मला टिव्ही बघायची शून्य आवड. बरीच वर्षं झाली टिव्ही रोजच्या जगण्यातून काढून टाकून. त्यामुळे भयंकर सिरियल्स, भयंकर बातम्या, भयंकर जाहिराती यांच्यापासून बराच काळ माझा बचाव मी करून घेत आले आहे. पण सध्या या कोरोना प्रकारामुळे आज बराच वेळ बातम्या बघितल्या गेल्या आणि खरोखर मला भीती वाटली की अजून थोडा वेळ मी हे असंच सुरू ठेवलं, तर नैराश्य येईल की काय! बातम्या बंद केल्या आणि गाणी ऐकायला लागले.
मित्रांनो, आत्ता मला यात दोष कोणाचा या मुद्द्यात अजिबात पडायचं नाहीये. कारण परिस्थिती इतक्या हातघाईवर आलीये की दुसऱ्यांना सुधारण्यापेक्षा आपल्यात बदल करणं सोपं आहे आणि ते जास्त लवकर केले जाऊ शकतायत, असं वाटलं म्हणून हे लिहिते आहे.
आजुबाजूच्या परिस्थितीला underestimate करून चालणार नाहीये किंवा आपण टिव्ही बघितला किंवा नाही बघितला म्हणून परिस्थितीसुद्धा बदलणार नाहीये. पण शारीरिक आरोग्याची काळजी घेत असताना आपलं मानसिक आरोग्य बिघडत नाहीये ना हे आपलं आपण तपासत रहायला हवंय. कितीतरी लोक कोरोनाचा संसर्ग झालाय असं वाटून किंवा त्या भीतीने स्वतःला काहीतरी करून घेतायत. बरेचसे लोक खूप घाबरले आहेत. प्लिज, आपल्या माणसांना आपण समजावूया की भीती वाटणं चुकीचं नाही किंवा त्यात लाज वाटण्यासारखंही काही नाही. Whatsapp, Instagram, facebook, TV वर फिरणारे मेसेज, फोटो, बातम्या या सगळ्यांच्या पचनी पडतीलच असं नाही. प्रत्येकाची मानसिक स्थिती आणि शक्ती वेगळी आहे. पुढे काय होणार आहे माहिती नाही. पण या सगळ्यातून जात असताना एक समाज आणि एक माणूस म्हणून एकमेकांची सर्वतोपरी काळजी घेणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. या एकूण परिस्थितीचा आपल्या मनस्थितीवर वाईट परिणाम होऊ द्यायचा नाहीये. सगळ्या प्रसारमाध्यमांपासून थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घ्या. आपल्या आवडीची गोष्ट करा, घरातल्या माणसांशी 'कोरोना' हा विषय सोडून इतर काहीही बोला, सकारात्मक पुस्तकं वाचा, इ. केल्याने टेन्शन, भीती थोडी कमी होईल. गरज वाटलीच तर मानसोपचारतज्ञांचा सल्ला घ्या.
आज सगळ्या सीमांपालिकडे जाऊन फक्त एक माणूस म्हणून एकमेकांना मदत करायची गरज आहे.
Be positive! Let's hope for the best! Cheers!
No comments:
Post a Comment