Saturday, June 16, 2018

प्रवास : Ladakh : In Love with Ladakh - 2

The Pangong Tso!
'Tso' म्हणजे Lake.
पँगाँगचा केवळ २५ ते ३०% भाग भारतात आहे. उरलेला भाग चायनामध्ये आहे. भारतात जो भाग आहे, त्याची लांबी ४० किलोमीटर आहे. म्हणजे एकूण हा लेक किती मोठा असेल याची कल्पना आपण करू शकतो. या लेकचे पाणी खारट आहे. त्यामुळे अन्न शिजवण्यासाठी या पाण्याचा उपयोग तेथिल माणसे करत नाहीत.
हाच लेक जर शहरी भागांत असता तर Lake Rafting किंवा तत्सम काहीतरी व्यावसायिक मार्ग शोधून माणसांनी त्याचा उपयोग करून घेतला असता. पण लडाखी रहिवाशांनी तसं काही केलेलं नाही, पँगाँगचं नैसर्गिक सौंदर्य जपलं आहे. का या माणसांविषयी प्रेम वाटणार नाही सांगा!

Friday, June 15, 2018

प्रवास : Ladakh : In love with Ladakh - 1

लेह-लडाख!
काही जागा अशा असतात की जिथे शहरी माणसांच्या व्याख्येत बसणा-या कम्फर्टेबल सोयी नसल्या तरी तिथे चैन की नींद मात्र लागते. आजुबाजूला निसर्गाचं सौंदर्य अक्षरश: भरभरून दिसत असतं. सुरूवातीचे काही दिवस वगळले की नंतर हळुहळू camera बंद करून ठेवावासा वाटतो. निसर्गापुढे हरल्याचं आणि निसर्गामुळे हरखून गेल्याचं एक वेगळंच समाधान लाभतं. खरं सांगू तर ५००-६०० फोटो काढल्येत. पण सोशल मिडियावर एकही टाकावासा वाटत नाहीये. कारण camera ही त्या सौंदर्याला न्याय देऊ शकलेला नाहीये. असं वाटतं, कशाला देखावा करायचा त्या सौंदर्याचा! किती सामान्य आहोत आपण त्या डोंगरांपुढे, आभाळापुढे, पाण्यापुढे, मातीपुढे, दगडांपुढे! तिथल्या माणसांचा साधेपणा कणभर जरी माझ्यात झिरपला, तर माझं माझ्यावरचं प्रेम वाढेल! ओळख नसतानाही 'जुले' म्हणून निखळपणे हसणारी मंडळी, 'अतिथी देवो भव' म्हणून प्रेमाने जेवू-खावू घालणारी मंडळी, आजुबाजूने वेगवेगळ्या गाड्यांतून पास होत असताना नुसता हात दाखवून 'काही लागलं तर आहे रे मी' असा शब्देविण संवादू करणारी मंडळी ही कुठल्या ग्रहावरची आहेत?! Pangong ची लांबी किती, Nubra Vally ची खोली किती, कुठल्या रूतूत किती तापमान असतं ही सगळी मापं गुगलवर मिळतील, पण इथल्या माणसांच्या मनाचा साधेपणा कसा मोजावा?!
मला वाटतं, जे अजून गेले नाहीत, त्यांनी तरूणपणीच एकदा तरी लेह-लडाखला भेट देऊन याच. 'तरूणपणीच' कारण तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी लागणा-या शारिरीक क्षमतेकडे दुर्लक्ष करता येत नाही. आणि एकदा जाऊन आलात, की मनाचा एक तुकडा तिथल्या एखाद्या डोंगरातच हट्ट धरून बसलेला नाही आढळला तर सांगा!
फोटो नाही टाकत. बाकी कुणाला कुठल्याप्रकारची माहिती हवी असेल, तर जरूर विचारा! शक्य तितकी मदत आनंदाने करेन! 
जुले !

Sunday, May 6, 2018

सिनेमा : Cycle

Cycle : The Film

संशोधन (Research)
भक्ती आठवले
स्वत:चं नाव मोठ्या पडद्यावर पाहताना खूप भारी वाटतं! 

२०१४ मध्ये 'सायकल' या सिनेमासाठी अदितीने गोष्ट लिहिली. तिच्या या गोष्टीसाठी काळानुरूप काय काय गोष्टी सिनेमात दाखवल्या पाहिजेत याची माहिती घेण्यासाठी...म्हणजेच रिसर्च करण्यासाठी भू गाव, राजापूर, आडिवरे, देवगड अशा गावांमध्ये फिरले. अनेक लोकांना भेटले, खूप छान अनुभव घेतले, या कामासाठी अनेकांची मदत झाली. हा सगळा अनुभव अदितीमुळे शक्य झाला. थांकू अदिती !!! 

सुरूवातीला या फिल्ममध्ये मुख्य पात्र हे 'पोस्टमन' असणार होतं. पण दरम्यानच्या काळात पोस्ट आणि पोस्टमन संबंधित काही सिनेमे आल्याने या पोस्टमनचा 'ज्योतिषी' केला गेला. हीच गंमत असते लेखकाची. परकाया प्रवेश करून ही माणसं कल्पनाविलासात रमू शकतात. त्यामुळे २०१४ ते २०१८ अशी ख-या अर्थाने 'फुरसत से बनाई हुई' ही फिल्म आहे.

आता थोडं फिल्मबद्दल. अदिती ही चांगुलपणावर विश्वास असणारी लेखिका आहे. 'कॉफी आणि बरंच काही', 'हंपी' आणि आता 'सायकल' या तिच्या आत्तापर्यंतच्या फिल्मस् कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या 'पॉझिटिव्ह'पणावर बेतल्या आहेत. लेखकांच्या कामामध्ये त्यांच्या values, त्यांची मतं रिफ्लेक्ट होत असतात. कारण बाहेरच्या गोष्टी आत झिरपून, त्यावर प्रोसेस होऊन मग त्या कामात नकळतपणे उतरायला वेळ लागतो. पण किमान सुरवातीच्या काही कामांमध्ये तरी लेखकाच्या त्या त्या स्टेजमधलं व्यक्तिमत्व बाहेरच्या गोष्टींच्या अनुशंगाने जास्त सहजपणे आणि नकळत फिल्मद्वारे रिफ्लेक्ट होतं. या फिल्मचंही तसंय. खरी, सोपी गोष्ट आहे ही. आता एखादी फिल्म जन्माला घालायची म्हणजे Box Office ची गणितं जुळू शकतील की नाही याचा विचारही करावाच लागतो. पण संपूर्ण टीमने त्या पलिकडे जाऊन जीव ओतून केलेल्या कामाला लोकांकडूनही शाबासकी मिळतेच!


Tuesday, February 27, 2018

प्रति, मराठी भाषा...

हे मराठी भाषे, कशीएस ?
अशी हिरमुसली का दिसत्येस ?
अच्छा !! अगं बाई, हे म्हणजे 'Hey !' नाही काही ! अगं आपल्या संबोधन एकवचनातलं 'हे' गं !
हाहा ! बघ तुझा चेहरा कसा क्षणात प्रफुल्लित दिसू लागलाय !
बरं, ते असूदे. उशीर झालाय, पण मी आज तुझे आभार मानायला आल्ये.
का म्हणजे ? अगं तू आजची उत्सवमूर्ती !
छे छे ! तुला बरं वाटावं म्हणून नाही गं ! पण आजच्या निमित्ताने माझ्या मनातला तुझ्या विषयीचा आदर आणि प्रेम तुझ्यापर्यंत पोहोचवू म्हंटलं.
welcome ? बापरे, आमच्यासारखा तू कशाला इंग्रजीचा आधार घेत्येस ?
नको गं ! तू आहेस तशीच रहा गं ! तू अशीच आवडतेस मला!
माझ्यापरीने नटवत असते मी तुला. कधी स्टेटसच्या रूपात, कधी लेखाच्या वेशात, तर कधीतरी चारोळीही जमून जाते. मित्रमंडळींकडून कौतूक होतं, पण हे तुझ्यामुळे होतं गं! तू मला इतकं आपलंसं केलंयस ना, की बास! लिहिण्याचं स्फुरण तुझ्यामुळे चढतं.
तू आहेस तशीच रहा गं ! तू अशीच आवडतेस मला!
- तुझी कायमची मैत्रीण,
भक्ती

Friday, February 16, 2018

आजी !

आज मीच केलेल्या कोशिंबीरीचा पहिला घास खाल्ला आणि आजीची आठवण आली. ती करायची तशी चव झालीये आज अगदी! तिच्या हातची आमटी, ताक-लोणी सगळं आठवलं एकदम. तिच्या त्या छोट्या फुलांचं डिझाईन असलेल्या पांंढ-या शुभ्र साड्या, पोलक्याची छोटीशी घडी करून त्या त्या साडीत ठेवण्याची सवय, घरी असली तरी तिन्हीसांजेला वेणी-फणी करून बसण्याची सवय, लोकसत्तेतलं शब्दकोडं सोडवायचा नित्यक्रम आणि टिव्हीवरच्या आवडत्या मालिकांचे भाग, रिपीट भाग म्हणजे जीव की प्राण! दामिनी, घरकूल पासून कसौटी जिंदगी की पर्यंत सगळ्याच्या स्टो-या मला टिव्ही न बघताच कळायच्या! प्राणीप्रेमही माझ्यात तिच्याकडूनच आलं असावं. अलिबागला आमच्या जुन्या घरातल्या ओटी, पडवी, माजघरात कित्येक मांजरींची बाळंतपणं प्रेमाने केली तिने. आज या कोशिंबीरीमुळे स्वयंपाकघरात कामात असणा-या आजीच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज येतोय की काय असंही वाटून गेलं! असो! आणखी लिहवत नाही! असतात अशी काही समीकरणं जुळलेली...कायमची! 
Miss you आज्जी!