Sunday, July 1, 2012

देवांचेसुद्धा एक एक दिवस असतात...


      status update केली गेली, wall photos टाकले गेले,  mobile uploads झाले, profile pictures बदलली गेली, cover photos दिमाखात झळकले, ring tones खणखणू लागल्या, caller tunes सुद्धा change झाल्या, कार्यक्रमांच्या जाहिराती दिसू लागल्या, photos छापले जाऊ लागले....काय काय म्हणून विचारू नका. सग्गळं अगदी उत्साहात आणि जोरदार चाललेलं.
      
      दुसरा दिवस उजाडला. आणि पुन्हा हेच सगळं झालं - 'status update केली गेली, wall photos टाकले गेले,  mobile uploads झाले, profile pictures बदलली गेली, cover photos दिमाखात झळकले, ring tones खणखणू लागल्या, caller tunes सुद्धा change झाल्या, कार्यक्रमांच्या जाहिराती दिसू लागल्या, photos छापले जाऊ लागले....पण सगळं दुसरंच...वेगळंच ! 'कालच्याचं' कौतुक इतक्यात ओसरलं ? की ते कौतुक नव्हतंच आणि लोकांच्या 'updates च्या वारीत' आपण नसणं हे up to date नसल्याचं लक्षण होतं म्हणून केलं गेलेलं ?? खरंच प्रश्न पडला !
       
       'Glamour' बडी अजब चीज है भैया ! ह्या अशाश्वत जगातल्या क्षणिक गोष्टींपैकी एक गोष्ट ! पण ह्या अशाश्वत गोष्टीत इतकी शक्ती आहे, की तो शाश्वत परमात्मासुद्धा बिचारा ह्यापासून बचावला नाही. हो, कारण हल्ली देवांचा सुद्धा 'Glamour Period' असतो. त्यांच्या त्यांच्या  दिवशी हे सगळे देव, त्यांची त्यांची ठिकाणं, त्यांच्यावर लिहिलेले अभंग, गाणी, कथा इतकंच कशाला; हे सगळं लेखन करणारे संत, कवी सुद्धा प्रसिद्धीच्या झोतात येतात...म्हणजे आपणच आणतो ! एका ठराविक काळात  एखादा देव इतका प्रसिद्ध होतो, इतका 'मोठा' होतो, की बाकीचे ३२ कोटी ९९ लक्ष ९९ हजार ९९९ देव खरोखर त्याचा हेवा करत असतील...किंवा नसतीलही; 'देव जाणे' ! ह्या त्यांच्या त्यांच्या दिवसात त्यांच्यावर सिनेमे निघतात, त्यावर उलट-सुलट चर्चा होतात, परीक्षणं लिहून येतात, अमुक अमुक देवाचा संक्षिप्त आढावा घेणारे लेख छापून येतात, विशेषांक प्रकाशित होतात, एखाद्या देवाचा शोध घेणारी कादंबरी प्रसिद्ध होते, एकाच देवावर असंख्य लहान-मोठे गाण्यांचे कार्यक्रम होतात असं सगळं सुरळीत चालू असतं. 
       
        मी ना एकदा मैत्रिणीच्या गावाला गेलेले. तिने तिथल्या देवळात नेलं. अतिशय शांत, स्वच्छ, छोटंसं देऊळ होतं. आम्ही गेलो तेव्हा कोणीही नव्हतं तिथे. अगदी पुजारीसुद्धा नाही. १० मिनिटं आम्ही दोघी बसलो तिथे, नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली आणि चालू लागलो. पण घरी येताना कितीतरी वेळ मन त्या साध्या देवळातच अडकलं होतं. देवळाच्या दारावर सिक्युरिटी चेकिंग नाही, भक्तांना येण्यासाठी रेड कार्पेट नाही, दाराला कडी-कुलपं नाहीत, देवळाच्या पायऱ्यांवर देणगी देणाऱ्यांची श्रेय नामावली नाही, खांबांवर 'कृपया मूर्तीचे फोटो काढू नयेत' अशा पाट्या रंगवलेल्या नाहीत, काचेची झुंबरं नाहीत की देवळातल्या मूर्तीला हार-तुरे-शाली-फुलं सुद्धा नाहीत ! खरं तर काम-धाम सोडून सारखं 'देव-देव' करत बसणं मला पटत नाही. मनापासून वाटेल तेव्हा देवळात जाऊन त्याला नमस्कार करण्यातलं समाधान मस्टरच्या घाईत घातलेल्या लोटांगणातसुद्धा मिळणार नाही. पण  मला खरंच अगदी मनापासून त्या साध्या देवळातल्या साध्या देवाशी गप्पा माराव्याश्या वाटल्या...होते काही प्रश्न ! दिवस सुद्धा साधाच निवडला. प्रकटदिन नाही की बाकी काहीही नाही ! मैत्रिणीला म्हंटल येते जाऊन देवळात; आवडलं मला देऊळ. देवळात पोहोचले. सुरुवातच केली.
मी - कसा आहेस ??
देव - छान ! मजेत !
मी - मला तुझं देऊळ खूप आवडलं हो, आमच्या शहरात नाही बाबा अशी देवळं बघायला मिळत. 
तो हसलाच आणि म्हणाला, हं...तुला आवडलं ना, येत जा मग इथे येशील तेव्हा !
मी - हो नक्की ! बरं, मला सांग इथे कोणी पुजारी वैगरे नाही का ?? दानपेटी नाही, तुझ्या गळ्यात फुलांच्या माळा सुद्धा नाहीत रे ! का असं ?
पुन्हा हसला आणि म्हणाला, "अगं पुजाऱ्याची गरजच काय ? दिवसाकाठी जी काही दोन-चार माणसं येतात, ती त्यांना वाटलं म्हणून येतात, त्यांना वाटलं म्हणून मनापासून नमस्कार करतात, तुझ्यासारखे काही गप्पा मारायला बसतात; हेच माझे खरे पुजारी आणि त्यांचा मन:पूर्वक नमस्कार; हीच माझी दक्षिणा !
मी - हं ! पण मग तुला कधी असं वाटत नाही का, की मोठमोठ्या शहरातल्या देवांना इतकी प्रसिद्धी मिळते, लोकं भल्यामोठ्या रांगा लावतात, इतकी सुंदर रोषणाई असते, रोज सुंदर सुंदर वस्त्र, अलंकार मिळतात त्यांना ! तुला वाईट नाही वाटत ?
तो हसला आणि म्हणाला, "छे गं ! त्यांना कुठे भक्तांशी निवांत गप्पा मारता येतात ? त्यांना कडीकुलपात बंदिस्त रहावं लागतं आणि मी बघ ! आणि आता विषय निघालाच म्हणून एक खासगीतली गोष्ट सांगतो, परवाच माझं त्यांच्याशी बोलणं झालं. बिचारे फार कंटाळलेले दिसत होते. 'frustrate' का काय झालो म्हणत होते. म्हंटल, "का बाबा ? काय झालं तुम्हाला ?" तर म्हणाले की "ही लोकं आम्हाला काय हवंय विचारतच नाहीत. प्रकटदिन आमचे, उत्सव आमचे करतात  पण ह्यांच्या हरप्रकारच्या हौशी भागवून घेतात. देणग्या गोळा करतात, झगमगाट करतात, जेवणावळी घालतात, मोठमोठ्याने गाणी लावतात...आम्हांला काय हवंय; काय नकोय rather हवंय की नकोय काही विचारात नाहीत ! कसलं ना कसलं 'Celebration' करण्याची  संधी हवी असते त्यांना दुसरं काय ! आणि एवढे देव आहेत, प्रत्येकाला थोड्या थोड्या दिवसांनी glamorous करायचं आणि मग आहेच ! पार कंटाळून गेलोय आम्ही !" 
मी - अरे बापरे ! असं म्हणाले ?? ठीक आहे. चल निघते मी, बरं वाटलं गप्पा मारून ! पुन्हा येईनच ! अच्छा !!
         
         देवळातून बाहेर पडल्यापासून कितीतरी वेळ हाच विचार मनात घोळत  होता. की खरंच; बहुतेक आपण देवांना गृहीत धरतो, आपण  त्यांना 'मोठं' करतो, glamorized करतो, importance देतो....पण  आपल्या सोयीप्रमाणे, आपल्याला हवा तेव्हा, हवं तितकाच काळ !  "celebrities" दर्शन घ्यायला येतात म्हणून  ज्या देवळात एका ठराविक वारी भक्तांची गर्दी होत असेल, तिथे 'गाभाऱ्यात बसलेल्याला' काय वाटत असेल ? ठराविक दिवशी "गुगलने" सुचवलेल्या पहिल्या काही ऑप्शन्समध्ये सुद्धा ज्याचं दर्शन मिळतं, 'त्याला' नंतर काय वाटत असेल ? सोन्याची सिंहासनं, दागिने मिळाल्यानंतर देऊळ बंद असण्याच्या वेळेतही गाभाऱ्याच्या चार कोपऱ्यातून उंचावरून एकटक पाहत असणाऱ्या कॅमेऱ्यांचा 'त्याला' किती राग येत असेल ?? विचार चालूच आहे....