Sunday, February 19, 2017

मेरे प्यारे फाफडाप्रेमियों...!




काल सहकुटुंब छान अभंग-नाट्यगीतांचा आस्वाद घेऊन भोजनार्थ ठाण्यातल्या अगदी मोक्याच्या ठिकाणच्या हॉटेलमध्ये गेलो. वेळ रात्री पावणे अकराची. आम्ही ७ जण होतो पण एकत्र जागा न मिळाल्याने ४ आणि ३ च्या गटात बसलो. जसजशी भैरवीची तिहाईकडे वाटचाल होत होती तसतशी पोटातल्या कावळ्यांची कुजबुज वाढू लागली होती. त्यामुळे आधी ऑर्डर देऊ आणि मग गप्पा सुरु करू असा ठराव एकमताने मंजूर झाला. ऑर्डर दिली गेली, चर्चा सुरु झाली. कोणी कोणतं नाट्यपद कसं मांडलं, 'मी मानापमान' मधली कुठली जागा भावली, 'हे सुरांनो चंद्र व्हा' तीन वेगवेगळ्या गायिका तीन वेगवेगळ्या पद्धतीने कसं सादर करतात इत्यादी. पण पाच-सात मिनिटांतच लक्षात आलं की शेजारच्या टेबलावरच्या 'फाफडाप्रेमीं'चा आवाज इतका वाढलाय की टेबलाच्या अलीकडे आणि पलीकडे बसलेल्या आम्हांला  आमचं बोललेलं काही ऐकू येत नव्हतं. त्यांच्याकडे  एकदा जळजळीत कटाक्ष टाकून झाला तरी काही परिणाम नाही. हॉटेलच्या मॅनेजरने त्यांना येऊन सांगितलं तरी काही फरकच पडत नव्हता. शेवटी न रहावून आवाज वाढवावा लागला आणि त्यांना सांगितलं की बाबांनो, तुम्ही आणि आम्ही आपापल्या कुटुंबीयांबरोबर एकत्र जमल्याचा आनंद आम्हांलाही आहे, हॉटेलच्या कुकने उत्तम चवीचं जेवण केलं आहे ते पाहून आमच्याही रसना उल्हासित झाल्या आहेत पण म्हणून हे हॉटेल म्हणजे तुमच्या घरची डायनिंग रुम नव्हे! समाजातले आणखी काही लोकही इथे येतात. त्यांनाही गप्पा मारायच्या असतात...जमल्यास. त्यावर हेअर स्ट्रेटनिंग आणि नेल आर्ट केलेली तरुण मम्मा म्हणाली, "ये बच्चे आवाज कर रहे है ना.. हम नहीं कर रहे!"
बापरे, अचंबा ! साधारणपणे आपली मुलं ही आपली जबाबदारी असते अशी समजूत असणाऱ्या सामान्य मध्यमवर्गीय घरातल्या मला त्या आईची कीव आली. मुलांऐवजी आधी पालकांना संस्कार वर्गात जाण्याची गरज आहे असं वाटलं ! असो !
--------------------
अलीकडे मुंबई - नागपूर एकटीच प्रवास करत होते. माझ्या बोगीपासून तीन बोगी सोडून पलीकडच्या बोगीत एक ओळखीचे काका काकू आहेत असं कळलं. म्हणून शिळोप्याच्या गप्पा मारायला गेले होते. परत येताना माझ्या मैत्रिणीचा फोन आला. एक एक बोगी पार करत माझ्या सीटजवळ येत होते. अचानक माणसांचा जोरजोरात आवाज आणि हशा. १५ सेकंद ती बोगी पार करेपर्यंत ना मला मैत्रिणीचा आवाज ऐकू येत होता ना तिला माझा. १० 'फाफडाप्रेमी' काहीतरी भरभक्कम हादडत आजूबाजूच्यांची तमा न बाळगता जोरजोरात बोलत होते. तेवढी बोगी पार केल्यावर पुन्हा अप्रतिम शांतता. मैत्रिण मला म्हणाली, "जिलबी-फाफड्याचा सुगंध दरवळलेला दिसतोय!"
--------------------
मला या लोकांबद्दल मुळीच राग नाही. मी कधीच कुठल्या प्रांतवादात पडत नाही किंवा एखाद्याबद्दल पूर्वग्रहदूषितही नाही. पण अलीकडे असं लक्षात येऊ लागलंय की बहुतांश वेळा हे यांचंच आणि असंच सुरु असतं. बरं, यांच्याबरोबर मुलं असतात. मुलं आपल्या आईवडिलांना कायमच तारसप्तकात बोलताना पाहत आलेली असतात. त्यामुळे आयुष्यात तेही तारसप्तकाचीच वाट धरतात. मध्य सप्तकात असलेली इज का अनुभवत नाहीत हे ? बरं आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो हे यांच्या गावी नसतंच. त्यामुळे एक कळकळीची विनंती -
"मेरे प्यारे फाफडाप्रेमियों, कृपया ध्वनीप्रदूषण ना करें. कई बार अपने आसपास ऐसे लोग उपस्थित होते है जिन्हें आपकी आवाजसे तकलीफ होती है. अपने घर में जितना चाहे ऊंची आवाज में बात करें, कोई आपको डिस्टर्ब् नहीं करेगा. पर पब्लिक प्लेस मे बात करते वक्त एक बार मेरी ये विनम्रतापूर्वक याचना के बारेमे जरूर सोचिये. थँक यू...... इन ऍडव्हान्स ! 

ता. क. यांच्या निमित्ताने हे इतरांनाही जनहितार्थ लागू.   

No comments:

Post a Comment