Tuesday, February 27, 2018

प्रति, मराठी भाषा...

हे मराठी भाषे, कशीएस ?
अशी हिरमुसली का दिसत्येस ?
अच्छा !! अगं बाई, हे म्हणजे 'Hey !' नाही काही ! अगं आपल्या संबोधन एकवचनातलं 'हे' गं !
हाहा ! बघ तुझा चेहरा कसा क्षणात प्रफुल्लित दिसू लागलाय !
बरं, ते असूदे. उशीर झालाय, पण मी आज तुझे आभार मानायला आल्ये.
का म्हणजे ? अगं तू आजची उत्सवमूर्ती !
छे छे ! तुला बरं वाटावं म्हणून नाही गं ! पण आजच्या निमित्ताने माझ्या मनातला तुझ्या विषयीचा आदर आणि प्रेम तुझ्यापर्यंत पोहोचवू म्हंटलं.
welcome ? बापरे, आमच्यासारखा तू कशाला इंग्रजीचा आधार घेत्येस ?
नको गं ! तू आहेस तशीच रहा गं ! तू अशीच आवडतेस मला!
माझ्यापरीने नटवत असते मी तुला. कधी स्टेटसच्या रूपात, कधी लेखाच्या वेशात, तर कधीतरी चारोळीही जमून जाते. मित्रमंडळींकडून कौतूक होतं, पण हे तुझ्यामुळे होतं गं! तू मला इतकं आपलंसं केलंयस ना, की बास! लिहिण्याचं स्फुरण तुझ्यामुळे चढतं.
तू आहेस तशीच रहा गं ! तू अशीच आवडतेस मला!
- तुझी कायमची मैत्रीण,
भक्ती

Friday, February 16, 2018

आजी !

आज मीच केलेल्या कोशिंबीरीचा पहिला घास खाल्ला आणि आजीची आठवण आली. ती करायची तशी चव झालीये आज अगदी! तिच्या हातची आमटी, ताक-लोणी सगळं आठवलं एकदम. तिच्या त्या छोट्या फुलांचं डिझाईन असलेल्या पांंढ-या शुभ्र साड्या, पोलक्याची छोटीशी घडी करून त्या त्या साडीत ठेवण्याची सवय, घरी असली तरी तिन्हीसांजेला वेणी-फणी करून बसण्याची सवय, लोकसत्तेतलं शब्दकोडं सोडवायचा नित्यक्रम आणि टिव्हीवरच्या आवडत्या मालिकांचे भाग, रिपीट भाग म्हणजे जीव की प्राण! दामिनी, घरकूल पासून कसौटी जिंदगी की पर्यंत सगळ्याच्या स्टो-या मला टिव्ही न बघताच कळायच्या! प्राणीप्रेमही माझ्यात तिच्याकडूनच आलं असावं. अलिबागला आमच्या जुन्या घरातल्या ओटी, पडवी, माजघरात कित्येक मांजरींची बाळंतपणं प्रेमाने केली तिने. आज या कोशिंबीरीमुळे स्वयंपाकघरात कामात असणा-या आजीच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज येतोय की काय असंही वाटून गेलं! असो! आणखी लिहवत नाही! असतात अशी काही समीकरणं जुळलेली...कायमची! 
Miss you आज्जी!