शाळेत असताना सोडवलेल्या 'कोण कोणास म्हणाले' ह्या प्रश्नाची प्रचिती प्रत्यक्षात करून देणारा प्रसंग आपल्याला रेल्वे प्रवासात रोज पहायला मिळतो. 'कोणाची सीट कोणी कोणाला कधी सांगितली' ह्यावरून रोज भांडणस्वरूपी चर्चा हमखास रंगतात. तशीच एक 'महाचर्चा' परवा सुद्धा सुरु होती. ह्याच सगळ्या सावळ्यागोंधळातून मार्ग काढत एका सत्तरीच्या आजींनी मात्र 'चौथ्या सीट'वर आपला शिक्कामोर्तब केला. समोरच्या चौथ्या सीटवर मी बसले होते. ट्रेनमध्ये असूनसुद्धा 'एकाच नावेतले प्रवासी' असल्यागत आमची दोघींचीही अवस्था होती. त्या रेल्वे डब्यातल्या 'गर्दी'रुपी लाटा आमचं 'स्थान' डळमळीत करण्याच्या प्रयत्नात होत्या. त्यामुळे केवळ नजरेतून एकमेकींना सहानुभूती दर्शवत त्या आजी आणि मी एकमेकींकडे बघून हसलो. पुढच्या एक-दीड मिनिटांतच आजी म्हणाल्या. " काय गं, आता भांडूप येईल ना ?" मी म्हंटलं " नाही आजी, आधी मुलुंड, मग नाहूर आणि नंतर भांडूप येईल" आजी - "अच्छा ! मग भांडूप नंतर काय ?" "भांडूप नंतर कांजूर येईल" आजी म्हणाल्या "बरं ! Thank You !" झालं...आमचं संभाषण तिथे संपलं. मुलुंड आलं. गर्दी वाढली. दोन सीट्सच्या मधल्या जागा थाटमाट केलेल्या ललनांनी व्यापून टाकल्या. त्या गर्दीत समोर बसलेल्या आजी दिसेनाश्या झाल्या. मुलुंडहून ट्रेन सुटली. मी सर्वसामान्य मुंबईकर मुला-मुलींप्रमाणे माझ्या कर्णपटलांवर हेडफोन्सची आरास करून गाणी ऐकण्यात मश्गूल झाले. कानातले विकणाऱ्या बायका, खाद्यपदार्थ विकणारी मंडळी, चाप, अंगठ्या, घरगुती उपयोगी वस्तू विकणारे यांची मांदियाळी होती. काही बायका भांडण्यात बिझी होत्या तर काही खरेदी करण्यात. पलीकडच्या कम्पार्टमेंट मधल्या 'स्तोत्र' म्हणणाऱ्या आणि अलीकडच्या कम्पार्टमेंट मधल्या 'गाणी' म्हणणाऱ्या दोन गटांमध्ये रंगलेली जुगलबंदी श्रवणीय होती. एखादी गजरे विकणारी छोटी मुलगी वातावरण सुवासिक करून जात होती आणि ह्या सगळ्यात न चुकता "पुढील स्टेशन नाहूर, अगला स्टेशन नाहूर, Next station Nahur" हे ती अनाउन्सर मात्र अगदी बजावून सांगत होती.
रेल्वेतली नित्यकर्म सुरळीतपणे पार पडत होती. तेवढ्यात त्या गर्दीतून अचानक एका हाताने मला हलवलं. त्या बाईंना शोधण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. पण सकाळी ९.१७ च्या जलद लोकलमध्ये ते अशक्य झालं तर त्यात नवल नाही ! त्या बाई काही मला दिसेनात. माझी ही धडपड चालू असतानाच मध्ये उभ्या असलेल्या बाईंच्या पलीकडून मोठ्याने हसण्याचा आवाज आला - "अगं ए मुली, अनाउन्समेंट करणारी ही बाई 'नाहूर' म्हणत्ये, मगाचपासून मी 'अगला स्टेशन 'नागपूर'च ऐकत होते !" पुन्हा एकदा खळखळून हास्य ! पुढचं स्टेशन आलं. गर्दी कमी झाली. मी घाईघाईने त्या आजीना शोधू लागले. पण त्या गर्दीतून उतरून गेलेल्या !
त्या आजी उतरून गेल्यानंतरसुद्धा बराच वेळ त्यांचं ते मनमोकळं हसू मनात कितीतरी वेळ मनात रेंगाळत होतं. स्वत:ची झालेली फजिती एका अनोळखी मुलीबरोबर शेअर करताना त्यांनी त्या प्रसंगातून मिळवलेला आनंद तुम्हा-आम्हाला कदाचित 'लाफ्टर क्लब'मध्ये जाऊन मिळणार नाही. टेन्शन्स, प्रॉब्लेम्स कोणाला नसतात हो ? "आज कॉलेजला जाताना कोणते कपडे घालू ?" इथपासून ते 'होम लोन फेडताना उडणारी 'आर्थिक तारांबळ' ह्या सगळ्या चिंतांची गणितं डोक्यात एकाच वेळी सोडवली जात असतात. पण ह्या सगळ्याला सामोरं जायचं म्हणजे कसल्यातरी 'बूस्टची' गरज असते. गाडीत जसं पेट्रोल घातलं की ती आपल्याला हव्या त्या स्पीडने हाकता येते, तसंच आनंदाचे चार क्षण शोधले की दिवसभराच्या कष्टांचं काही वाटेनासं होऊन जातं ! किंवा जसं ऑफिसमधून दमून घरी येत असताना सीटसाठी भांडणं करण्याची मानसिक तयारी करूनच आपण ट्रेन मध्ये पाउल टाकतो. अपेक्षेप्रमाणे ते क्षण आपल्या वाट्याला येतातच. भांडणं चालू असतानाच शाळेतली एखादी मैत्रीण आपल्याला अनेक वर्षांनी भेटते आणि मग आपण त्या भांडणाऱ्या बाईला तोंड वाकडं करून 'बस तूच !' म्हणत पुढचा अख्खा प्रवास उभ्याने आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी आनंदाने करतो. थोडक्यात काय, तर आनंद हा आपल्या शोधण्यावर आणि मानण्यावर आहे ! काही जणांना आनंदातही दु:ख बोचत असतं पण काही जण मात्र दु:खातही आनंद शोधून तो साजरा करण्यात रममाण असतात ! Choice is yours !
किती छान विचार चालू होता तेवढ्यात आलंच कोणीतरी..."शुक शुक....कुठे उतरणार तुम्ही ?? तुमची सीट मला द्या हं !" शुकशुकणाऱ्या बाईंनी माझ्या विचारमंथनातून मला बाहेर काढल्यामुळे कानात वाजत असलेल्या गाण्याकडे लक्ष गेलं...शब्द होते -
"कधी ऊन झेलले कधी तृप्त चांदण्यांत, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत !"
पुन्हा एकदा आजींची आठवण आली !! आजी, thank you so much !! आज तुमच्यामुळे केवढा छान विचार केला गेला ! अशाच छोट्या-छोट्या गोष्टींमधून आनंद शोधत कायम enjoy करत राहा !! God bless you ! :)
पुन्हा एकदा आजींची आठवण आली !! आजी, thank you so much !! आज तुमच्यामुळे केवढा छान विचार केला गेला ! अशाच छोट्या-छोट्या गोष्टींमधून आनंद शोधत कायम enjoy करत राहा !! God bless you ! :)
Great thought.. I am your FAN !!
ReplyDelete:D
Hiii dada !!!!! Its a surprise for me !! khup chan vatla tuzi comment pahun !! :)and thank you so much !! :)
Deleteनिखीलशी सहमत... एक चांगला विचार तुझ्या पोस्टच्या निमित्ताने वाचावयास मिळाला.
ReplyDeleteलिहिणं थांबवू नकोस...
तुझ्या लिखाणातली सहजता आणि प्रसंग खुलवण्याची खुबी उत्तम ……दररोज घडणाऱ्या या प्रसंगांचा एक विचार बनवून तो गोष्टीतून छान मांडला आहेस …ख़रच छान लिहिला आहेस ….तुझ्या लिखाणात खरच वसंताचा ताजेपणा आहे … अशीच लिहित रहा...!!
ReplyDelete