'निमित्तां'चं महत्व आयुष्यात फार आहे. म्हणजे जगात एका वेळी कोट्यावधी गोष्टी घडत असतात. कुठल्यातरी निमित्तामुळे आपलं लक्ष एखाद्या मुद्द्याकडे किंवा गोष्टीकडे वेधलं जातं. त्याहीपलीकडे जाऊन असं म्हणावसं वाटतं की त्या गोष्टी २४ x ७ x ३६५ आपल्या आयुष्याचा भाग असल्या तरी एखाद्या निमित्ताने त्यांचं अस्तित्व अधोरेखित केलं जातं. पण एक गंमत आहे. माणूस हा मुळातच उत्सवप्रिय प्राणी असल्यामुळे बहुतेकदा निमित्ताने एखाद्या गोष्टीची आठवण करून दिली तरी आपण त्या गोष्टीच्या चांगल्या बाजूकडे लक्ष देतो आणि तिथेच थांबतो. पण मला असं वाटतं की सतत उलथापालथ होत असलेल्या या महाकाय जगात कुठल्या तरी निमित्ताने एखाद्या बारीकशा गोष्टीकडे आपलं लक्ष वेधलं गेलंच आहे, तर उत्सव करून झाला की त्या गोष्टींचा सर्वांकष विचारही करावा. प्रगतीसाठी. तसंच आज केलंय थोडं स्वपरीक्षण...मराठी भाषेबद्दल. गेल्या वर्षी मराठी भाषेला पत्र लिहिलं होतं छोटंसं. पण या मागच्या वर्षभरात त्या मानाने लिखाण तसं थोडं कमी झालं. अलीकडेच एक दिवस अचानक लक्षात आलं की त्या दरम्यान वाचत असलेलं पुस्तक, पाहत असलेली वेबसिरीज आणि त्या क्षणी ऐकत असलेलं गाणं हे सगळं इंग्रजी होतं. शिवाय दिवसभरात कामाच्या निमित्ताने बोललं जाणारं इंग्रजी वेगळंच. इंग्रजी बरोबर शिवाय आजुबाजूला हिंदी, गुजराती आणि मराठी या भाषाही बोलल्या जातात. त्यामुळे सध्या भाषांची सरमिसळ बऱ्यापैकी होत्ये, किमान बोलताना तरी एक मराठी भाषाप्रेमी म्हणून थोडी काळजी वाटावी इतकी नक्कीच ! कुठल्या एका विशिष्ट भाषेबद्दल आकस अजिबात नाही. प्रत्येक भाषा ही स्वतंत्र आहे आणि प्रत्येकीचं, प्रत्येकासाठी महत्व वेगळं आहे. फक्त या दिवसाच्या निमित्ताने ज्यांना कुणाला अशी थोडीशी काळजी वाटत्ये आपलीच, त्यांनी स्वतःला थोडीशी आठवण करून देऊया प्रयत्नपूर्वक आपल्या प्रमाण मराठी भाषेची जपणूक करण्याची. मराठी भाषा दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !
No comments:
Post a Comment