Monday, June 16, 2014

आठवणींची इन्वेस्टमेंट

               "नक्की भेटू", "सॉरी, मी बिझी आहे गं", "काय करू, माझा नाईलाज आहे, कामाच्या व्यापात नाही देता येत वेळ" अशी अनेक वाक्य आपल्याला पदोपदी ऐकू येत असतात. त्यावर आपण "I am gonna miss it !" चं कनवाळू लेबल चिकटवतो. या सगळ्या वाक्यांमागचा सूत्रधार असतो तो आपल्या सगळ्यांकडे असलेला 'अपुरा वेळ'. 

                      एका कवितेत जावेद अख्तर साहेब म्हणालेत  -
"ज़िंदगी की कश्मकश में 
वैसे तो मै भी काफ़ी बिजी हूँ , 
लेकिन वक्त का बहाना बना कर 
अपनोंको भूल जाना मुझे आज भी नहीं आता।"
                 
             काय सुंदर लिहिलंय ! प्रत्येक वेळी आपल्याला मुद्दाम विसरायचं किंवा टाळायचं असतंच असं नाही. नेहमी 'वक्त का बहाना' 'बनवतच' असू असं नाही. पण तरी बहुतेकदा बहाना असतो मात्र वेळेचाच ! 
                 
         मध्यंतरी माझा हा 'वेळेचा बहाणा' मला आयुष्यभराची चुटपूट लावून गेला. माझी एक बालमैत्रीण आहे - अवनी. तिची आजी आजारी होती. अवनी आणि मी लहानपणी एकत्र खेळायचो तेव्हा आजीने केवढे लाड पुरवलेत आमचे ! साठवलेल्या पैशांतून आईस्क्रीम आणून दे, मे महिन्याच्या सुट्टीत बालनाट्यांना घेऊन जा, तर कधी घरच्या घरी अगदी साधे साधे पण अतिशय प्रेमाने आमचे लाड करायची आजी. त्या दिवशी आजी आजारी आहे हे सांगायला अवनीचा फोन आला. "बापरे ! काळजी घे गं ! आजीला भेटून जाईन मी. सध्या जाम हेक्टिक शेड्युल आहे गं. त्यामुळे नक्की कधी येईन सांगत नाही आत्ता. नाहीतर आजी बिचारी वाट बघत बसेल. पण काहीतरी जुगाड करते आणि येउन जाते." असं म्हणून फोन ठेवला आणि ठरलेली लोकल पकडायला धावले. नंतर दोन दिवस लक्षात होतं आजीला भेटायला जायचं. पण १०-१२ तास काम करून आल्यावर रात्री अंगात काही त्राणच उरले नव्हते. अवनीला मेसेज केला - "अवने, १-२ दिवसांत येते आजीला भेटायला। सरप्राईज देईन. आनंद होईल तिला. तू आधी सांगू नकोस मी येत्ये ते. चल, Bye..gn tc!"
मेसेज करून कधी गाढ झोपले कळलंच नाही. सकाळी उठून बघते तर पहाटे ३.३० च्या दरम्यान अवनीचा मेसेज आला होता -
"Aaji is no more."
मेसेज वाचून काळजाचं पाणी झालं. प्रचंड वाईट वाटलं आणि राग आला स्वतःचाच. माझ्या "नक्की येते"चा काय उपयोग आता ? कायमची हळहळ लागून राहिली. 
        या एका प्रसंगासारखी आणखी अनेक उदाहरणं आपण रोज अनुभवत असतो पण पुन्हा येरे  माझ्या मागल्या. वेळेबरोबरच्या स्पर्धेत आपण अनेक चांगले क्षण हरवून बसतो; पेक्षा ते आपण आपल्या वाट्याला येउच देत नाही. ते चांगले क्षण कसे 'टिपायचे आणि जगायचे' हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. म्हणजे रोजची वेळ असते तीच असते. पण हे 'रोजचेच पल' कधीतरी 'हसीन' होऊन आले की ते आपल्या कायम लक्षात राहतात. त्यामुळे कधी 'होस्ट' म्हणून तर कधी 'गेस्ट' म्हणून आपण या 'हसीन पलां'चं साक्षीदार झालं पाहिजे नं ! कारण हे 'हसीन पल' म्हणजेच 'चांगल्या आठवणी' आपोआप तयार होत नसतात. त्या आपण तयार करत असतो, असं मला वाटतं. जेव्हा आपण एखाद्या कारणासाठी आपला वेळ खर्ची घालतो (जाणते किंवा अजाणतेपणी) त्यातूनच 'आठवणीं'चा जन्म होतो. 
               आता काही माझ्यासारखी चांगल्या आठवणींमध्ये रमायला आवडणारी मंडळी फार वेळ न दवडता लगेच 'होस्ट' किंवा 'गेस्ट' होण्याची तयारी सुरु करतील कदाचित. पण उरलेल्या मंडळींच्या मनात एक प्रश्न अजूनही उड्या मारत असेल की आठवणी 'क्रिएट' करण्याचा इतका अट्टाहास का ? तर त्यांच्यासाठी म्हणून थोड्या वेगळ्या संकल्पना वापरून उत्तर देते. आपण पैशांची गुंतवणूक करतो, प्रॉपर्टी, सोनं - नाणं, पॉलिस्या असे जे जे सतराशे साठ मार्ग उपलब्ध असतील त्या सगळ्या मार्गांनी आपण स्वतःलाच 'सुरक्षित भविष्याची' हमी देत असतो. which is fair enough. पण या बरोबर 'आठवणींच्या इन्व्हेस्टमेंट'चा विचार केला जात नाही. म्हणजे जेव्हा वयाची साठी - पासष्टी उलटल्यावर आपल्या छानशा टुमदार फार्म हाऊसमध्ये निवांतपणे गप्पा मारायला बसू किंवा एखाद्या उंच टॉवरमध्ये 3BHK चा प्रशस्त flat असेल पण खाली उतरवणार नाही तेव्हा त्या रिकाम्या घरात एकमेकांशी गप्पा मारायला दोघंच असू, तेव्हा आठवणींची केवढी मोठी सोबत असेल. शाळेच्या मित्रांबरोबर एन्जॉय केलेली रि-युनियन पुन्हा त्या बाकांवर नेउन बसवेल. कॉलेजच्या कट्ट्यावर केलेला टाईमपास पुन्हा एकदा तरुण करेल. ऑफिसमध्ये 'sick leave' घेऊन पावसाळ्यात माळशेज घाटावर केलेली धमाल पुन्हा एकदा ताजंतवाणं करेल, भावी जोडीदाराबरोबर लाँग ड्राईव्हच्या गप्पांमध्ये रंगवलेली स्वप्न पूर्ण झालेली पाहून मनस्वी समाधान मिळेल, त्यावेळी कित्येक वर्षांनंतर केलेली छोटीशी फॅमिली ट्रिपसुद्धा किती महत्वाची होती हे आता जाणवेल. त्यामुळे 'वेळ' या भांडवलाच्या गुंतवणुकीतून मिळणारं व्याज म्हणजे 'आठवणी'. 
                
               हे अगदी खरं की वाढत जाणा-या वयाबरोबर, जबाबदा-यांबरोबर बँक बॅलन्सही कसा वाढत जाईल याकडे लक्ष ठेवावं लागतं. आपलं खातं जरा जड होऊ लागलंय असं वाटत नाही तोवर पुढच्या पिढीसाठी कराव्या लागणा-या तरतुदी आ वासून उभ्या असतात. पण तरीही या सगळ्यामध्ये स्वतःला थोडं स्ट्रेच करून स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी वेळ काढला पाहिजे. कारण त्यामुळे होणारी आनंदाची देवाणघेवाण इतर कोणत्याही 'एक्स्पेन्सिव' ब्रॅण्डेड गिफ्टपेक्षा अधिक 'वॅल्युएबल' असेल. आणि एकदा निघून गेलेली वेळ 'ते तेव्हा करायचं राहूनच गेलं' या वाक्याचं कितीही वेळा पारायण केलं तरी परत येत नाही ! म्हणून त्या आपल्या आनंदी फ्युचरसाठी केलेली ही 'आठवणींची इन्वेस्टमेंट'. 
फैय्याज हाश्मी यांनी म्हणून ठेवलंच आहे -
वक़्त की कैद में जिंदगी है मगर 
चंद घड़ियाँ यहीं हैं जो आज़ाद हैं, 
इनको खोकर मेरी जानेजाँ 
उम्रभर ना तरसते रहो !

7 comments:

  1. Vichar far mahatvacha ani titkach mast ahe.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. वक्तके साथ भागते भागते,
    अपनोंका साथ छुट गया.
    शुक्र है उस दौडमे,
    थोडीसी याँदे तो चुनली थी!!!

    ReplyDelete
  4. वा! उत्तम शब्द मांडणी व विचार!👌

    ReplyDelete
  5. सर्वांचे मनःपूर्वक आभार !!! ☺☺

    ReplyDelete