबी रंगाची साडी नेसलेल्या अतिशय देखण्या किशोरीताई आत आल्या आणि स्थानापन्न झाल्या. त्या दिवशी त्यांनी उच्चारलेलं प्रत्येक वाक्य हे खोल डोहाप्रमाणे होतं. डोहाकडे बघत असताना त्यावरचे तरंग पाहून आपल्याला आनंद होतो, पण डोहाच्या खोलाची व्याप्ती लक्षात घेतली तर काहीतरी नवं गवसतं! त्यांचं बोलणं फार आनंददायी होतं, त्यांचे विचार प्रत्यक्ष ऐकता आले मला, तेही पत्रकारितेच्या सुरूवातीलाच, याहून भाग्य ते काय! आज काही वर्षांचा कामाचा अनुभव गाठीशी घेऊन किशोरीताईंचे जेष्ठशिष्य आणि सुप्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर यांचा कार्यक्रम एनसीपीएमध्ये कत्ये. किशोरीताई आणि मोगुबाई कुर्डीकरांनी रचलेल्या बंदिशी ते सादर करतायत. आज डोहाच्या गाभ्याच्या खोलीचा नुसता अंदाज आलाय, गाभा जाणून घेण्यासाठी किशोरीताईंचं अजून बरंच गाणं ऐकाचंय, आत झिरपवायचंय, कायम प्रयत्न सुरू ठेवेन!
सौजन्य : wikimedia commons