सध्या लोकांकडे बराच वेळ आहे. त्यामुळे कित्येक लोक स्वयंपाकाशी संबंधित आपल्या सगळ्या हौशीमौजी भागवण्यात गुंतले आहेत. कोणी काही नवीन पदार्थ शिकतंय, तर कोणी ज्यावर हात बसलाय असे पदार्थ आपल्या घरच्यांना करून खाऊ घालतंय. एकंदरीतच काय तर सध्या सोशल मिडियावरच्या पोस्ट आणि स्टोरीज चमचमीत पदार्थांपासून ते dalgona coffee पर्यंत सगळ्या पदार्थांनी भरलेल्या आहेत.
मित्रांनो, मला लोकांच्या उत्साहाचा पूर्ण आदर आहे. खरं पाहता प्रत्येक जण आपापल्या घरी स्वकष्टांनी सगळं करून खातोय. त्यामुळे मला बोलण्याचा अधिकार नाही. पण सद्य परिस्थितीत आपण सगळे एकत्र आहोत असं आपण सारखं ऐकतो, वाचतो आणि मानतोही. त्यामुळे याच आपुलकीच्या अधिकाराने एक विचार मनात आला तो शेअर करते.
मित्रांनो, आपल्याला जी सक्तीची सुट्टी मिळालीये ती मजा करण्यासाठी नव्हे. आपल्या हौसेचा पूर्ण आदर राखत एक विनंती करावीशी वाटते, की सध्या जिभेची ईच्छा पूर्ण करण्यापेक्षा आपण कमीत कमी अन्नघटकांमध्ये पोटाची भूक भागवली जाईल, असे पदार्थ करण्याकडे भर देऊया. साग्रसंगीत पिझ्झा, पास्ता, पावभाजी किंवा तत्सम इतर कुठलेही चमचमीत पदार्थ ही आपली सध्याची गरज नसावी. त्यापेक्षा आमटी, पिठलं, भात, खिचडी, पुलाव, पोळ्या, भाकऱ्या, साध्या भाज्या अशा पदार्थांना प्राधान्य दिलं पाहिजे.इतर वेळी अर्धा लिटर दुधामध्ये सगळ्यांचा दोन वेळचा चहा होत असेल तर केवळ पोस्ट टाकण्यासाठी एकाच वेळी अर्धा लिटर दूध संपावणाऱ्या dalgona coffee चा अट्टाहास सध्या नको. कारण जितके जास्त पदार्थ आपण एका वेळी वापरू, तितके लवकर घरातले पदार्थ संपतील आणि तितक्यांदा आपल्याला सारखं बाहेर पडावं लागेल किंवा घरी सामान मागवावं लागेल. यापैकी कुठलाही ऑप्शन हा कोरोनाचा संसर्ग वाढवण्याला हातभार लावू शकतो. इतर वेळी आपण जिभेचे आणि मनाचे लाड पुरवतोच की! त्यामुळे चंगळ थांबवून गरज भागवण्याकडे आत्ता भर दिला पाहिजे आणि घरात आहे ते सामान जास्तीत जास्त दिवस कसं पुरवता येईल याची मॅनेजमेंट आत्तापासून केली पाहिजे. बाजारातल्या गोष्टीसंपून परिस्थिती बिकट होण्याआधीच.
काही जण म्हणतील की आमच्यासाठी cooking ही पॉझिटिव्हिटी निर्माण करणारी गोष्ट आहे किंवा passion, मेडिटेशन आहे वगैरे. अशा लोकांचाही मनापासून आदर आहे. पण सध्याच्या परिस्थितीत एखाद वेळेला exclusive पदार्थ करून तिथे थांबायचं की रोज स्वतःला कमीत कमी पदार्थांत जास्तीत जास्त चविष्ट अन्न तयार करण्याचं challenge देऊन आनंद साजरा करायचा, हे ज्याचं त्या ने ठरवावं.
आतापर्यंतची कोरोना बाधितांची आकडेवारी पाहता लॉकडाऊन पिरेड हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. असं किती दिवस, आठवडे, महिने सुरू राहील माहिती नाही. असं न होवो अशी मनापासून इच्छा आपण सगळेच करत असलो तरी संकट आलंच तर त्याचा सामना करायची तयारीही एकीकडे करायला हवी आणि जितकी आपली तयारी आपण दाखवू, तितकं संकट कमी होत जाणार आहे. त्यामुळे तुमच्या सोसायटीने, नगरसेवकांनी किंवा इतर सामाजिक संस्थांनी काही गरजेच्या वस्तू आणून द्यायची सोय केली तर त्याचा गैरफायदा कोणी घेता काम नये. 'गरज' आणि 'चैन' यातला फरक लक्षात घेऊन वागुया.
हा विचार मांडत असताना कोणावर टीका करायचा हेतू नाहीये. कारण प्रत्येक घरात केलेली अन्नाची साठवण, माणसांची संख्या आणि त्यानुसार एका वेळच्या अन्नाची लागणारी गरज ही वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे आपापल्या घरातल्या एकूण परिस्थितीप्रमाणे प्रत्येकाने 'गरजेचा' मापदंड ठरवण्याची ही वेळ आहे.
जर आपण एकीची भावना निर्माण व्हावी म्हणून खिडक्या-दारांमध्ये येऊन थाळीनाद करू शकतो आणि दिवे लावू शकतो, तर त्याच एकीच्या भावनेने आपापल्या स्वयंपाकघरात रोजच्या जेवणाची मॅनेजमेंट करून एकमेकांची मदत आणि सुरक्षा नक्कीच करू शकतो. बघा पटलं तर..