काल संध्याकाळी ट्रेन मधून जात होते. समोर एक ३०-३५ वर्षे वयाच्या बाई बसलेल्या..अगदी सामान्य...फोन वर बोलत होत्या. त्याचं बोलणं ऐकून मीच थोडी nervous झाले..आणि जरी नोट्स वाचत असले तरी कान पूर्ण बंद होत नाहीत ना ! त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे कानाडोळा करायचं ठरवूनसुद्धा तसं होत मात्र नव्हतं. त्या बाईंचा फोन झाल्यावर माझ्या शेजारच्या बाईंना त्या समोरच्या बाई एकूणच परिस्थितीबाबत सांगू लागल्या. शेजारच्या बाईंच्या मुलीबरोबरसुद्धा असाच काहीसा प्रकार घडलेला असल्याने त्या त्याचं बोलणं ऐकून घेत होत्या आणि त्याचवेळी स्वतःचा अनुभव पण share करत होत्या. सारखीच घटना घडूनसुद्धा वयोमानानुसार प्रतिक्रियांमध्ये कसा फरक पडत जातो ह्याचा मोठा दाखला त्यावेळी ऐकायला-पहायला मिळत होता. माझ्या शेजारच्या बाईंची वयाची किमान ५५ वर्षे उलटलेली असल्याने त्यांचा बोलण्याचा रोख - 'काय करणार ? मुलीची बाजू पडली' असा होता आणि माझ्या समोरच्या बाई वयाची तिशी उलटलेली असल्याने 'मुली काय रस्त्यावर पडल्या आहेत का ?' असा सवाल करत होत्या !
माझ्या शेजारच्या बाई उठून गेल्यावर मी आणि त्या बाई अशा दोघीच त्या compartment मध्ये शिल्लक राहिलो. अश्या वेळी कितीही नाही म्हटलं तरी एकदा तरी त्या अनोळखी व्यक्ती कडे पाहून हसलं जातं. कोणत्या भावनेने ? माहित नाही. मी त्या बाईंकडे पाहून हसले. त्याबरोबर त्या बाई ते सगळं मला सांगू लागल्या- "माझ्या बहिणीच्या पाठीशी आम्ही भावंडच आहोत. आमच्या वडिलांच्या जाण्यानंतर ह्या जावयाचं विचित्र वागणं वाढलंय. माझी बहिण म्हणजे अगदी साधी. दोन फटके मारले तरी रडत बसेल अशी. घरच्यांना त्रास नको म्हणून आम्हाला काही सांगतही नाही. पदरी तीन वर्षाचा मुलगा आहे आणि तरी divorce साठी हा माणूस मुलासकट तिला गाडीखाली जीव द्यायला सांगतो काय ? बघतेच त्याला. दोन ठिकाणच्या पोलीस स्टेशन मध्ये कम्प्लेंट केलीच आहे , एक वकील पण केलाय. सोडणार नाही असं त्याला. महिला संघटनेची प्रमुख माझी चांगली मैत्रीण आहे. तिला पण सोबत घेतलंय. चांगला मार खायला लावते. आपण मुलीची बाजू म्हणून गप्प बसतो, म्हणूनच माजतात हि माणसं !"
आत्तापर्यंत माझ्यासाठी एका स्त्रीचा तडफदारपणा, कणखरपणा वगैरे गोष्टी इतिहासाच्या, मराठीच्या पुस्तकात म्हणा किंवा किरण बेदी , मेधा पाटकर अश्या स्त्रियांना टी.व्ही.मध्ये बघण्यापर्यंतच मर्यादित होत्या. सुदैवाने एवढ्या तडफेने कोणाशी भांडण्याची वेळ माझी आजी, आई, काकू , मावशी , मामी, बहिण, मी स्वतः किंवा माझ्या चांगल्या परिचयातल्या महिलेवर आली नव्हती. पण आज मी तो 'बाणेदारपणा' याची देही याची डोळा अनुभवला होता...पहिल्यांदाच ! त्यामुळे सामान्य रूप असणाऱ्या त्या असामान्य बाईंची माझ्यावर मोठी छाप पडली. त्यांच्यातली तडफ, तो आवेश, निर्भीडपणा, स्वतःच्या बहिणीसाठी कोणाशीही लढण्याची तयारी आणि हे सगळं स्वतःचा संसार आणि नोकरी सांभाळून ! त्यांची हि धडपड निश्चितच कौतुकास्पद आणि भारावून टाकणारी होती. त्यांचं नुसतं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या. त्या उतरण्यासाठी उठत होत्या. शेवटी न रहावून मी त्यांना म्हटलं - "तुम्ही हि जी सगळी खटपट करताय तुमच्या बहिणीसाठी त्यासाठी तुम्हाला hats off ! आजकाल अनेकदा ट्रेन मध्ये उभ्या असलेल्या एखाद्या बाईला चक्कर आली, तर तिला पाणी द्यायचं सोडून "सीट साठी आजकाल काहीही करून दाखवतात" अशी कुजबूज ऐकू येते. अशा परिस्थितीत तुमचे हे प्रयत्न खरंच वाखाणण्याजोगे आहेत. तुम्ही ज्या ह्या चांगल्या गोष्टीसाठी एवढं लढताय त्यासाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा !". ह्या एक- दोन वाक्यांमुळे त्या बाईंच्या चेहऱ्यावरचा 'कोणीतरी आपल्याला ऐकून घेतंय' ह्या जाणीवेने झालेला आनंद अतिशय समाधानकारक होता - त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठीही ! आणि आपसूकच त्यांचाच हात आधी पुढे आला माझ्याकडून त्या शुभेच्छा 'हातोहात' स्वीकारण्यासाठी !
ह्यावेळी एक गोष्ट निश्चितच जाणवली की मदत आपण फक्त 'ऐकूनही' करू शकतो. १५ मिनिटांपूर्वी त्या बाई आणि माझा काही काडीमात्र संबंध नसताना मी फक्त 'हो - नाही' अशी मान डोलावल्याने त्यांना झालेला आनंद हा त्यांच्यासाठी अवर्णनीय होता पण तरीही मला तो नीट जाणवला. उपकार म्हणून ११/- देऊन मंडळाची पावती फाडायला लावून कार्यकर्त्यांना 'कृत्रिम-वरवरची' मदत करण्यापेक्षा हि अशी मनापासून मदत करणं मला फार आवडलं !
दुसरी एक गोष्ट त्यांच्याकडून शिकायला मिळाली ती म्हणजे 'पांढरपेशा समाजात' राहून मोठमोठ्या philosophies झाडणं सोपं असतं पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची वेळ आली की संदीप खरेंच्या - "मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही !" ह्या ओळी आचरणात आणल्या जातात आणि आपण "जाउंदे ना !" म्हणून सोडून देतो. पण ह्या बाई जेमतेम graduate असतील असं वाटत होतं. तरीसुद्धा एखाद्या 'हिरकणी' सारख्या मोहीम लढवत होत्या त्या आणि म्हणूनच एकीकडे so called "buisness school" ची theory वाचत असताना त्या बाईंचा "practical experience" मला जास्त आकर्षित करून बरंच काही शिकवून गेला....फक्त एका अनुभवातून; बरंच काही !
kyaa baat he!!!!keep it up!!
ReplyDeletethank u :)
ReplyDeleteSunder
ReplyDelete