Friday, June 15, 2018

प्रवास : Ladakh : In love with Ladakh - 1

लेह-लडाख!
काही जागा अशा असतात की जिथे शहरी माणसांच्या व्याख्येत बसणा-या कम्फर्टेबल सोयी नसल्या तरी तिथे चैन की नींद मात्र लागते. आजुबाजूला निसर्गाचं सौंदर्य अक्षरश: भरभरून दिसत असतं. सुरूवातीचे काही दिवस वगळले की नंतर हळुहळू camera बंद करून ठेवावासा वाटतो. निसर्गापुढे हरल्याचं आणि निसर्गामुळे हरखून गेल्याचं एक वेगळंच समाधान लाभतं. खरं सांगू तर ५००-६०० फोटो काढल्येत. पण सोशल मिडियावर एकही टाकावासा वाटत नाहीये. कारण camera ही त्या सौंदर्याला न्याय देऊ शकलेला नाहीये. असं वाटतं, कशाला देखावा करायचा त्या सौंदर्याचा! किती सामान्य आहोत आपण त्या डोंगरांपुढे, आभाळापुढे, पाण्यापुढे, मातीपुढे, दगडांपुढे! तिथल्या माणसांचा साधेपणा कणभर जरी माझ्यात झिरपला, तर माझं माझ्यावरचं प्रेम वाढेल! ओळख नसतानाही 'जुले' म्हणून निखळपणे हसणारी मंडळी, 'अतिथी देवो भव' म्हणून प्रेमाने जेवू-खावू घालणारी मंडळी, आजुबाजूने वेगवेगळ्या गाड्यांतून पास होत असताना नुसता हात दाखवून 'काही लागलं तर आहे रे मी' असा शब्देविण संवादू करणारी मंडळी ही कुठल्या ग्रहावरची आहेत?! Pangong ची लांबी किती, Nubra Vally ची खोली किती, कुठल्या रूतूत किती तापमान असतं ही सगळी मापं गुगलवर मिळतील, पण इथल्या माणसांच्या मनाचा साधेपणा कसा मोजावा?!
मला वाटतं, जे अजून गेले नाहीत, त्यांनी तरूणपणीच एकदा तरी लेह-लडाखला भेट देऊन याच. 'तरूणपणीच' कारण तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी लागणा-या शारिरीक क्षमतेकडे दुर्लक्ष करता येत नाही. आणि एकदा जाऊन आलात, की मनाचा एक तुकडा तिथल्या एखाद्या डोंगरातच हट्ट धरून बसलेला नाही आढळला तर सांगा!
फोटो नाही टाकत. बाकी कुणाला कुठल्याप्रकारची माहिती हवी असेल, तर जरूर विचारा! शक्य तितकी मदत आनंदाने करेन! 
जुले !

No comments:

Post a Comment