Wednesday, March 15, 2017

संगीत : राम का गुणगान करिये...

राम का गुणगान करिये,
राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिये
राम का गुणगान करिये॥

राम के गुण गुणचिरंतन,
राम गुण सुमिरन रतन धन,
मनुजता को कर विभूषित,
मनुज को धनवान करिये, ध्यान धरिये॥

राम का गुणगान करिये,
राम का गुणगान करिये॥

सगुण ब्रह्म स्वरुप सुन्दर,
सुजन रंजन रूप सुखकर।
राम आत्माराम,आत्माराम का सम्मान करिये,
ध्यान धरिये,राम का गुणगान करिये॥

कित्येकदा हे गाणं ऐकलं आहे. पण इतके दिवस रामाकडे एका देवत्वाच्या दृष्टिने बघत होते. आज वाटलं की राम दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या सर्वांमध्ये त्याचा अंश आहे. गरज आहे ते प्रत्येकातल्या रामगुणांची ओळख करून घेण्याची. दुस-याठायी असलेल्या रामगुणांचा आदर करून त्याप्रमाणे वर्तन करण्याची. 'राम - आत्मा, आत्माराम का सम्मान करिये' असंही असेल ते कदाचित! जगातल्या चांगूलपणावर माझा प्रचंड विश्वास आहे. आजुबाजूला अनेक दुष्कृत्य घडताना दिसत असली तरी सरसकट 'जगात काही राम उरला नाही' हे लेबल लावायला तयार होत नाही मी. रामराज्य येईल याची आशा कायम आहे! कदाचित इतक्यात नाही, माझ्या उभ्या जन्मात नाही; पण भविष्यात कधीतरी सही! 

गाणं ऐकताना आणि हे लिहिताना डोळे नेमके कशासाठी पाणावलेत कळत नाहीये! पण अनुभव छान आहे! 

Sunday, February 19, 2017

मेरे प्यारे फाफडाप्रेमियों...!




काल सहकुटुंब छान अभंग-नाट्यगीतांचा आस्वाद घेऊन भोजनार्थ ठाण्यातल्या अगदी मोक्याच्या ठिकाणच्या हॉटेलमध्ये गेलो. वेळ रात्री पावणे अकराची. आम्ही ७ जण होतो पण एकत्र जागा न मिळाल्याने ४ आणि ३ च्या गटात बसलो. जसजशी भैरवीची तिहाईकडे वाटचाल होत होती तसतशी पोटातल्या कावळ्यांची कुजबुज वाढू लागली होती. त्यामुळे आधी ऑर्डर देऊ आणि मग गप्पा सुरु करू असा ठराव एकमताने मंजूर झाला. ऑर्डर दिली गेली, चर्चा सुरु झाली. कोणी कोणतं नाट्यपद कसं मांडलं, 'मी मानापमान' मधली कुठली जागा भावली, 'हे सुरांनो चंद्र व्हा' तीन वेगवेगळ्या गायिका तीन वेगवेगळ्या पद्धतीने कसं सादर करतात इत्यादी. पण पाच-सात मिनिटांतच लक्षात आलं की शेजारच्या टेबलावरच्या 'फाफडाप्रेमीं'चा आवाज इतका वाढलाय की टेबलाच्या अलीकडे आणि पलीकडे बसलेल्या आम्हांला  आमचं बोललेलं काही ऐकू येत नव्हतं. त्यांच्याकडे  एकदा जळजळीत कटाक्ष टाकून झाला तरी काही परिणाम नाही. हॉटेलच्या मॅनेजरने त्यांना येऊन सांगितलं तरी काही फरकच पडत नव्हता. शेवटी न रहावून आवाज वाढवावा लागला आणि त्यांना सांगितलं की बाबांनो, तुम्ही आणि आम्ही आपापल्या कुटुंबीयांबरोबर एकत्र जमल्याचा आनंद आम्हांलाही आहे, हॉटेलच्या कुकने उत्तम चवीचं जेवण केलं आहे ते पाहून आमच्याही रसना उल्हासित झाल्या आहेत पण म्हणून हे हॉटेल म्हणजे तुमच्या घरची डायनिंग रुम नव्हे! समाजातले आणखी काही लोकही इथे येतात. त्यांनाही गप्पा मारायच्या असतात...जमल्यास. त्यावर हेअर स्ट्रेटनिंग आणि नेल आर्ट केलेली तरुण मम्मा म्हणाली, "ये बच्चे आवाज कर रहे है ना.. हम नहीं कर रहे!"
बापरे, अचंबा ! साधारणपणे आपली मुलं ही आपली जबाबदारी असते अशी समजूत असणाऱ्या सामान्य मध्यमवर्गीय घरातल्या मला त्या आईची कीव आली. मुलांऐवजी आधी पालकांना संस्कार वर्गात जाण्याची गरज आहे असं वाटलं ! असो !
--------------------
अलीकडे मुंबई - नागपूर एकटीच प्रवास करत होते. माझ्या बोगीपासून तीन बोगी सोडून पलीकडच्या बोगीत एक ओळखीचे काका काकू आहेत असं कळलं. म्हणून शिळोप्याच्या गप्पा मारायला गेले होते. परत येताना माझ्या मैत्रिणीचा फोन आला. एक एक बोगी पार करत माझ्या सीटजवळ येत होते. अचानक माणसांचा जोरजोरात आवाज आणि हशा. १५ सेकंद ती बोगी पार करेपर्यंत ना मला मैत्रिणीचा आवाज ऐकू येत होता ना तिला माझा. १० 'फाफडाप्रेमी' काहीतरी भरभक्कम हादडत आजूबाजूच्यांची तमा न बाळगता जोरजोरात बोलत होते. तेवढी बोगी पार केल्यावर पुन्हा अप्रतिम शांतता. मैत्रिण मला म्हणाली, "जिलबी-फाफड्याचा सुगंध दरवळलेला दिसतोय!"
--------------------
मला या लोकांबद्दल मुळीच राग नाही. मी कधीच कुठल्या प्रांतवादात पडत नाही किंवा एखाद्याबद्दल पूर्वग्रहदूषितही नाही. पण अलीकडे असं लक्षात येऊ लागलंय की बहुतांश वेळा हे यांचंच आणि असंच सुरु असतं. बरं, यांच्याबरोबर मुलं असतात. मुलं आपल्या आईवडिलांना कायमच तारसप्तकात बोलताना पाहत आलेली असतात. त्यामुळे आयुष्यात तेही तारसप्तकाचीच वाट धरतात. मध्य सप्तकात असलेली इज का अनुभवत नाहीत हे ? बरं आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो हे यांच्या गावी नसतंच. त्यामुळे एक कळकळीची विनंती -
"मेरे प्यारे फाफडाप्रेमियों, कृपया ध्वनीप्रदूषण ना करें. कई बार अपने आसपास ऐसे लोग उपस्थित होते है जिन्हें आपकी आवाजसे तकलीफ होती है. अपने घर में जितना चाहे ऊंची आवाज में बात करें, कोई आपको डिस्टर्ब् नहीं करेगा. पर पब्लिक प्लेस मे बात करते वक्त एक बार मेरी ये विनम्रतापूर्वक याचना के बारेमे जरूर सोचिये. थँक यू...... इन ऍडव्हान्स ! 

ता. क. यांच्या निमित्ताने हे इतरांनाही जनहितार्थ लागू.   

Monday, August 11, 2014

प्रेमाचा जाहीरनामा !


Photo Credits & Copyrights - Nupur Nanal
हाय !

आता आपली पहिली भेट आठवून सॉलिड गंमत वाटते ! हाहाहा ! माझी अत्यंत जवळची मैत्रीण (जी तुझी लंगोटीयार आहे) तुझ्या बरोबर इतकी छान बोलत्ये, इतकी मस्त मैत्री आहे पाहून मला इनसिक्युरिटी, तुझा राग, आश्चर्य, तिच्याबद्दल पझेसिव वाटणं असं काय काय सगळं वाटून गेलं होतं... अंss...४ वर्षांपूर्वी. (नेमकं किती वर्षांपूर्वी हे शोधण्यासाठी मी गुगलवर 'पिपली लाइव्ह' कधी रिलीज झाला होता हे पाहिलं. तारखा लक्षात राहण्याबाबत मला तू कायमच माफ केलं आहेस, त्याबद्दल thanks.) तर, सांगायचा मुद्दा असा की इतके दिवस आधी हाती पत्र लिहून त्याचा फोटो काढणे किंवा ई - मेल द्वारे पत्र लिहिणे यांची जागा आज या 'जाहीरनाम्या'ने घेतली आहे, हे पाहून आपलाच हेवा वाटतोय ! :D 

काही लोक आपलं समोरच्या व्यक्तीवर असलेलं प्रेम व्यक्त करायला कचरतात तर काहींच्या बाबतीत 'प्रेम झालेल्याला अख्खं जग गुलाबी दिसतं', असं म्हणावं इतकं असतं. आपल्याबाबत हे दोनही नाही. "मला तू कित्तीSSS आवडतेस माहितीये का ?" असं म्हणून तू ते व्यक्तही केलंस तर कधी "जाऊदे..मी नाही सांगत" असं म्हणून सोडून दिलंस. वेळप्रसंगी भक्ती, मला तुझी अमुक एक गोष्ट पटत नाहीये, असंही सांगितलंस. बापरे ! लिहायला बसल्यावर आता काय काय आठवतंय ! नाईट आउट साठी भेटून मनात साचलेलं सगळं शेअर करणं, मला आत्ता कंटाळा आला आहे. माझ्याशी थोडावेळ बोल, असं म्हणून दिवसाच्या कुठल्याही वेळी फोनवर तासन तास मारलेल्या गप्पा ! हेच कशाला, मला किंवा तुला एकमेकांचे फक्त नावाने ठाऊक असलेले मित्र - मैत्रिणी पण आपल्या आता इतक्या परिचयाचे झाले आहेत की बघ हं, काही सांगता येत नाही, त्यातल्या कुणाबरोबर तरी मी एखादा सरप्राईज प्लान ठरवू शकेन ! ;) 

तुला तुझ्या आजी - आजोबांची आठवण येत्ये म्हणून मला रडू येऊ शकतं, माझ्या कॉलेजच्या चहावाल्याला तुझा फोन जातो आणि तुमच्या तासन तास गप्पा होतात, तुझी आत्येबहीण आणि मी तुझ्या अनुपस्थितीत फिरायला  जाऊ शकतो, माझी इथली मैत्रीण तिच्या परदेशातल्या मैत्रिणीला अमुक एक पदार्थ आवडतो, तो तिला करून दे असं तुला हक्काने सांगू शकते !! अरे, हे काये ??!!! केवढा आनंद आणि आठवणी आहेत या छोट्या छोट्या गोष्टींत !

हुश्श ! हे लिहित असताना मनातल्या मनात मी ३-४ वेळा आपली दृष्ट काढली आहे! मला छानसं काही तुझ्यासारखं क्रिएटिव्ह सुचत नाही प्रत्येक वेळी ! त्यामुळे म्हटलं पत्रच लिहू तुला आज, पण थोड्या वेगळ्या format मध्ये.

तर ! प्रिय अर्निका परांजपे, हा वरचा फोटो युके मधेच क्लिक केलेला आहे. म्हणून परांजप्यांच्या घरी टेबल वर असं माझं गिफ्ट मी ठेवलंय तुझ्यासाठी, असं ठरवलंय. फोटोतल्या बॉक्समध्ये हा केक आहे आणि बाजूला हेच लेखी पत्र.


अर्निके, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!!! उदंड आयुष्य, यश आणि समाधान लाभो तुला ! जे जे काही हवंय ते ते मिळो, तुझ्याकडून सतत छान लेखन होत राहो, छान छान माणसं भेटत राहोत. आणखी काय लिहू यार ! माझं तुझ्यावर केवढं प्रेम आहे माहितीये का ??!!


छे ! जाऊच दे ! ;)

Monday, June 16, 2014

आठवणींची इन्वेस्टमेंट

               "नक्की भेटू", "सॉरी, मी बिझी आहे गं", "काय करू, माझा नाईलाज आहे, कामाच्या व्यापात नाही देता येत वेळ" अशी अनेक वाक्य आपल्याला पदोपदी ऐकू येत असतात. त्यावर आपण "I am gonna miss it !" चं कनवाळू लेबल चिकटवतो. या सगळ्या वाक्यांमागचा सूत्रधार असतो तो आपल्या सगळ्यांकडे असलेला 'अपुरा वेळ'. 

                      एका कवितेत जावेद अख्तर साहेब म्हणालेत  -
"ज़िंदगी की कश्मकश में 
वैसे तो मै भी काफ़ी बिजी हूँ , 
लेकिन वक्त का बहाना बना कर 
अपनोंको भूल जाना मुझे आज भी नहीं आता।"
                 
             काय सुंदर लिहिलंय ! प्रत्येक वेळी आपल्याला मुद्दाम विसरायचं किंवा टाळायचं असतंच असं नाही. नेहमी 'वक्त का बहाना' 'बनवतच' असू असं नाही. पण तरी बहुतेकदा बहाना असतो मात्र वेळेचाच ! 
                 
         मध्यंतरी माझा हा 'वेळेचा बहाणा' मला आयुष्यभराची चुटपूट लावून गेला. माझी एक बालमैत्रीण आहे - अवनी. तिची आजी आजारी होती. अवनी आणि मी लहानपणी एकत्र खेळायचो तेव्हा आजीने केवढे लाड पुरवलेत आमचे ! साठवलेल्या पैशांतून आईस्क्रीम आणून दे, मे महिन्याच्या सुट्टीत बालनाट्यांना घेऊन जा, तर कधी घरच्या घरी अगदी साधे साधे पण अतिशय प्रेमाने आमचे लाड करायची आजी. त्या दिवशी आजी आजारी आहे हे सांगायला अवनीचा फोन आला. "बापरे ! काळजी घे गं ! आजीला भेटून जाईन मी. सध्या जाम हेक्टिक शेड्युल आहे गं. त्यामुळे नक्की कधी येईन सांगत नाही आत्ता. नाहीतर आजी बिचारी वाट बघत बसेल. पण काहीतरी जुगाड करते आणि येउन जाते." असं म्हणून फोन ठेवला आणि ठरलेली लोकल पकडायला धावले. नंतर दोन दिवस लक्षात होतं आजीला भेटायला जायचं. पण १०-१२ तास काम करून आल्यावर रात्री अंगात काही त्राणच उरले नव्हते. अवनीला मेसेज केला - "अवने, १-२ दिवसांत येते आजीला भेटायला। सरप्राईज देईन. आनंद होईल तिला. तू आधी सांगू नकोस मी येत्ये ते. चल, Bye..gn tc!"
मेसेज करून कधी गाढ झोपले कळलंच नाही. सकाळी उठून बघते तर पहाटे ३.३० च्या दरम्यान अवनीचा मेसेज आला होता -
"Aaji is no more."
मेसेज वाचून काळजाचं पाणी झालं. प्रचंड वाईट वाटलं आणि राग आला स्वतःचाच. माझ्या "नक्की येते"चा काय उपयोग आता ? कायमची हळहळ लागून राहिली. 
        या एका प्रसंगासारखी आणखी अनेक उदाहरणं आपण रोज अनुभवत असतो पण पुन्हा येरे  माझ्या मागल्या. वेळेबरोबरच्या स्पर्धेत आपण अनेक चांगले क्षण हरवून बसतो; पेक्षा ते आपण आपल्या वाट्याला येउच देत नाही. ते चांगले क्षण कसे 'टिपायचे आणि जगायचे' हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. म्हणजे रोजची वेळ असते तीच असते. पण हे 'रोजचेच पल' कधीतरी 'हसीन' होऊन आले की ते आपल्या कायम लक्षात राहतात. त्यामुळे कधी 'होस्ट' म्हणून तर कधी 'गेस्ट' म्हणून आपण या 'हसीन पलां'चं साक्षीदार झालं पाहिजे नं ! कारण हे 'हसीन पल' म्हणजेच 'चांगल्या आठवणी' आपोआप तयार होत नसतात. त्या आपण तयार करत असतो, असं मला वाटतं. जेव्हा आपण एखाद्या कारणासाठी आपला वेळ खर्ची घालतो (जाणते किंवा अजाणतेपणी) त्यातूनच 'आठवणीं'चा जन्म होतो. 
               आता काही माझ्यासारखी चांगल्या आठवणींमध्ये रमायला आवडणारी मंडळी फार वेळ न दवडता लगेच 'होस्ट' किंवा 'गेस्ट' होण्याची तयारी सुरु करतील कदाचित. पण उरलेल्या मंडळींच्या मनात एक प्रश्न अजूनही उड्या मारत असेल की आठवणी 'क्रिएट' करण्याचा इतका अट्टाहास का ? तर त्यांच्यासाठी म्हणून थोड्या वेगळ्या संकल्पना वापरून उत्तर देते. आपण पैशांची गुंतवणूक करतो, प्रॉपर्टी, सोनं - नाणं, पॉलिस्या असे जे जे सतराशे साठ मार्ग उपलब्ध असतील त्या सगळ्या मार्गांनी आपण स्वतःलाच 'सुरक्षित भविष्याची' हमी देत असतो. which is fair enough. पण या बरोबर 'आठवणींच्या इन्व्हेस्टमेंट'चा विचार केला जात नाही. म्हणजे जेव्हा वयाची साठी - पासष्टी उलटल्यावर आपल्या छानशा टुमदार फार्म हाऊसमध्ये निवांतपणे गप्पा मारायला बसू किंवा एखाद्या उंच टॉवरमध्ये 3BHK चा प्रशस्त flat असेल पण खाली उतरवणार नाही तेव्हा त्या रिकाम्या घरात एकमेकांशी गप्पा मारायला दोघंच असू, तेव्हा आठवणींची केवढी मोठी सोबत असेल. शाळेच्या मित्रांबरोबर एन्जॉय केलेली रि-युनियन पुन्हा त्या बाकांवर नेउन बसवेल. कॉलेजच्या कट्ट्यावर केलेला टाईमपास पुन्हा एकदा तरुण करेल. ऑफिसमध्ये 'sick leave' घेऊन पावसाळ्यात माळशेज घाटावर केलेली धमाल पुन्हा एकदा ताजंतवाणं करेल, भावी जोडीदाराबरोबर लाँग ड्राईव्हच्या गप्पांमध्ये रंगवलेली स्वप्न पूर्ण झालेली पाहून मनस्वी समाधान मिळेल, त्यावेळी कित्येक वर्षांनंतर केलेली छोटीशी फॅमिली ट्रिपसुद्धा किती महत्वाची होती हे आता जाणवेल. त्यामुळे 'वेळ' या भांडवलाच्या गुंतवणुकीतून मिळणारं व्याज म्हणजे 'आठवणी'. 
                
               हे अगदी खरं की वाढत जाणा-या वयाबरोबर, जबाबदा-यांबरोबर बँक बॅलन्सही कसा वाढत जाईल याकडे लक्ष ठेवावं लागतं. आपलं खातं जरा जड होऊ लागलंय असं वाटत नाही तोवर पुढच्या पिढीसाठी कराव्या लागणा-या तरतुदी आ वासून उभ्या असतात. पण तरीही या सगळ्यामध्ये स्वतःला थोडं स्ट्रेच करून स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी वेळ काढला पाहिजे. कारण त्यामुळे होणारी आनंदाची देवाणघेवाण इतर कोणत्याही 'एक्स्पेन्सिव' ब्रॅण्डेड गिफ्टपेक्षा अधिक 'वॅल्युएबल' असेल. आणि एकदा निघून गेलेली वेळ 'ते तेव्हा करायचं राहूनच गेलं' या वाक्याचं कितीही वेळा पारायण केलं तरी परत येत नाही ! म्हणून त्या आपल्या आनंदी फ्युचरसाठी केलेली ही 'आठवणींची इन्वेस्टमेंट'. 
फैय्याज हाश्मी यांनी म्हणून ठेवलंच आहे -
वक़्त की कैद में जिंदगी है मगर 
चंद घड़ियाँ यहीं हैं जो आज़ाद हैं, 
इनको खोकर मेरी जानेजाँ 
उम्रभर ना तरसते रहो !

Monday, October 8, 2012

"हृदयातला वसंत"


                शाळेत असताना सोडवलेल्या 'कोण कोणास म्हणाले' ह्या प्रश्नाची प्रचिती प्रत्यक्षात करून देणारा प्रसंग आपल्याला रेल्वे प्रवासात रोज पहायला मिळतो. 'कोणाची सीट कोणी कोणाला कधी सांगितली' ह्यावरून रोज भांडणस्वरूपी चर्चा हमखास रंगतात. तशीच एक 'महाचर्चा' परवा सुद्धा सुरु होती. ह्याच सगळ्या सावळ्यागोंधळातून मार्ग काढत एका सत्तरीच्या आजींनी मात्र 'चौथ्या सीट'वर आपला शिक्कामोर्तब केला. समोरच्या चौथ्या सीटवर मी बसले होते. ट्रेनमध्ये असूनसुद्धा 'एकाच नावेतले प्रवासी' असल्यागत आमची दोघींचीही अवस्था होती. त्या रेल्वे डब्यातल्या 'गर्दी'रुपी लाटा आमचं 'स्थान' डळमळीत करण्याच्या प्रयत्नात होत्या. त्यामुळे केवळ नजरेतून एकमेकींना सहानुभूती दर्शवत त्या आजी आणि मी एकमेकींकडे बघून हसलो. पुढच्या एक-दीड मिनिटांतच आजी म्हणाल्या. " काय गं, आता भांडूप येईल ना ?" मी म्हंटलं  " नाही आजी, आधी मुलुंड, मग नाहूर आणि नंतर भांडूप येईल" आजी - "अच्छा ! मग भांडूप नंतर काय ?" "भांडूप नंतर कांजूर येईल" आजी म्हणाल्या "बरं ! Thank You !" झालं...आमचं संभाषण तिथे संपलं. मुलुंड आलं. गर्दी वाढली. दोन सीट्सच्या मधल्या जागा थाटमाट केलेल्या ललनांनी व्यापून टाकल्या. त्या गर्दीत समोर बसलेल्या आजी दिसेनाश्या झाल्या. मुलुंडहून ट्रेन सुटली. मी सर्वसामान्य मुंबईकर मुला-मुलींप्रमाणे माझ्या कर्णपटलांवर हेडफोन्सची आरास करून गाणी ऐकण्यात मश्गूल झाले. कानातले विकणाऱ्या बायका, खाद्यपदार्थ विकणारी मंडळी, चाप, अंगठ्या, घरगुती उपयोगी वस्तू विकणारे यांची मांदियाळी होती. काही बायका भांडण्यात बिझी होत्या तर काही खरेदी करण्यात. पलीकडच्या कम्पार्टमेंट मधल्या 'स्तोत्र' म्हणणाऱ्या आणि अलीकडच्या कम्पार्टमेंट मधल्या 'गाणी' म्हणणाऱ्या दोन गटांमध्ये रंगलेली जुगलबंदी श्रवणीय होती. एखादी गजरे विकणारी छोटी मुलगी वातावरण सुवासिक करून जात होती आणि ह्या सगळ्यात न चुकता "पुढील स्टेशन नाहूर, अगला स्टेशन नाहूर, Next station Nahur" हे ती अनाउन्सर मात्र  अगदी बजावून सांगत होती.
              रेल्वेतली नित्यकर्म सुरळीतपणे पार पडत होती. तेवढ्यात त्या गर्दीतून अचानक एका हाताने मला हलवलं. त्या बाईंना शोधण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. पण सकाळी ९.१७ च्या जलद लोकलमध्ये ते अशक्य झालं तर त्यात नवल नाही ! त्या बाई काही मला दिसेनात. माझी ही धडपड चालू असतानाच मध्ये उभ्या असलेल्या बाईंच्या पलीकडून मोठ्याने हसण्याचा आवाज आला - "अगं ए मुली, अनाउन्समेंट करणारी ही बाई 'नाहूर' म्हणत्ये, मगाचपासून मी 'अगला स्टेशन 'नागपूर'च ऐकत होते !" पुन्हा एकदा खळखळून हास्य ! पुढचं स्टेशन आलं. गर्दी कमी झाली. मी घाईघाईने त्या आजीना शोधू लागले. पण त्या गर्दीतून उतरून गेलेल्या !
           त्या आजी उतरून गेल्यानंतरसुद्धा बराच वेळ त्यांचं ते मनमोकळं हसू मनात कितीतरी वेळ मनात रेंगाळत होतं. स्वत:ची झालेली फजिती एका अनोळखी मुलीबरोबर शेअर करताना त्यांनी त्या प्रसंगातून मिळवलेला आनंद तुम्हा-आम्हाला कदाचित 'लाफ्टर क्लब'मध्ये जाऊन मिळणार नाही. टेन्शन्स, प्रॉब्लेम्स कोणाला नसतात हो ? "आज कॉलेजला जाताना कोणते कपडे घालू ?" इथपासून ते 'होम लोन फेडताना उडणारी 'आर्थिक तारांबळ' ह्या सगळ्या चिंतांची गणितं डोक्यात एकाच वेळी सोडवली जात असतात. पण ह्या सगळ्याला सामोरं जायचं म्हणजे कसल्यातरी 'बूस्टची' गरज असते. गाडीत जसं पेट्रोल घातलं की ती आपल्याला हव्या त्या स्पीडने हाकता येते, तसंच आनंदाचे चार क्षण शोधले की दिवसभराच्या कष्टांचं काही वाटेनासं होऊन जातं ! किंवा जसं ऑफिसमधून दमून घरी येत असताना सीटसाठी भांडणं करण्याची मानसिक तयारी करूनच आपण ट्रेन मध्ये पाउल टाकतो. अपेक्षेप्रमाणे ते क्षण आपल्या वाट्याला येतातच. भांडणं चालू असतानाच शाळेतली एखादी मैत्रीण आपल्याला अनेक वर्षांनी भेटते आणि मग आपण त्या भांडणाऱ्या बाईला तोंड वाकडं करून 'बस तूच !' म्हणत पुढचा अख्खा प्रवास उभ्याने आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी आनंदाने करतो. थोडक्यात काय, तर आनंद हा आपल्या शोधण्यावर आणि मानण्यावर आहे ! काही जणांना आनंदातही दु:ख बोचत असतं पण काही जण मात्र दु:खातही आनंद शोधून तो साजरा करण्यात रममाण असतात ! Choice is yours !
             किती छान विचार चालू होता तेवढ्यात आलंच कोणीतरी..."शुक शुक....कुठे उतरणार तुम्ही ?? तुमची सीट मला द्या हं !" शुकशुकणाऱ्या बाईंनी माझ्या विचारमंथनातून मला बाहेर काढल्यामुळे कानात वाजत असलेल्या गाण्याकडे लक्ष गेलं...शब्द होते -
"कधी ऊन झेलले कधी तृप्त चांदण्यांत, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत !"
                पुन्हा एकदा आजींची आठवण आली !! आजी, thank you so much !! आज तुमच्यामुळे केवढा छान विचार केला गेला ! अशाच छोट्या-छोट्या गोष्टींमधून आनंद शोधत कायम enjoy करत राहा !! God bless you ! :)

                       

Monday, October 1, 2012

निमित्त - एक Unclicked Photo !


         मध्यंतरी मी आणि माझी मैत्रीण एका कार्यक्रमाला गेलो होतो. कार्यक्रम उत्तम झाला. कार्यक्रम संपल्यावर आम्ही दोघी प्रेक्षागृहाच्या बाहेर आलो. तर 'सो-कुल' असलेली सोनाली कुलकर्णी तिथे उभी होती....चक्क without तिच्या Fans चा गराडा ! ती लिहित असलेल्या सदराची मी प्रामाणिक वाचक असल्याने तिला तिच्या लेखनाबद्दल compliment देण्याचा मोह आवरता आला नाही. मी तिला भेटायला गेले; मैत्रीण काही आली नाही...
"Hi ! मी भक्ती आठवले. तुझं सदर मी नेहमी वाचते. खूपच छान असतं. रोजच्या अनुभवांमधून आकाराला आलेला एक विचार आणि तोही अगदी सोप्या शब्दांत मांडतेस तू... त्यामुळे माझ्यासाठी ती एक treat असते ! खूप खूप शुभेच्छा तुला !" कित्त्ती गोssड हसली म्हणून सांगू ती !! :)
"अरे वा !! thank you so much भक्ती ! keep reading ! भेटू पुन्हा ! take care"
संभाषण संपलं...मी मैत्रिणीजवळ परत आले.
मैत्रीण - "अगं भक्ती, एक फोटो काढून घे ना सोनाली बरोबर !" 
मी - "छे ! फोटो कशाला काढून घ्या ?"
मैत्रीण - "अगं, चल ना मी काढते तुमचा फोटो. तू फक्त उभी रहा."
मी - "पण कशासाठी ? मला नाही आवडत असं - ओ, मला ना तुमच्याबरोबर एक फोटो काढायचा आहे."
मैत्रीण - "एवढं काय त्यात ?"
मी - "अगं तिच्याबरोबर कार्यक्रम करून मग फोटो काढला तर गोष्ट वेगळी ! पण असे काय रोज छप्पन्न जणं तिच्याबरोबर फोटो काढत असतील. त्यातलीच मी एक. तिच्याबरोबर फोटो काढण्यात माझं काय एवढं मोठेपण ??"
मैत्रीण - "शी बाबा ! वेडी आहेस तू ! मला तुझा राग आला आहे."
मी - "हे हे हे ! अगं रागवू नकोस....पण मला तिला तिच्या कामाकरता compliment दिल्यानंतर जे समाधान मिळेल ते तिच्याबरोबर फोटो काढून नाही मिळणार ! म्हणून गं !"
          बापरे....कसातरी हसत खेळत तो विषय तिथे संपवला. दोघीही आपापल्या  घरी जायला निघालो. मी ट्रेन मध्ये बसले...आणि नंतर आपसूकच विचार चालू झाला. ट्रेनचा प्रवास हे असले विचार-बिचार करण्यासाठी अगदी उत्तम वेळ असतो; अर्थात बसायला छानशी सीट मिळाली तर !
          असो...तर सांगण्याचा मुद्दा असा की 'सोनाली कुलकर्णी बरोबर फोटो काढण्याचा माझ्या मैत्रिणीचा एवढा आग्रह का होता ? आपल्याबरोबर एक आठवण असावी म्हणून सांगत होती का ? "पण खरंच तुम्ही अगदी मनापासून दाद दिली असेल तर तुमच्या भेटीचा 'episodic photograph' मनाच्या ROM मध्ये कायमचा store होतोच !! त्यासाठी पुराव्याची गरज नसते"....मग मला मित्र-मैत्रिणींमध्ये कॉलर ताठ करून फिरता यावं म्हणून म्हणत असेल का ती ? "पण सोनाली कुलकर्णी ग्रेट असली तरी फोटोसाठी तिच्याशेजारी २५ सेकंद उभं  राहिल्याने ती शेजारची व्यक्ती सुद्धा ग्रेट होत नसते नं ??!!".....मग माझ्या मैत्रिणीला सोनाली कुलकर्णीला जवळून पहायचा होतं का ?? "अगं पण मग यायचं की माझ्याबरोबर ! 'कॅमेरा zoom होण्याची सवय असते त्यांना; अजिबात conscious न होता !".....का आजच्या 'presentation' च्या काळात तुमची कोणाकोणाशी ओळख (???) आहे, ह्यावारूनही तुमचा भाव वधारतो म्हणून म्हणत असेल ती ? "अरे पण मग जर हाच सामान्य हेतू असेल तर फक्त फोटो काढण्यापेक्षा तिच्याशी बोलल्याने आपण तिच्या 'photographic memory' मध्ये save होण्याचे chances जास्त असू शकतात !" हुशss...उलट-सुलट अनेक प्रश्न 'पाडून' झाले, स्वत:ची स्वत:ला उत्तरही दिली;  पण नाही ! काही केल्या मला तिचं म्हणणं 'click' होत नव्हतं ! मग एकदम डोक्यात 'flash' पडला...."अरेच्चा ! मला हे कसं लक्षात आलं नाही तेव्हा ??  जसा मला सोनाली कुलकर्णीशी बोलण्यातून, तिला तिच्या चांगल्या कामाकरता compliment देऊन आनंद मिळाला, तसा माझ्या मैत्रिणीला कदाचित तिचा फोटो काढून मिळाला असता !!  नाही नाही, चुकलंच माझं...आता परत कुठे लगेच भेटणार आहे सोनाली कुलकर्णी ?? मला आवडत नसलं, तरी माझ्या मैत्रिणीसाठी एक फोटो काढायला हवा होता...मी तिच्यसाठी म्हणून एक फोटो काढला असता तर काय बिघडणार होतं ?? काय हरकत होती ?? शी !!! झर्रकन role rewind करावासा वाटला ! पण ती moment मात्र निसटलेली ! खूप कससंच झालं...मनाला चुटपूट लागून राहिली... प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीतून आनंद मिळत असतो...आपला आणि समोरच्या व्यक्तीचा आनंद सारखाच असेल असं नाही ना ! आपल्याला शक्य असेल तर दुसऱ्याच्या आनंदासाठी काहीतरी करण्यातसुद्धा खूप आनंद असतो हे लक्षात आलं ! Anyways, "सखे, sorry for this time ! मी पुढच्या वेळी नक्की फोटो काढेन....केवळ तुझ्यासाठी  !!" :)  

Sunday, July 1, 2012

देवांचेसुद्धा एक एक दिवस असतात...


      status update केली गेली, wall photos टाकले गेले,  mobile uploads झाले, profile pictures बदलली गेली, cover photos दिमाखात झळकले, ring tones खणखणू लागल्या, caller tunes सुद्धा change झाल्या, कार्यक्रमांच्या जाहिराती दिसू लागल्या, photos छापले जाऊ लागले....काय काय म्हणून विचारू नका. सग्गळं अगदी उत्साहात आणि जोरदार चाललेलं.
      
      दुसरा दिवस उजाडला. आणि पुन्हा हेच सगळं झालं - 'status update केली गेली, wall photos टाकले गेले,  mobile uploads झाले, profile pictures बदलली गेली, cover photos दिमाखात झळकले, ring tones खणखणू लागल्या, caller tunes सुद्धा change झाल्या, कार्यक्रमांच्या जाहिराती दिसू लागल्या, photos छापले जाऊ लागले....पण सगळं दुसरंच...वेगळंच ! 'कालच्याचं' कौतुक इतक्यात ओसरलं ? की ते कौतुक नव्हतंच आणि लोकांच्या 'updates च्या वारीत' आपण नसणं हे up to date नसल्याचं लक्षण होतं म्हणून केलं गेलेलं ?? खरंच प्रश्न पडला !
       
       'Glamour' बडी अजब चीज है भैया ! ह्या अशाश्वत जगातल्या क्षणिक गोष्टींपैकी एक गोष्ट ! पण ह्या अशाश्वत गोष्टीत इतकी शक्ती आहे, की तो शाश्वत परमात्मासुद्धा बिचारा ह्यापासून बचावला नाही. हो, कारण हल्ली देवांचा सुद्धा 'Glamour Period' असतो. त्यांच्या त्यांच्या  दिवशी हे सगळे देव, त्यांची त्यांची ठिकाणं, त्यांच्यावर लिहिलेले अभंग, गाणी, कथा इतकंच कशाला; हे सगळं लेखन करणारे संत, कवी सुद्धा प्रसिद्धीच्या झोतात येतात...म्हणजे आपणच आणतो ! एका ठराविक काळात  एखादा देव इतका प्रसिद्ध होतो, इतका 'मोठा' होतो, की बाकीचे ३२ कोटी ९९ लक्ष ९९ हजार ९९९ देव खरोखर त्याचा हेवा करत असतील...किंवा नसतीलही; 'देव जाणे' ! ह्या त्यांच्या त्यांच्या दिवसात त्यांच्यावर सिनेमे निघतात, त्यावर उलट-सुलट चर्चा होतात, परीक्षणं लिहून येतात, अमुक अमुक देवाचा संक्षिप्त आढावा घेणारे लेख छापून येतात, विशेषांक प्रकाशित होतात, एखाद्या देवाचा शोध घेणारी कादंबरी प्रसिद्ध होते, एकाच देवावर असंख्य लहान-मोठे गाण्यांचे कार्यक्रम होतात असं सगळं सुरळीत चालू असतं. 
       
        मी ना एकदा मैत्रिणीच्या गावाला गेलेले. तिने तिथल्या देवळात नेलं. अतिशय शांत, स्वच्छ, छोटंसं देऊळ होतं. आम्ही गेलो तेव्हा कोणीही नव्हतं तिथे. अगदी पुजारीसुद्धा नाही. १० मिनिटं आम्ही दोघी बसलो तिथे, नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली आणि चालू लागलो. पण घरी येताना कितीतरी वेळ मन त्या साध्या देवळातच अडकलं होतं. देवळाच्या दारावर सिक्युरिटी चेकिंग नाही, भक्तांना येण्यासाठी रेड कार्पेट नाही, दाराला कडी-कुलपं नाहीत, देवळाच्या पायऱ्यांवर देणगी देणाऱ्यांची श्रेय नामावली नाही, खांबांवर 'कृपया मूर्तीचे फोटो काढू नयेत' अशा पाट्या रंगवलेल्या नाहीत, काचेची झुंबरं नाहीत की देवळातल्या मूर्तीला हार-तुरे-शाली-फुलं सुद्धा नाहीत ! खरं तर काम-धाम सोडून सारखं 'देव-देव' करत बसणं मला पटत नाही. मनापासून वाटेल तेव्हा देवळात जाऊन त्याला नमस्कार करण्यातलं समाधान मस्टरच्या घाईत घातलेल्या लोटांगणातसुद्धा मिळणार नाही. पण  मला खरंच अगदी मनापासून त्या साध्या देवळातल्या साध्या देवाशी गप्पा माराव्याश्या वाटल्या...होते काही प्रश्न ! दिवस सुद्धा साधाच निवडला. प्रकटदिन नाही की बाकी काहीही नाही ! मैत्रिणीला म्हंटल येते जाऊन देवळात; आवडलं मला देऊळ. देवळात पोहोचले. सुरुवातच केली.
मी - कसा आहेस ??
देव - छान ! मजेत !
मी - मला तुझं देऊळ खूप आवडलं हो, आमच्या शहरात नाही बाबा अशी देवळं बघायला मिळत. 
तो हसलाच आणि म्हणाला, हं...तुला आवडलं ना, येत जा मग इथे येशील तेव्हा !
मी - हो नक्की ! बरं, मला सांग इथे कोणी पुजारी वैगरे नाही का ?? दानपेटी नाही, तुझ्या गळ्यात फुलांच्या माळा सुद्धा नाहीत रे ! का असं ?
पुन्हा हसला आणि म्हणाला, "अगं पुजाऱ्याची गरजच काय ? दिवसाकाठी जी काही दोन-चार माणसं येतात, ती त्यांना वाटलं म्हणून येतात, त्यांना वाटलं म्हणून मनापासून नमस्कार करतात, तुझ्यासारखे काही गप्पा मारायला बसतात; हेच माझे खरे पुजारी आणि त्यांचा मन:पूर्वक नमस्कार; हीच माझी दक्षिणा !
मी - हं ! पण मग तुला कधी असं वाटत नाही का, की मोठमोठ्या शहरातल्या देवांना इतकी प्रसिद्धी मिळते, लोकं भल्यामोठ्या रांगा लावतात, इतकी सुंदर रोषणाई असते, रोज सुंदर सुंदर वस्त्र, अलंकार मिळतात त्यांना ! तुला वाईट नाही वाटत ?
तो हसला आणि म्हणाला, "छे गं ! त्यांना कुठे भक्तांशी निवांत गप्पा मारता येतात ? त्यांना कडीकुलपात बंदिस्त रहावं लागतं आणि मी बघ ! आणि आता विषय निघालाच म्हणून एक खासगीतली गोष्ट सांगतो, परवाच माझं त्यांच्याशी बोलणं झालं. बिचारे फार कंटाळलेले दिसत होते. 'frustrate' का काय झालो म्हणत होते. म्हंटल, "का बाबा ? काय झालं तुम्हाला ?" तर म्हणाले की "ही लोकं आम्हाला काय हवंय विचारतच नाहीत. प्रकटदिन आमचे, उत्सव आमचे करतात  पण ह्यांच्या हरप्रकारच्या हौशी भागवून घेतात. देणग्या गोळा करतात, झगमगाट करतात, जेवणावळी घालतात, मोठमोठ्याने गाणी लावतात...आम्हांला काय हवंय; काय नकोय rather हवंय की नकोय काही विचारात नाहीत ! कसलं ना कसलं 'Celebration' करण्याची  संधी हवी असते त्यांना दुसरं काय ! आणि एवढे देव आहेत, प्रत्येकाला थोड्या थोड्या दिवसांनी glamorous करायचं आणि मग आहेच ! पार कंटाळून गेलोय आम्ही !" 
मी - अरे बापरे ! असं म्हणाले ?? ठीक आहे. चल निघते मी, बरं वाटलं गप्पा मारून ! पुन्हा येईनच ! अच्छा !!
         
         देवळातून बाहेर पडल्यापासून कितीतरी वेळ हाच विचार मनात घोळत  होता. की खरंच; बहुतेक आपण देवांना गृहीत धरतो, आपण  त्यांना 'मोठं' करतो, glamorized करतो, importance देतो....पण  आपल्या सोयीप्रमाणे, आपल्याला हवा तेव्हा, हवं तितकाच काळ !  "celebrities" दर्शन घ्यायला येतात म्हणून  ज्या देवळात एका ठराविक वारी भक्तांची गर्दी होत असेल, तिथे 'गाभाऱ्यात बसलेल्याला' काय वाटत असेल ? ठराविक दिवशी "गुगलने" सुचवलेल्या पहिल्या काही ऑप्शन्समध्ये सुद्धा ज्याचं दर्शन मिळतं, 'त्याला' नंतर काय वाटत असेल ? सोन्याची सिंहासनं, दागिने मिळाल्यानंतर देऊळ बंद असण्याच्या वेळेतही गाभाऱ्याच्या चार कोपऱ्यातून उंचावरून एकटक पाहत असणाऱ्या कॅमेऱ्यांचा 'त्याला' किती राग येत असेल ?? विचार चालूच आहे....