Monday, February 6, 2012

एक होता "काळा घोडा" !


       आज अनेक दिवसांनी पुन्हा एकदा 'पांढऱ्यावर काळं' करावसं वाटलं आणि निमित्त होतं "काळा घोडा Arts Festival २०१२" चं ! सतत ३-४ वर्ष ऐकत आलेल्या ह्या 'काळ्या घोड्या'चं दर्शन अखेरीस आज व्हायचं होतं ! भर उन्हात ३ च्या सुमारास मी आणि माझ्या ३ बहिणी - श्रद्धा , अश्विनी आणि तेजू - 'काळा- घोडा' च्या बस थांब्यावर उतरलो. आणि लगेचच एका 'काळ्या कावळ्या'ची भली मोठी प्रतिकृती पहायला मिळाली...हो, घोडा नाही कावळाच होता तो ! सुमित पाटील ह्या आमच्या मित्राने कावळ्याच्या अगदी हुबेहूब प्रतिकृती उभ्या केलेल्या ! कावळ्याला एकच डोळ्याने दिसतं की दोन्ही हा मुद्दा गौण ; पण मी मात्र दोन्ही डोळे भरून ते कावळे पाहून घेतले ! असो ! ह्याच कावळ्यांच्या शेजारी लोकांनी रस्त्यावर टाकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांच्या 'भूलभुलैयात' मुंबईकर कसे अडकले आहेत ह्याचा प्रत्यय देणारा भूलभुलैया होता आणि खरंच; दोन्ही बाजूंनी माणसं भूलभुलैयात शिरल्याने त्या भूलभुलैयाचा हेतू सार्थकी लागला ! त्याच्या बाजूला आपला सगळ्यांचा जिवलग मित्र 'संगणक' उर्फ computer आणि त्याचे सहकारी म्हणजे की-बोर्ड, सी पी यु मधले बारीक-सारीक पार्टस यांपासून Car बनवलेली ! त्या कार वरचा Volkswagen चा तयार केलेला logo मोटारीला realistic feel देत होता ! दोन पाउलं पुढे टाकल्यावर आता कुठे तो "काळा घोडा" दिसला ! चित्रपट, सिनेमामध्ये कसं, "कलाकार - हे, हे, हे, हे  "आणि ..... ते !" असं लिहिलेलं असतं, 'तसंच ह्या घोड्याने आपलं स्थान निश्चित केलेलं असावं' बहुदा ! बाणेदार काळा घोडा त्याच्यावरल्या लहान-मोठ्या काचांमुळे अधिकच handsome दिसत होता !.......थोडक्यात - एकदम "Artistic" !
       आता थोडी आणखी घोडदौड केल्यानंतर आम्ही एका कलापूर्ण रस्त्यावर पोहोचलो ! दोन्ही बाजूनी वेगवेगळ्या कलात्मक वस्तूंचे stalls उभारलेले. चित्रकलेच्या एका मोठ्या Palate मध्ये सगळे रंग ओतून ठेवावेत आणि नंतर आपल्याला हवा तेव्हा हवा तो रंग घेऊन आपल्या कल्पनेप्रमाणे चित्र साकारावं तसं काहीसं 'चित्र होतं' त्या रस्त्याचं ! कलेचे भोक्ते हुंडारत होते नुसते इकडून तिकडून ! चिक्कार foreigners होते, त्यांची गोंडस बाळं होती, वस्तू विकणारे होते, विकत घेणारे होते, फोटो काढणारे होते, काढून घेणारेही  होते....पण सगळेच 'रसिक' होते ! सगळे फक्त कलेचा मनमुराद आनंद लुटताना दिसत होते. कपडे, चपला, पर्सेस, खाण्याचे पदार्थ, दागिने, भेटवस्तू, गृह सजावटीसाठी वस्तू, छोट्या - मोठ्या मूर्त्या, अश्या एक ना अनेक हजारो गोष्टी होत्या...स्त्रियांसाठी तर आंदण मोकळं होतं ! वस्तू घ्यायची असो वा नसो 'स्त्रियांच्या' स्थायीभावाला अनुसरून आम्ही प्रत्येक stall मध्ये डोकावून २-४ वस्तूंबाबत चौकश्या करून मगच बाहेर पडत होतो. अधे -मध्ये खरेदी करत एक - एक stall मागे टाकत वारी पुढे पुढे चाललेली. किमतीबाबत घासाघीस करायचा प्रश्नच नव्हता कारण बऱ्याचश्या वस्तू worth  च होत्या आणि ज्या नव्हत्या असं आम्हाला वाटत होतं; त्या आम्ही घेत नव्हतो !.....थोडक्यात -एकदम "tempting for shoppers" ! 
      
       काही क्षण आपल्या हातात बंदिस्त करून ठेवण्याची क्षमता असणारा 'कॅमेरा' हा सगळ्यांचा सोबती होता. maximum लोकांकडे 'कॅमेरा' होताच ! पण बरेच जण "आपण आपला 'कॅमेरा' घरी कसा काय विसरलो ?!" असं स्वत:लाच दामटवत नाईलाजाने आपापल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून फोटो काढत होते. इतकंच कशाला, काही जण फोटो काढणाऱ्यांचेसुद्धा फोटो क्लिक करत होते ! माझ्या दादाने उदारमनाने त्याचा slr आमच्याकडे सोपवलेला. वेगवेगळे faces, colors, postures, expressions असं सगळं काही टिपून घेता येत होतं. मी पण अनेक दिवसांनी लोकांकडे एका कॅमेऱ्यातून पाहिलं. ती मजाच काही और आहे ! २-३ proud  clicks सुद्धा मिळाले ! सुदैवाने हल्ली 'रोल्स'चे कॅमेरे नसतात नाहीतर बहुतेक मला कॅमेरा सतत 'rolling'वरच ठेवावा लागला असता !...थोडक्यात - एकदम "Clickomania" !
       
       रचना संसद , जे जे स्कूल ऑफ आर्ट यांसारख्या कॉलेजमधल्या लोकांनी वेगवेगळी conceptual models तयार केलेली. उदा. राजकीय भ्रष्टाचार -एक टेबल, एक आरसा आणि टेबलावर दिसणाऱ्या वस्तू आणि टेबलाखालून मिळणाऱ्या वस्तू यांमधून दाखवलेला, झाडांना दोऱ्यांनी बांधलेले fish ponds टांगून त्यात पाणी भरून ठेवलेलं आणि लेझर through जगातल्या काही महत्वाच्या वास्तू निर्माण केलेल्या, गौतम बुद्धांची अधांतरी मूर्ती होती, आणखी बरंच काही......शब्दांत वर्णन करता न येणे म्हणजे काय ते सांगणारं !....थोडक्यात - एकदम "Symbolic" !
       
       ह्या सगळ्या उत्साहाने भरलेल्या आणि भारलेल्या वातावरणातून बाहेरच पडावसं वाटत नव्हतं ! जाणकार रसिकांसाठीची जत्रा होती जणू ती ! पण इथे जर एखादा अरसिक माणूस चुकून आलाच किंवा त्याला 'आणलं गेलं' तर त्याचं काय होईल बरं ? त्याला काय वाटत असेल ? असा विचार मनात उगाचच येऊन गेला आणि अचानक इयत्ता आठवी मध्ये शिकलेलं सुभाषित आठवलं -


साहित्यसंगीतकलाविहीनः साक्षात्पशु पुच्छविषाणहीनः |
तृणं न खादन्नपि जीवमानः तद भागधेयं परमं पशुनाम ||                      

     
थोडक्यात - ?................ सुज्ञासी सांगणे न लगे !


6 comments:

  1. KHUPACH MASTA!!KALA GHODYALA JAUN ALYASARKHA VATLA....
    N 8VLE TULA 8VITLA SUBHASHIT ":ATHAVALYABADDAL" CONGO...!:P !! LOLZZ

    ReplyDelete
  2. chan lihilays....ata kala ghodala janyachi utsutkta vadhli :D

    ReplyDelete
  3. बघ, ‘माणसाची’ अजून एक व्याख्या :)
    छान लिहिलं आहेस... नवीन आणि ताजं!

    ReplyDelete
  4. कावळ्याला एकच डोळ्याने दिसतं की दोन्ही हा मुद्दा गौण ; पण मी मात्र दोन्ही डोळे भरून ते कावळे पाहून घेतले !
    -----एक नंबर !!

    ReplyDelete