Friday, April 13, 2018

समाजसुधारक

सरकारच्या मनाला आणखी किती बळी गेल्यावर पाझर फुटणार आहे?? कायद्याच्या शक्तीचा विलंबाने वापर न करून गुन्हेगार कुठल्या थरापर्यंत निर्ढावले जाण्याची वाट बघितली जाणार आहे ? घाण वाटते या सगळ्या परिस्थितीबद्दल. चीड येते. निराशा येते. माणूसपणाचीच घृणा वाटू लागलीये आता. कारण आपण माणूस आहोत आणि ते ही आपल्यातलेच. किती वर्षांपासून, किती ठिकाणी, कोणाकोणाकडून आणि किती तर्हेचे विचार त्या राक्षसी मनांवर कोरले गेले असतील, कळत; नकळत. खूप विचार झाला दिवसभर. पण निराश होऊन चालणार नाही. कुठल्याही बाबतीत उभारी घेऊन पुन्हा नवी वाटचाल करण्याचा आपला सकारात्मक आशावाद पणाला लावू. कधी सुधारणार आपला देश असा विचार करताना 'कसा सुधारेल' याबाबतसुद्धा विचार करू. कारण दुसरा मार्ग नाही. सरकार अनेक बाबतीत कमी पडतंय. पण या सगळ्या निर्घृण प्रकाराचं मूळ संस्कारात आहे. गुन्हा घडला की नाईलाजाने सरकारपुढे लाचार होऊन न्यायाची भीक मागण्याचा प्रश्न येतो. पण लहानपणापासून उत्तम विचार देऊन अशा प्रसंगांची संख्या कमी करता येऊ शकेल. येणा-या पुढच्या पिढीत सगळ्या जाती-धर्माच्या सीमांपलिकडे जाऊन एक 'माणूस' म्हणून कसं जगायचं आणि दुस-याला जगू द्यायचं हे संस्कार देण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. केवळ आपलं आडनाव जोडणारी मुलं-बाळं नाही, तर जमेल तसं, जमेल तेव्हा इतरांच्या मुलांनाही तशीच प्रेमाची शिकवण देऊ. ट्रेनमध्ये, कॉलनीमध्ये, बागेमध्ये, शाळेमध्ये, क्लासमध्ये जिकडे सहज शक्य होईल तिकडे. या सगळ्यात आपली कसोटी आहेच, पण आपला पेशन्स वाढवण्याला गत्यंतर नाही. 'समाजसुधारक' या सारखे मोठे शब्द आपण कायम इतिहासाच्या पुस्तकात वाचत आलो. त्यामुळे ते कोणीतरी वेगळे आणि आपण वेगळे अशी दरी नकळत निर्माण झाली. पण वर्तमानातल्या समाजाला सुधारण्यासाठी हाताच्या बोटावर मोजण्या इतके सुधारक पुरे पडणार नाहीत. इतिहासात वाचलेल्या सगळ्या नावांना आदरपूर्वक वंदन करून, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन, आपण मुळापासून सुरूवात करू.

- एक दिवस देशातला प्रत्येक मानव दुस-या मानवाशी सन्मानानेच वागेल अशा आशेत असलेला 'एक मानव'.

No comments:

Post a Comment