Wednesday, January 1, 2020

Thank you 2019 !

    कुठलंही वर्ष संपत आलं की त्या वर्षाला थँक्यू म्हणून संपेपर्यंत एकीकडे नवीन वर्षाकडून आपल्या असलेल्या मागण्यांची यादी वाढायला मनात सुरुवात झालेली असते. पण हे वर्ष माझ्यासाठी खूप खास आहे. त्यामुळे वेळ घेऊन या वर्षाला थँक्यू म्हणणार आहे.

    सगळेच अनुभव काही ना काही शिकवून जातात. एखाद्या अनुभवावर 'बरा' किंवा 'वाईट' हा मारलेला शिक्का हा एखाद्या तळ्याकडे आपण लांबून पाहणं आणि त्याच्या जवळ जाऊन तळाशी काय सापडतंय हे पाहणं यातला जो फरक आहे, तसा काहीसा आहे. २०१९ ने मला काय दिलं असा विचार करताना कुठून सुरवात करू असं होतंय. कारण या वर्षाने माझी मला एक नवी ओळख करून दिली. या वर्षाने मला संयम शिकवला. चांगुलपणा आणि भोळेपणा यात फरक आहे, हे समजावून दिलं. प्रसंगी राग व्यक्त करणं गरजेचं असतं हे शिकवलं. खूप महत्वाचं म्हणजे 'नाही' म्हणायला शिकवलं. जास्तीत जास्त स्वावलंबी व्हायला शिकवलं. आपल्या जवळच्या माणसांची नव्याने ओळख करून दिली. त्यांचं महत्व जाणवून दिलं. आयुष्य लहान आहे! ते शक्य तितकं भरभरून जगून घ्यावं, या पुस्तकी वाक्याची खऱ्या अर्थाने जाणीव करून दिली. मला धीट केलं. स्वतःच्या मतांबद्दल ठाम रहायला शिकवलं. 'लोक काय म्हणतील' हा विचार किती दुय्यम आहे, याची जाणीव करून दिली आणि लोक 'त्यांच्या मतांप्रमाणे' काही ना काही म्हणतच राहतील, याची खात्री करून दिली. अतिशय महत्वाचं म्हणजे स्वतःला महत्व द्यायला शिकवलं. स्वतःचं महत्व जाणून घ्यायला शिकवलं. स्वतःवर, स्वतःच्या गुणांवर विश्वास ठेवायला शिकवलं आणि योग्य त्या वेळी स्वतःला शाबासकी द्यायलाही शिकवलं.

    दुसऱ्या कुणाशी स्पर्धा नाही आणि आदर्शतेची आस नाही, आयुष्यभराचं ज्ञान मिळवून झालं, असा दावा तर अजिबातच नाही. पण माझ्या नजरेत माझ्या लेखी माझी जी काही थोडीशी 'सेल्फ ग्रोथ' झाली, ती घडवण्यास हातभार लावणाऱ्या अनुभवांना आणि माझ्या आप्तेष्टांना मन:पूर्वक धन्यवाद !
२०१९, आजन्म तुझ्या ऋणांत,
- भक्ती


No comments:

Post a Comment