Monday, June 16, 2014

आठवणींची इन्वेस्टमेंट

               "नक्की भेटू", "सॉरी, मी बिझी आहे गं", "काय करू, माझा नाईलाज आहे, कामाच्या व्यापात नाही देता येत वेळ" अशी अनेक वाक्य आपल्याला पदोपदी ऐकू येत असतात. त्यावर आपण "I am gonna miss it !" चं कनवाळू लेबल चिकटवतो. या सगळ्या वाक्यांमागचा सूत्रधार असतो तो आपल्या सगळ्यांकडे असलेला 'अपुरा वेळ'. 

                      एका कवितेत जावेद अख्तर साहेब म्हणालेत  -
"ज़िंदगी की कश्मकश में 
वैसे तो मै भी काफ़ी बिजी हूँ , 
लेकिन वक्त का बहाना बना कर 
अपनोंको भूल जाना मुझे आज भी नहीं आता।"
                 
             काय सुंदर लिहिलंय ! प्रत्येक वेळी आपल्याला मुद्दाम विसरायचं किंवा टाळायचं असतंच असं नाही. नेहमी 'वक्त का बहाना' 'बनवतच' असू असं नाही. पण तरी बहुतेकदा बहाना असतो मात्र वेळेचाच ! 
                 
         मध्यंतरी माझा हा 'वेळेचा बहाणा' मला आयुष्यभराची चुटपूट लावून गेला. माझी एक बालमैत्रीण आहे - अवनी. तिची आजी आजारी होती. अवनी आणि मी लहानपणी एकत्र खेळायचो तेव्हा आजीने केवढे लाड पुरवलेत आमचे ! साठवलेल्या पैशांतून आईस्क्रीम आणून दे, मे महिन्याच्या सुट्टीत बालनाट्यांना घेऊन जा, तर कधी घरच्या घरी अगदी साधे साधे पण अतिशय प्रेमाने आमचे लाड करायची आजी. त्या दिवशी आजी आजारी आहे हे सांगायला अवनीचा फोन आला. "बापरे ! काळजी घे गं ! आजीला भेटून जाईन मी. सध्या जाम हेक्टिक शेड्युल आहे गं. त्यामुळे नक्की कधी येईन सांगत नाही आत्ता. नाहीतर आजी बिचारी वाट बघत बसेल. पण काहीतरी जुगाड करते आणि येउन जाते." असं म्हणून फोन ठेवला आणि ठरलेली लोकल पकडायला धावले. नंतर दोन दिवस लक्षात होतं आजीला भेटायला जायचं. पण १०-१२ तास काम करून आल्यावर रात्री अंगात काही त्राणच उरले नव्हते. अवनीला मेसेज केला - "अवने, १-२ दिवसांत येते आजीला भेटायला। सरप्राईज देईन. आनंद होईल तिला. तू आधी सांगू नकोस मी येत्ये ते. चल, Bye..gn tc!"
मेसेज करून कधी गाढ झोपले कळलंच नाही. सकाळी उठून बघते तर पहाटे ३.३० च्या दरम्यान अवनीचा मेसेज आला होता -
"Aaji is no more."
मेसेज वाचून काळजाचं पाणी झालं. प्रचंड वाईट वाटलं आणि राग आला स्वतःचाच. माझ्या "नक्की येते"चा काय उपयोग आता ? कायमची हळहळ लागून राहिली. 
        या एका प्रसंगासारखी आणखी अनेक उदाहरणं आपण रोज अनुभवत असतो पण पुन्हा येरे  माझ्या मागल्या. वेळेबरोबरच्या स्पर्धेत आपण अनेक चांगले क्षण हरवून बसतो; पेक्षा ते आपण आपल्या वाट्याला येउच देत नाही. ते चांगले क्षण कसे 'टिपायचे आणि जगायचे' हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. म्हणजे रोजची वेळ असते तीच असते. पण हे 'रोजचेच पल' कधीतरी 'हसीन' होऊन आले की ते आपल्या कायम लक्षात राहतात. त्यामुळे कधी 'होस्ट' म्हणून तर कधी 'गेस्ट' म्हणून आपण या 'हसीन पलां'चं साक्षीदार झालं पाहिजे नं ! कारण हे 'हसीन पल' म्हणजेच 'चांगल्या आठवणी' आपोआप तयार होत नसतात. त्या आपण तयार करत असतो, असं मला वाटतं. जेव्हा आपण एखाद्या कारणासाठी आपला वेळ खर्ची घालतो (जाणते किंवा अजाणतेपणी) त्यातूनच 'आठवणीं'चा जन्म होतो. 
               आता काही माझ्यासारखी चांगल्या आठवणींमध्ये रमायला आवडणारी मंडळी फार वेळ न दवडता लगेच 'होस्ट' किंवा 'गेस्ट' होण्याची तयारी सुरु करतील कदाचित. पण उरलेल्या मंडळींच्या मनात एक प्रश्न अजूनही उड्या मारत असेल की आठवणी 'क्रिएट' करण्याचा इतका अट्टाहास का ? तर त्यांच्यासाठी म्हणून थोड्या वेगळ्या संकल्पना वापरून उत्तर देते. आपण पैशांची गुंतवणूक करतो, प्रॉपर्टी, सोनं - नाणं, पॉलिस्या असे जे जे सतराशे साठ मार्ग उपलब्ध असतील त्या सगळ्या मार्गांनी आपण स्वतःलाच 'सुरक्षित भविष्याची' हमी देत असतो. which is fair enough. पण या बरोबर 'आठवणींच्या इन्व्हेस्टमेंट'चा विचार केला जात नाही. म्हणजे जेव्हा वयाची साठी - पासष्टी उलटल्यावर आपल्या छानशा टुमदार फार्म हाऊसमध्ये निवांतपणे गप्पा मारायला बसू किंवा एखाद्या उंच टॉवरमध्ये 3BHK चा प्रशस्त flat असेल पण खाली उतरवणार नाही तेव्हा त्या रिकाम्या घरात एकमेकांशी गप्पा मारायला दोघंच असू, तेव्हा आठवणींची केवढी मोठी सोबत असेल. शाळेच्या मित्रांबरोबर एन्जॉय केलेली रि-युनियन पुन्हा त्या बाकांवर नेउन बसवेल. कॉलेजच्या कट्ट्यावर केलेला टाईमपास पुन्हा एकदा तरुण करेल. ऑफिसमध्ये 'sick leave' घेऊन पावसाळ्यात माळशेज घाटावर केलेली धमाल पुन्हा एकदा ताजंतवाणं करेल, भावी जोडीदाराबरोबर लाँग ड्राईव्हच्या गप्पांमध्ये रंगवलेली स्वप्न पूर्ण झालेली पाहून मनस्वी समाधान मिळेल, त्यावेळी कित्येक वर्षांनंतर केलेली छोटीशी फॅमिली ट्रिपसुद्धा किती महत्वाची होती हे आता जाणवेल. त्यामुळे 'वेळ' या भांडवलाच्या गुंतवणुकीतून मिळणारं व्याज म्हणजे 'आठवणी'. 
                
               हे अगदी खरं की वाढत जाणा-या वयाबरोबर, जबाबदा-यांबरोबर बँक बॅलन्सही कसा वाढत जाईल याकडे लक्ष ठेवावं लागतं. आपलं खातं जरा जड होऊ लागलंय असं वाटत नाही तोवर पुढच्या पिढीसाठी कराव्या लागणा-या तरतुदी आ वासून उभ्या असतात. पण तरीही या सगळ्यामध्ये स्वतःला थोडं स्ट्रेच करून स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी वेळ काढला पाहिजे. कारण त्यामुळे होणारी आनंदाची देवाणघेवाण इतर कोणत्याही 'एक्स्पेन्सिव' ब्रॅण्डेड गिफ्टपेक्षा अधिक 'वॅल्युएबल' असेल. आणि एकदा निघून गेलेली वेळ 'ते तेव्हा करायचं राहूनच गेलं' या वाक्याचं कितीही वेळा पारायण केलं तरी परत येत नाही ! म्हणून त्या आपल्या आनंदी फ्युचरसाठी केलेली ही 'आठवणींची इन्वेस्टमेंट'. 
फैय्याज हाश्मी यांनी म्हणून ठेवलंच आहे -
वक़्त की कैद में जिंदगी है मगर 
चंद घड़ियाँ यहीं हैं जो आज़ाद हैं, 
इनको खोकर मेरी जानेजाँ 
उम्रभर ना तरसते रहो !

Monday, October 8, 2012

"हृदयातला वसंत"


                शाळेत असताना सोडवलेल्या 'कोण कोणास म्हणाले' ह्या प्रश्नाची प्रचिती प्रत्यक्षात करून देणारा प्रसंग आपल्याला रेल्वे प्रवासात रोज पहायला मिळतो. 'कोणाची सीट कोणी कोणाला कधी सांगितली' ह्यावरून रोज भांडणस्वरूपी चर्चा हमखास रंगतात. तशीच एक 'महाचर्चा' परवा सुद्धा सुरु होती. ह्याच सगळ्या सावळ्यागोंधळातून मार्ग काढत एका सत्तरीच्या आजींनी मात्र 'चौथ्या सीट'वर आपला शिक्कामोर्तब केला. समोरच्या चौथ्या सीटवर मी बसले होते. ट्रेनमध्ये असूनसुद्धा 'एकाच नावेतले प्रवासी' असल्यागत आमची दोघींचीही अवस्था होती. त्या रेल्वे डब्यातल्या 'गर्दी'रुपी लाटा आमचं 'स्थान' डळमळीत करण्याच्या प्रयत्नात होत्या. त्यामुळे केवळ नजरेतून एकमेकींना सहानुभूती दर्शवत त्या आजी आणि मी एकमेकींकडे बघून हसलो. पुढच्या एक-दीड मिनिटांतच आजी म्हणाल्या. " काय गं, आता भांडूप येईल ना ?" मी म्हंटलं  " नाही आजी, आधी मुलुंड, मग नाहूर आणि नंतर भांडूप येईल" आजी - "अच्छा ! मग भांडूप नंतर काय ?" "भांडूप नंतर कांजूर येईल" आजी म्हणाल्या "बरं ! Thank You !" झालं...आमचं संभाषण तिथे संपलं. मुलुंड आलं. गर्दी वाढली. दोन सीट्सच्या मधल्या जागा थाटमाट केलेल्या ललनांनी व्यापून टाकल्या. त्या गर्दीत समोर बसलेल्या आजी दिसेनाश्या झाल्या. मुलुंडहून ट्रेन सुटली. मी सर्वसामान्य मुंबईकर मुला-मुलींप्रमाणे माझ्या कर्णपटलांवर हेडफोन्सची आरास करून गाणी ऐकण्यात मश्गूल झाले. कानातले विकणाऱ्या बायका, खाद्यपदार्थ विकणारी मंडळी, चाप, अंगठ्या, घरगुती उपयोगी वस्तू विकणारे यांची मांदियाळी होती. काही बायका भांडण्यात बिझी होत्या तर काही खरेदी करण्यात. पलीकडच्या कम्पार्टमेंट मधल्या 'स्तोत्र' म्हणणाऱ्या आणि अलीकडच्या कम्पार्टमेंट मधल्या 'गाणी' म्हणणाऱ्या दोन गटांमध्ये रंगलेली जुगलबंदी श्रवणीय होती. एखादी गजरे विकणारी छोटी मुलगी वातावरण सुवासिक करून जात होती आणि ह्या सगळ्यात न चुकता "पुढील स्टेशन नाहूर, अगला स्टेशन नाहूर, Next station Nahur" हे ती अनाउन्सर मात्र  अगदी बजावून सांगत होती.
              रेल्वेतली नित्यकर्म सुरळीतपणे पार पडत होती. तेवढ्यात त्या गर्दीतून अचानक एका हाताने मला हलवलं. त्या बाईंना शोधण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. पण सकाळी ९.१७ च्या जलद लोकलमध्ये ते अशक्य झालं तर त्यात नवल नाही ! त्या बाई काही मला दिसेनात. माझी ही धडपड चालू असतानाच मध्ये उभ्या असलेल्या बाईंच्या पलीकडून मोठ्याने हसण्याचा आवाज आला - "अगं ए मुली, अनाउन्समेंट करणारी ही बाई 'नाहूर' म्हणत्ये, मगाचपासून मी 'अगला स्टेशन 'नागपूर'च ऐकत होते !" पुन्हा एकदा खळखळून हास्य ! पुढचं स्टेशन आलं. गर्दी कमी झाली. मी घाईघाईने त्या आजीना शोधू लागले. पण त्या गर्दीतून उतरून गेलेल्या !
           त्या आजी उतरून गेल्यानंतरसुद्धा बराच वेळ त्यांचं ते मनमोकळं हसू मनात कितीतरी वेळ मनात रेंगाळत होतं. स्वत:ची झालेली फजिती एका अनोळखी मुलीबरोबर शेअर करताना त्यांनी त्या प्रसंगातून मिळवलेला आनंद तुम्हा-आम्हाला कदाचित 'लाफ्टर क्लब'मध्ये जाऊन मिळणार नाही. टेन्शन्स, प्रॉब्लेम्स कोणाला नसतात हो ? "आज कॉलेजला जाताना कोणते कपडे घालू ?" इथपासून ते 'होम लोन फेडताना उडणारी 'आर्थिक तारांबळ' ह्या सगळ्या चिंतांची गणितं डोक्यात एकाच वेळी सोडवली जात असतात. पण ह्या सगळ्याला सामोरं जायचं म्हणजे कसल्यातरी 'बूस्टची' गरज असते. गाडीत जसं पेट्रोल घातलं की ती आपल्याला हव्या त्या स्पीडने हाकता येते, तसंच आनंदाचे चार क्षण शोधले की दिवसभराच्या कष्टांचं काही वाटेनासं होऊन जातं ! किंवा जसं ऑफिसमधून दमून घरी येत असताना सीटसाठी भांडणं करण्याची मानसिक तयारी करूनच आपण ट्रेन मध्ये पाउल टाकतो. अपेक्षेप्रमाणे ते क्षण आपल्या वाट्याला येतातच. भांडणं चालू असतानाच शाळेतली एखादी मैत्रीण आपल्याला अनेक वर्षांनी भेटते आणि मग आपण त्या भांडणाऱ्या बाईला तोंड वाकडं करून 'बस तूच !' म्हणत पुढचा अख्खा प्रवास उभ्याने आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी आनंदाने करतो. थोडक्यात काय, तर आनंद हा आपल्या शोधण्यावर आणि मानण्यावर आहे ! काही जणांना आनंदातही दु:ख बोचत असतं पण काही जण मात्र दु:खातही आनंद शोधून तो साजरा करण्यात रममाण असतात ! Choice is yours !
             किती छान विचार चालू होता तेवढ्यात आलंच कोणीतरी..."शुक शुक....कुठे उतरणार तुम्ही ?? तुमची सीट मला द्या हं !" शुकशुकणाऱ्या बाईंनी माझ्या विचारमंथनातून मला बाहेर काढल्यामुळे कानात वाजत असलेल्या गाण्याकडे लक्ष गेलं...शब्द होते -
"कधी ऊन झेलले कधी तृप्त चांदण्यांत, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत !"
                पुन्हा एकदा आजींची आठवण आली !! आजी, thank you so much !! आज तुमच्यामुळे केवढा छान विचार केला गेला ! अशाच छोट्या-छोट्या गोष्टींमधून आनंद शोधत कायम enjoy करत राहा !! God bless you ! :)

                       

Monday, October 1, 2012

निमित्त - एक Unclicked Photo !


         मध्यंतरी मी आणि माझी मैत्रीण एका कार्यक्रमाला गेलो होतो. कार्यक्रम उत्तम झाला. कार्यक्रम संपल्यावर आम्ही दोघी प्रेक्षागृहाच्या बाहेर आलो. तर 'सो-कुल' असलेली सोनाली कुलकर्णी तिथे उभी होती....चक्क without तिच्या Fans चा गराडा ! ती लिहित असलेल्या सदराची मी प्रामाणिक वाचक असल्याने तिला तिच्या लेखनाबद्दल compliment देण्याचा मोह आवरता आला नाही. मी तिला भेटायला गेले; मैत्रीण काही आली नाही...
"Hi ! मी भक्ती आठवले. तुझं सदर मी नेहमी वाचते. खूपच छान असतं. रोजच्या अनुभवांमधून आकाराला आलेला एक विचार आणि तोही अगदी सोप्या शब्दांत मांडतेस तू... त्यामुळे माझ्यासाठी ती एक treat असते ! खूप खूप शुभेच्छा तुला !" कित्त्ती गोssड हसली म्हणून सांगू ती !! :)
"अरे वा !! thank you so much भक्ती ! keep reading ! भेटू पुन्हा ! take care"
संभाषण संपलं...मी मैत्रिणीजवळ परत आले.
मैत्रीण - "अगं भक्ती, एक फोटो काढून घे ना सोनाली बरोबर !" 
मी - "छे ! फोटो कशाला काढून घ्या ?"
मैत्रीण - "अगं, चल ना मी काढते तुमचा फोटो. तू फक्त उभी रहा."
मी - "पण कशासाठी ? मला नाही आवडत असं - ओ, मला ना तुमच्याबरोबर एक फोटो काढायचा आहे."
मैत्रीण - "एवढं काय त्यात ?"
मी - "अगं तिच्याबरोबर कार्यक्रम करून मग फोटो काढला तर गोष्ट वेगळी ! पण असे काय रोज छप्पन्न जणं तिच्याबरोबर फोटो काढत असतील. त्यातलीच मी एक. तिच्याबरोबर फोटो काढण्यात माझं काय एवढं मोठेपण ??"
मैत्रीण - "शी बाबा ! वेडी आहेस तू ! मला तुझा राग आला आहे."
मी - "हे हे हे ! अगं रागवू नकोस....पण मला तिला तिच्या कामाकरता compliment दिल्यानंतर जे समाधान मिळेल ते तिच्याबरोबर फोटो काढून नाही मिळणार ! म्हणून गं !"
          बापरे....कसातरी हसत खेळत तो विषय तिथे संपवला. दोघीही आपापल्या  घरी जायला निघालो. मी ट्रेन मध्ये बसले...आणि नंतर आपसूकच विचार चालू झाला. ट्रेनचा प्रवास हे असले विचार-बिचार करण्यासाठी अगदी उत्तम वेळ असतो; अर्थात बसायला छानशी सीट मिळाली तर !
          असो...तर सांगण्याचा मुद्दा असा की 'सोनाली कुलकर्णी बरोबर फोटो काढण्याचा माझ्या मैत्रिणीचा एवढा आग्रह का होता ? आपल्याबरोबर एक आठवण असावी म्हणून सांगत होती का ? "पण खरंच तुम्ही अगदी मनापासून दाद दिली असेल तर तुमच्या भेटीचा 'episodic photograph' मनाच्या ROM मध्ये कायमचा store होतोच !! त्यासाठी पुराव्याची गरज नसते"....मग मला मित्र-मैत्रिणींमध्ये कॉलर ताठ करून फिरता यावं म्हणून म्हणत असेल का ती ? "पण सोनाली कुलकर्णी ग्रेट असली तरी फोटोसाठी तिच्याशेजारी २५ सेकंद उभं  राहिल्याने ती शेजारची व्यक्ती सुद्धा ग्रेट होत नसते नं ??!!".....मग माझ्या मैत्रिणीला सोनाली कुलकर्णीला जवळून पहायचा होतं का ?? "अगं पण मग यायचं की माझ्याबरोबर ! 'कॅमेरा zoom होण्याची सवय असते त्यांना; अजिबात conscious न होता !".....का आजच्या 'presentation' च्या काळात तुमची कोणाकोणाशी ओळख (???) आहे, ह्यावारूनही तुमचा भाव वधारतो म्हणून म्हणत असेल ती ? "अरे पण मग जर हाच सामान्य हेतू असेल तर फक्त फोटो काढण्यापेक्षा तिच्याशी बोलल्याने आपण तिच्या 'photographic memory' मध्ये save होण्याचे chances जास्त असू शकतात !" हुशss...उलट-सुलट अनेक प्रश्न 'पाडून' झाले, स्वत:ची स्वत:ला उत्तरही दिली;  पण नाही ! काही केल्या मला तिचं म्हणणं 'click' होत नव्हतं ! मग एकदम डोक्यात 'flash' पडला...."अरेच्चा ! मला हे कसं लक्षात आलं नाही तेव्हा ??  जसा मला सोनाली कुलकर्णीशी बोलण्यातून, तिला तिच्या चांगल्या कामाकरता compliment देऊन आनंद मिळाला, तसा माझ्या मैत्रिणीला कदाचित तिचा फोटो काढून मिळाला असता !!  नाही नाही, चुकलंच माझं...आता परत कुठे लगेच भेटणार आहे सोनाली कुलकर्णी ?? मला आवडत नसलं, तरी माझ्या मैत्रिणीसाठी एक फोटो काढायला हवा होता...मी तिच्यसाठी म्हणून एक फोटो काढला असता तर काय बिघडणार होतं ?? काय हरकत होती ?? शी !!! झर्रकन role rewind करावासा वाटला ! पण ती moment मात्र निसटलेली ! खूप कससंच झालं...मनाला चुटपूट लागून राहिली... प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीतून आनंद मिळत असतो...आपला आणि समोरच्या व्यक्तीचा आनंद सारखाच असेल असं नाही ना ! आपल्याला शक्य असेल तर दुसऱ्याच्या आनंदासाठी काहीतरी करण्यातसुद्धा खूप आनंद असतो हे लक्षात आलं ! Anyways, "सखे, sorry for this time ! मी पुढच्या वेळी नक्की फोटो काढेन....केवळ तुझ्यासाठी  !!" :)  

Sunday, July 1, 2012

देवांचेसुद्धा एक एक दिवस असतात...


      status update केली गेली, wall photos टाकले गेले,  mobile uploads झाले, profile pictures बदलली गेली, cover photos दिमाखात झळकले, ring tones खणखणू लागल्या, caller tunes सुद्धा change झाल्या, कार्यक्रमांच्या जाहिराती दिसू लागल्या, photos छापले जाऊ लागले....काय काय म्हणून विचारू नका. सग्गळं अगदी उत्साहात आणि जोरदार चाललेलं.
      
      दुसरा दिवस उजाडला. आणि पुन्हा हेच सगळं झालं - 'status update केली गेली, wall photos टाकले गेले,  mobile uploads झाले, profile pictures बदलली गेली, cover photos दिमाखात झळकले, ring tones खणखणू लागल्या, caller tunes सुद्धा change झाल्या, कार्यक्रमांच्या जाहिराती दिसू लागल्या, photos छापले जाऊ लागले....पण सगळं दुसरंच...वेगळंच ! 'कालच्याचं' कौतुक इतक्यात ओसरलं ? की ते कौतुक नव्हतंच आणि लोकांच्या 'updates च्या वारीत' आपण नसणं हे up to date नसल्याचं लक्षण होतं म्हणून केलं गेलेलं ?? खरंच प्रश्न पडला !
       
       'Glamour' बडी अजब चीज है भैया ! ह्या अशाश्वत जगातल्या क्षणिक गोष्टींपैकी एक गोष्ट ! पण ह्या अशाश्वत गोष्टीत इतकी शक्ती आहे, की तो शाश्वत परमात्मासुद्धा बिचारा ह्यापासून बचावला नाही. हो, कारण हल्ली देवांचा सुद्धा 'Glamour Period' असतो. त्यांच्या त्यांच्या  दिवशी हे सगळे देव, त्यांची त्यांची ठिकाणं, त्यांच्यावर लिहिलेले अभंग, गाणी, कथा इतकंच कशाला; हे सगळं लेखन करणारे संत, कवी सुद्धा प्रसिद्धीच्या झोतात येतात...म्हणजे आपणच आणतो ! एका ठराविक काळात  एखादा देव इतका प्रसिद्ध होतो, इतका 'मोठा' होतो, की बाकीचे ३२ कोटी ९९ लक्ष ९९ हजार ९९९ देव खरोखर त्याचा हेवा करत असतील...किंवा नसतीलही; 'देव जाणे' ! ह्या त्यांच्या त्यांच्या दिवसात त्यांच्यावर सिनेमे निघतात, त्यावर उलट-सुलट चर्चा होतात, परीक्षणं लिहून येतात, अमुक अमुक देवाचा संक्षिप्त आढावा घेणारे लेख छापून येतात, विशेषांक प्रकाशित होतात, एखाद्या देवाचा शोध घेणारी कादंबरी प्रसिद्ध होते, एकाच देवावर असंख्य लहान-मोठे गाण्यांचे कार्यक्रम होतात असं सगळं सुरळीत चालू असतं. 
       
        मी ना एकदा मैत्रिणीच्या गावाला गेलेले. तिने तिथल्या देवळात नेलं. अतिशय शांत, स्वच्छ, छोटंसं देऊळ होतं. आम्ही गेलो तेव्हा कोणीही नव्हतं तिथे. अगदी पुजारीसुद्धा नाही. १० मिनिटं आम्ही दोघी बसलो तिथे, नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली आणि चालू लागलो. पण घरी येताना कितीतरी वेळ मन त्या साध्या देवळातच अडकलं होतं. देवळाच्या दारावर सिक्युरिटी चेकिंग नाही, भक्तांना येण्यासाठी रेड कार्पेट नाही, दाराला कडी-कुलपं नाहीत, देवळाच्या पायऱ्यांवर देणगी देणाऱ्यांची श्रेय नामावली नाही, खांबांवर 'कृपया मूर्तीचे फोटो काढू नयेत' अशा पाट्या रंगवलेल्या नाहीत, काचेची झुंबरं नाहीत की देवळातल्या मूर्तीला हार-तुरे-शाली-फुलं सुद्धा नाहीत ! खरं तर काम-धाम सोडून सारखं 'देव-देव' करत बसणं मला पटत नाही. मनापासून वाटेल तेव्हा देवळात जाऊन त्याला नमस्कार करण्यातलं समाधान मस्टरच्या घाईत घातलेल्या लोटांगणातसुद्धा मिळणार नाही. पण  मला खरंच अगदी मनापासून त्या साध्या देवळातल्या साध्या देवाशी गप्पा माराव्याश्या वाटल्या...होते काही प्रश्न ! दिवस सुद्धा साधाच निवडला. प्रकटदिन नाही की बाकी काहीही नाही ! मैत्रिणीला म्हंटल येते जाऊन देवळात; आवडलं मला देऊळ. देवळात पोहोचले. सुरुवातच केली.
मी - कसा आहेस ??
देव - छान ! मजेत !
मी - मला तुझं देऊळ खूप आवडलं हो, आमच्या शहरात नाही बाबा अशी देवळं बघायला मिळत. 
तो हसलाच आणि म्हणाला, हं...तुला आवडलं ना, येत जा मग इथे येशील तेव्हा !
मी - हो नक्की ! बरं, मला सांग इथे कोणी पुजारी वैगरे नाही का ?? दानपेटी नाही, तुझ्या गळ्यात फुलांच्या माळा सुद्धा नाहीत रे ! का असं ?
पुन्हा हसला आणि म्हणाला, "अगं पुजाऱ्याची गरजच काय ? दिवसाकाठी जी काही दोन-चार माणसं येतात, ती त्यांना वाटलं म्हणून येतात, त्यांना वाटलं म्हणून मनापासून नमस्कार करतात, तुझ्यासारखे काही गप्पा मारायला बसतात; हेच माझे खरे पुजारी आणि त्यांचा मन:पूर्वक नमस्कार; हीच माझी दक्षिणा !
मी - हं ! पण मग तुला कधी असं वाटत नाही का, की मोठमोठ्या शहरातल्या देवांना इतकी प्रसिद्धी मिळते, लोकं भल्यामोठ्या रांगा लावतात, इतकी सुंदर रोषणाई असते, रोज सुंदर सुंदर वस्त्र, अलंकार मिळतात त्यांना ! तुला वाईट नाही वाटत ?
तो हसला आणि म्हणाला, "छे गं ! त्यांना कुठे भक्तांशी निवांत गप्पा मारता येतात ? त्यांना कडीकुलपात बंदिस्त रहावं लागतं आणि मी बघ ! आणि आता विषय निघालाच म्हणून एक खासगीतली गोष्ट सांगतो, परवाच माझं त्यांच्याशी बोलणं झालं. बिचारे फार कंटाळलेले दिसत होते. 'frustrate' का काय झालो म्हणत होते. म्हंटल, "का बाबा ? काय झालं तुम्हाला ?" तर म्हणाले की "ही लोकं आम्हाला काय हवंय विचारतच नाहीत. प्रकटदिन आमचे, उत्सव आमचे करतात  पण ह्यांच्या हरप्रकारच्या हौशी भागवून घेतात. देणग्या गोळा करतात, झगमगाट करतात, जेवणावळी घालतात, मोठमोठ्याने गाणी लावतात...आम्हांला काय हवंय; काय नकोय rather हवंय की नकोय काही विचारात नाहीत ! कसलं ना कसलं 'Celebration' करण्याची  संधी हवी असते त्यांना दुसरं काय ! आणि एवढे देव आहेत, प्रत्येकाला थोड्या थोड्या दिवसांनी glamorous करायचं आणि मग आहेच ! पार कंटाळून गेलोय आम्ही !" 
मी - अरे बापरे ! असं म्हणाले ?? ठीक आहे. चल निघते मी, बरं वाटलं गप्पा मारून ! पुन्हा येईनच ! अच्छा !!
         
         देवळातून बाहेर पडल्यापासून कितीतरी वेळ हाच विचार मनात घोळत  होता. की खरंच; बहुतेक आपण देवांना गृहीत धरतो, आपण  त्यांना 'मोठं' करतो, glamorized करतो, importance देतो....पण  आपल्या सोयीप्रमाणे, आपल्याला हवा तेव्हा, हवं तितकाच काळ !  "celebrities" दर्शन घ्यायला येतात म्हणून  ज्या देवळात एका ठराविक वारी भक्तांची गर्दी होत असेल, तिथे 'गाभाऱ्यात बसलेल्याला' काय वाटत असेल ? ठराविक दिवशी "गुगलने" सुचवलेल्या पहिल्या काही ऑप्शन्समध्ये सुद्धा ज्याचं दर्शन मिळतं, 'त्याला' नंतर काय वाटत असेल ? सोन्याची सिंहासनं, दागिने मिळाल्यानंतर देऊळ बंद असण्याच्या वेळेतही गाभाऱ्याच्या चार कोपऱ्यातून उंचावरून एकटक पाहत असणाऱ्या कॅमेऱ्यांचा 'त्याला' किती राग येत असेल ?? विचार चालूच आहे.... 

Sunday, May 13, 2012

आई "FB-कर" होते तेव्हा !

    
    गेल्या एक - दोन  महिन्यांत  तो 'मार्क जूकरबर्ग' सुद्धा कदाचित आश्चर्यचकित झाला असेल कारण ' सौ. आठवले यांचा FB वर सक्रीय सहभाग !' अशी हेडलाईन त्याच्यापर्यंत एव्हाना पोहोचली असेल ! "पुढच्या ५ मिनिटात लॉग आउट झालेलं दिसलं पाहिजे" असं म्हणून माझ्यामागे तगादा लावणारी माझी आई अचानक  'FB-मय' कशी काय झाली ह्याचं राहून राहून मला आश्चर्य वाटत होतं ! पण म्हणतात ना; संगती-संग दोष: ! असो !

      "आधी तो ID आणि पासवर्ड लिहून ठेव कुठेतरी. मी काही रोज  ते FB वापरणार नाही.  त्यामुळे  लक्षात  ठेवायचं म्हणजे कठीणच आहे !" , "उगाच  कशाला आपली सगळी माहिती लिहायची तिथे ? काही नको.  गरजेपुरतं टाक." , "माझा फोटो बिटो लावू नकोस  हं सध्या, नंतर बघू." , "हेच का ते status ? काय लिहू  इथे ?" , "ही कसली माणसांची लिस्ट ?  मी कुठे रिक्वेस्ट पाठवलीये त्यांना ?" "chat  कसं चालू करायचं ?" "रंजना आहे का बघ ना FB वर !"  हुश्श्श ! होलसेल मार्केट  मधून  आणायच्या  सामानाची  लिस्ट  सुद्धा  कमी  असते  ह्या प्रश्नांपेक्षा !  असो.

         मी चौथीत असताना मराठी मध्ये एक धडा होता - 'शाबास माझ्या पुता !' त्या काळच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला 'दहा-बारा' ओळींची उत्तरं असणारा हा पहिला   च  धडा होता. परीक्षेच्या अलीकडचा दिवस होता आणि / म्हणूनच मी फार मन:पूर्वक त्या धड्याच्या प्रश्नांची उत्तरं पाठ करत बसलेले (मराठी विषयाची उत्तरं "पाठ" करायची  नसतात हे सगळं नंतरचं शहाणपण). आई ऑफिस मधून आली. आपली मुलगी एकटीच बसून एवढा मन:पूर्वक अभ्यास करत आहे हे पाहून तिला किती आणि काय काय वाटलं असेल हे  तिचं तीच  जाणो ! तिने माझ्या उत्तराची उंची (quantity आणि quality दोन्ही) पाहून खूप काळजीने विचारलं कि "झालं का उत्तर पाठ ?" आणि नसेल झालं तर कसं कर इत्यादी. पण पुढच्या दहा-पंधरा मिनिटांतच मी तिला ते उत्तर लिहून दाखवलं. तेव्हा तिला झालेला आनंद माझ्या आजही लक्षात आहे ! 
        
     Fb शी तिची ओळख करून देताना लहान बाळाला कसं शिकवतात, अक्षरश: तसं मी तिला सांगत होते ! patience लागतात हो ! सोप्पं काम नाही ! आपल्याला ज्या गोष्टी अगदी सहज येतात त्या नवख्या माणसाला त्याच्या कलेने समजावून सांगणं म्हणजे महाकर्म ! पण माझा FB  चा गाढा अभ्यास असल्याने "अग्गं 'माझे आई' त्या सर्च मध्ये कर्सर ठेव !" असा थोडासा ओरडा आरडा करत आणि ओरडा आरडा केला म्हणून ओरडा खात असं मी ते ट्रेनिंग दोन दिवसातच पूर्ण केलं. पण  'शिक्षक कितीही ओरडला तरी त्याच्या मनात त्या विद्यार्थ्याबद्दल माया असतेच'! असं म्हणे. त्याप्रमाणे मी एका कागदावर FB  उपयुक्त  चार गोष्टी आईच्या नकळतच लिहून  ठेवल्या आणि FB च्या वाट्याला सुद्धा न जाणारी माझी आई 'फेसबुक-करांच्या' घरी सुखा-समाधानाने नांदताना पाहून कित्ती समाधान वाटलं ! अगदी 'राधाच्या' बाबांना वाटतं तस्सं !  मज्जा आली ! 
Happy Mother's Day !! :)

Tuesday, March 13, 2012

thank you "फिर-की" !

       आज काहीतरी लिहावंसं वाटत होतं. पण काय लिहावं सुचता सुचत नव्हतं. भूगोलाच्या पुस्तकात सांगितलं आहे जगाच्या पाठीवर ७५ % पाणी आहे म्हणून आंब्याच्या उकडलेल्या चमचाभर गरात २ ग्लासभर पाणी घालून ते पन्ह म्हणून तुम्हाला प्यायला द्यावं हे मलाच मुळी 'रुचणार नव्हतं' !...... हे काय ! 'काहीतरी लिहायचंय' पासून आपण " 'काहीतरीच' लिहायचं नाही" पर्यंत आलेलो पाहून स्वतःचच आश्चर्य, मग कौतुक आणि शेवटी सुखद धक्का असं सगळं काही घडून गेलं ! तेवढ्यात माझा भ्रमणध्वनी खणखणला. "फिर- की calling " !! 'आता काय समाजसेवा करावी लागणार देवास ठाऊक' असं म्हणतच फोन उचलला. " Hiiiiiiiiiii dear !" "फिर- की !" ला काही activities ची माहिती, काही singing classes ची माहिती आणि प्रामुख्याने काही "CONTACTs" हवे होते. सगळं बोलणं झाल्यावर "फिर- की !" म्हणाली " you are the right person to talk about cultural activities...you are practising so many things at a time. so i was sure that you will help me..that is why i called you...anyways thank you sooooooooo much girly...muaah...you are so sweet ! god bless you !  byee... see you soon !" खरं सांगते,  इतक्या गोड बोलण्याने  मला diabetes होणार की काय असं वाटत होतं ! असो !
         
       "फिर- की !"ने  मदतीसाठी  मला फोन केला म्हणून एका प्रसंगाची आठवण झाली...
         नव्याने झालेल्या welingkars मधल्या मैत्रिणी एकदा गप्पा मारत होतो. साहजिकच कोण कोण काय काय करतं हा विषय निघाला. योगायोगाने मी शेवटी बसलेले रांगेत. एक एक जण सांगत होती - "मैं hip hop करती हुं |" दुसरी म्हणाली "I like shopping maann !! I can do shopping for hours !" (गुज्जूबेन होती हे सांगायला हवं ?!) , तिसरी म्हणाली, "मुझे ऐसा कुछ special शौक नही है|" चौथी बराच वेळ म्हणतच होती - "I like to enjoy my life ! (enjoy var extra stress) I have bunked my classes for hangouts. यु तो हम लोग घरपे झूठ बोलके गोवा भी गए है" मी एक भाबडा प्रश्न टाकला मध्ये - "why झूठ बोलके ?????" मला मुर्खात काढत ती म्हणाली "come on यार, to enjoy ! you know what, जब हमारे parents साथ नाही रेहते ना, we enjoy to the fullest ! just imagine, you - your boyfriend and many other couples, candle light dinner, dance, vodka, party.....wow !" मला धाप लागली. माझ्या बुद्धीच्या बर्र्रर्रर्र्रच पुढचं होतं हे सगळंच ! तिच्या मते तिने माझ्यासमोर एक नवीन 'आदर्श' ठेवलेला पण माझ्यासाठी हे "आदर्श घोटाळ्याच्या" तोडीस तोड होतं ! असो ! हिला travelling चं फारच वेड असल्याने दुसऱ्यांनाही travelling ची आवड लावणाऱ्या तिचं "फिर-की !" हे नाव मी निश्चित केलं !  ती म्हणाली, "its very common यार ! तु बोल...what do you do ??" "I am learning classical music and light vocal music..I have learnt नाट्यसंगीत too . नाट्यसंगीत म्हणजे काय ? अश्या अर्थाच्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या प्रश्नचिन्हाकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष करत पुढे म्हटलं, I have given 6 exams of bharatnattyam, got B grade in Intermediate drawing exam and have acted in some one act plays too." एक मैत्रीण म्हणाली - "wow ! you have done so many things yaar !" मी smile दिली. पण "फिर- की !" म्हणाली, this is good ! but तुने कभी भी lectures bunk नही किये ?? मी म्हटलं, "i have bunked ! एका बार तो हम लोग टीचर के सामनेसे भागके गये थे..एक बार third floor पे presenty लगाके gr floor से घर पे गये थे.. but once in a while ". "फिर-की" चा पुढचा expected प्रश्न - you have boyfriend ?" मी - "no". 'मी किती मागास आहे' अश्यागत माझ्याकडे पाहत "फिर-की" म्हणाली - have you ever gone to picnic like this ? मी -" no , not THIS kind of."  "do you party ??" " no"  "फिर-की" - "that means you have not enjoyed your life Bhakti !"  मला २ गोष्टींचं हसु आलं...पहिली म्हणजे तिचे 'enjoyment चे निकष पाहून' आणि दुसरी गोष्ट म्हणजे "पहिल्याच" भेटीत कोणी कोणाला "तू तुझं LIFE (??) enjoy नाही केलंस" असं कसं काय म्हणू शकतं ?? हि द्रष्टी बिष्टी आहे की काय असं मला वाटलं ! काही न बोलता तिला प्रश्न केला - "can you enjoy various arts ?" "फिर-की" म्हणाली no, but common yar..you had to learn those arts, practice for hours n then face exams ! कौन इतनी मगछमारी करेगा ! उससे अच्छी तो parties है boss !"  मला तिच्या  materialistic attitude चं वाईट वाटलं. " boyfriend , couples, candle light dinner, dance, vodka, party " च्या गोष्टी करणारी ही मुलगी माझ्यापेक्षा "२-३ वर्षांनी लहान" आहे म्हणून तिला 'Enjoyment' म्हणजे काय हे कळलं नसेल असं म्हणून मी माझ्या मनाची समजूत काढली आणि तिला समजेल अश्या भाषेत समजावलं ! असो...देव सगळ्यांचं भलं करो ! 
     
        पण ह्या सगळ्यातून एक चांगलं झालं ! "enjoyment " म्हणजे काय ह्यावर स्वत:शीच छान विचार केला गेला. शिवाय ह्या प्रसंगाच्या आठवणीमुळे लिखाणासारखंच मला गाणं, चित्रकला, फोटोग्राफी, नृत्य, नाटक अश्या काही गोष्टी कळतात ह्याचा आपसूकच अभिमान वाटला. हे सगळं झालं प्रामुख्याने आठवत असलेलं..शिवाय हंगामी मोसामासारखं मेहंदी काढायला शिकणे, decorative pot painting, emboss painting , glass painting, लिखाण करणे, कविता करणे, एकांकिकेत काम करणे इथपासून ते ट्रेकिंग आणि स्विमिंग पर्यंत अनेक गोष्टी त्या त्या वेळी शिकल्या- केल्या त्या वेगळ्या. ह्या अभिमानाच्या मागोमाग ह्या कलांची गोडी लावणाऱ्या आणि काहीही शिकायला कधीही नाही न म्हणणाऱ्या माझ्या आई-बाबांची, ज्यांच्याकडून मी जाणते-अजाणतेपणी ह्या गोष्टी शिकले त्या सगळ्या गुरूंची, मित्र-मैत्रिणींची आठवण आली आणि त्यांचे आभार मानावेसे वाटले. शाळेमध्ये असताना खूप कंटाळा यायचा. आई-बाबांचा रागही यायचा की सगळी मुलं जेवढा वेळ खेळतात तेवढा वेळ मला खेळायला मिळत नाही, सकाळी ८.१५ ला बाहेर पडते ते रात्री ९.३० ला घरी पोहोचते; किती दमायला होतं वगैरे वगैरे. पण आता जर विचार केला तर असं वाटतं की हे एवढं गौडबंगाल तेव्हा मी जमवलं नसतं तर मी तेव्हा आणि आता रिकाम्या वेळात काय केलं असतं ? rather बराच वेळ रिकामाच राहिला असता ! कदाचित काहीतरी फुटकळ केलंही असतं पण तो वेळ आजच्या 'quality time' सारखा नक्कीच नसता. कदाचित "फिर-की" सारखी कुठेतरी फिरायला गेले असते..पण ते क्षणिक असतं ! आज मी मला कसला छंद आहे म्हणून सांगू शकले असते ? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ज्या चार गोष्टींतलं थोडसं काहीतरी कळतं म्हणून स्वतःला आनंद मिळतो, तो आनंद काय असतो हेच माहिती नसतं ! बापरे !!!!
     
        माहितीतल्याच २ गोष्टी नव्याने शिकले ह्या एका प्रसंगातून. पहिली म्हणजे  कलेची आवड असणारे आणि कधीही चांगलं काहीही शिकण्यासाठी "नाही" न म्हणणारे आई- बाबा मिळण्यासाठी नशीब लागतं ! दोन.. कलांच्या आस्वादातून मिळणारा आनंद हा इतर कोणत्याही क्षणिक गोष्टींतून मिळणाऱ्या आनंदापेक्षाखूप जास्त आणि दीर्घायू असतो. 
        so i must say -  thank you "फिर-की" for making me re-think ! :)

Monday, February 6, 2012

एक होता "काळा घोडा" !


       आज अनेक दिवसांनी पुन्हा एकदा 'पांढऱ्यावर काळं' करावसं वाटलं आणि निमित्त होतं "काळा घोडा Arts Festival २०१२" चं ! सतत ३-४ वर्ष ऐकत आलेल्या ह्या 'काळ्या घोड्या'चं दर्शन अखेरीस आज व्हायचं होतं ! भर उन्हात ३ च्या सुमारास मी आणि माझ्या ३ बहिणी - श्रद्धा , अश्विनी आणि तेजू - 'काळा- घोडा' च्या बस थांब्यावर उतरलो. आणि लगेचच एका 'काळ्या कावळ्या'ची भली मोठी प्रतिकृती पहायला मिळाली...हो, घोडा नाही कावळाच होता तो ! सुमित पाटील ह्या आमच्या मित्राने कावळ्याच्या अगदी हुबेहूब प्रतिकृती उभ्या केलेल्या ! कावळ्याला एकच डोळ्याने दिसतं की दोन्ही हा मुद्दा गौण ; पण मी मात्र दोन्ही डोळे भरून ते कावळे पाहून घेतले ! असो ! ह्याच कावळ्यांच्या शेजारी लोकांनी रस्त्यावर टाकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांच्या 'भूलभुलैयात' मुंबईकर कसे अडकले आहेत ह्याचा प्रत्यय देणारा भूलभुलैया होता आणि खरंच; दोन्ही बाजूंनी माणसं भूलभुलैयात शिरल्याने त्या भूलभुलैयाचा हेतू सार्थकी लागला ! त्याच्या बाजूला आपला सगळ्यांचा जिवलग मित्र 'संगणक' उर्फ computer आणि त्याचे सहकारी म्हणजे की-बोर्ड, सी पी यु मधले बारीक-सारीक पार्टस यांपासून Car बनवलेली ! त्या कार वरचा Volkswagen चा तयार केलेला logo मोटारीला realistic feel देत होता ! दोन पाउलं पुढे टाकल्यावर आता कुठे तो "काळा घोडा" दिसला ! चित्रपट, सिनेमामध्ये कसं, "कलाकार - हे, हे, हे, हे  "आणि ..... ते !" असं लिहिलेलं असतं, 'तसंच ह्या घोड्याने आपलं स्थान निश्चित केलेलं असावं' बहुदा ! बाणेदार काळा घोडा त्याच्यावरल्या लहान-मोठ्या काचांमुळे अधिकच handsome दिसत होता !.......थोडक्यात - एकदम "Artistic" !
       आता थोडी आणखी घोडदौड केल्यानंतर आम्ही एका कलापूर्ण रस्त्यावर पोहोचलो ! दोन्ही बाजूनी वेगवेगळ्या कलात्मक वस्तूंचे stalls उभारलेले. चित्रकलेच्या एका मोठ्या Palate मध्ये सगळे रंग ओतून ठेवावेत आणि नंतर आपल्याला हवा तेव्हा हवा तो रंग घेऊन आपल्या कल्पनेप्रमाणे चित्र साकारावं तसं काहीसं 'चित्र होतं' त्या रस्त्याचं ! कलेचे भोक्ते हुंडारत होते नुसते इकडून तिकडून ! चिक्कार foreigners होते, त्यांची गोंडस बाळं होती, वस्तू विकणारे होते, विकत घेणारे होते, फोटो काढणारे होते, काढून घेणारेही  होते....पण सगळेच 'रसिक' होते ! सगळे फक्त कलेचा मनमुराद आनंद लुटताना दिसत होते. कपडे, चपला, पर्सेस, खाण्याचे पदार्थ, दागिने, भेटवस्तू, गृह सजावटीसाठी वस्तू, छोट्या - मोठ्या मूर्त्या, अश्या एक ना अनेक हजारो गोष्टी होत्या...स्त्रियांसाठी तर आंदण मोकळं होतं ! वस्तू घ्यायची असो वा नसो 'स्त्रियांच्या' स्थायीभावाला अनुसरून आम्ही प्रत्येक stall मध्ये डोकावून २-४ वस्तूंबाबत चौकश्या करून मगच बाहेर पडत होतो. अधे -मध्ये खरेदी करत एक - एक stall मागे टाकत वारी पुढे पुढे चाललेली. किमतीबाबत घासाघीस करायचा प्रश्नच नव्हता कारण बऱ्याचश्या वस्तू worth  च होत्या आणि ज्या नव्हत्या असं आम्हाला वाटत होतं; त्या आम्ही घेत नव्हतो !.....थोडक्यात -एकदम "tempting for shoppers" ! 
      
       काही क्षण आपल्या हातात बंदिस्त करून ठेवण्याची क्षमता असणारा 'कॅमेरा' हा सगळ्यांचा सोबती होता. maximum लोकांकडे 'कॅमेरा' होताच ! पण बरेच जण "आपण आपला 'कॅमेरा' घरी कसा काय विसरलो ?!" असं स्वत:लाच दामटवत नाईलाजाने आपापल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून फोटो काढत होते. इतकंच कशाला, काही जण फोटो काढणाऱ्यांचेसुद्धा फोटो क्लिक करत होते ! माझ्या दादाने उदारमनाने त्याचा slr आमच्याकडे सोपवलेला. वेगवेगळे faces, colors, postures, expressions असं सगळं काही टिपून घेता येत होतं. मी पण अनेक दिवसांनी लोकांकडे एका कॅमेऱ्यातून पाहिलं. ती मजाच काही और आहे ! २-३ proud  clicks सुद्धा मिळाले ! सुदैवाने हल्ली 'रोल्स'चे कॅमेरे नसतात नाहीतर बहुतेक मला कॅमेरा सतत 'rolling'वरच ठेवावा लागला असता !...थोडक्यात - एकदम "Clickomania" !
       
       रचना संसद , जे जे स्कूल ऑफ आर्ट यांसारख्या कॉलेजमधल्या लोकांनी वेगवेगळी conceptual models तयार केलेली. उदा. राजकीय भ्रष्टाचार -एक टेबल, एक आरसा आणि टेबलावर दिसणाऱ्या वस्तू आणि टेबलाखालून मिळणाऱ्या वस्तू यांमधून दाखवलेला, झाडांना दोऱ्यांनी बांधलेले fish ponds टांगून त्यात पाणी भरून ठेवलेलं आणि लेझर through जगातल्या काही महत्वाच्या वास्तू निर्माण केलेल्या, गौतम बुद्धांची अधांतरी मूर्ती होती, आणखी बरंच काही......शब्दांत वर्णन करता न येणे म्हणजे काय ते सांगणारं !....थोडक्यात - एकदम "Symbolic" !
       
       ह्या सगळ्या उत्साहाने भरलेल्या आणि भारलेल्या वातावरणातून बाहेरच पडावसं वाटत नव्हतं ! जाणकार रसिकांसाठीची जत्रा होती जणू ती ! पण इथे जर एखादा अरसिक माणूस चुकून आलाच किंवा त्याला 'आणलं गेलं' तर त्याचं काय होईल बरं ? त्याला काय वाटत असेल ? असा विचार मनात उगाचच येऊन गेला आणि अचानक इयत्ता आठवी मध्ये शिकलेलं सुभाषित आठवलं -


साहित्यसंगीतकलाविहीनः साक्षात्पशु पुच्छविषाणहीनः |
तृणं न खादन्नपि जीवमानः तद भागधेयं परमं पशुनाम ||                      

     
थोडक्यात - ?................ सुज्ञासी सांगणे न लगे !