साध्या साध्या गोष्टी एकाच वेळी मनात अनेक विचार पेरून जातात आणि तेव्हा प्रश्न पडतो "काय बाई सांगू ?" काही बहरलेल्या विचारांची हि छोटीशी बाग तुमच्यासमोर आहे...तुमच्या विचारांचं खत घालून माझ्या विचारांना आणखी बहरायला मदत करून ह्या छोट्या बागेचं नंदनवन केलंत तर आनंदच आहे ! :)
Thursday, January 25, 2018
माझं कौतुक !
Saturday, January 20, 2018
शब्दपुष्प..
'रागों से बने धून' कार्यक्रम सुरू आहे. अजयजी रागांतून होणा-या गाण्यांच्या जन्माबाबत सांगतायत, थोडं गातायत, बाकी शिष्यांकडून आणि सहगायकांकडून गाऊन घेतायत. अजयजींची गाणं शिकवण्याची पद्धत दुस-यांदा अनुभवण्याचं भाग्य लाभतंय. यांना ऐकताना आजूबाजूचं सगळं एका जागी स्तब्ध झालंय आणि ही व्यक्ती संगीतासाठी प्राण ओतून काम करत्ये, असं वाटतं आणि वाटतं की यांच्यानंतर, यांच्यासारख्यांनंतर काय? हा आजच्या पिढीबाबतचा अविश्वास अजिबात नाही! परंतू 'उत्तम शिक्षक' आणि 'उत्तम गायक' या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीच्या ठायी असणा-या अनेक व्यक्ती निर्माण झाल्या हव्यात असं मनापासून वाटतं, संगीतावर प्रेम करणारे तयार झाले पाहिजेत असं वाटतं. अजयजींसारखी माणसं सगळ्या गायन प्रकारांपलिकडे, सगळ्या घराण्यांपलिकडे गेली आहेत. हिंदी सिनेमांतली गाणी रागांवर कशी आधारलेली आहेत हे सांगताना ते केवळ शास्त्रीय संगीताच्या श्रेष्ठत्वावर भर देत नाहीत, प्रेक्षकांनी ओत:प्रोत भरलेल्या सभागृहात ते 'मेरे नैना सावन भायो' गाणा-या किशोरदांचंही मोठ्या मनाने कौतुक करतात. पण त्याच वेळी शास्राचं महत्त्व सांगायला विसरत नाहीत. त्यांचा प्रत्येक शब्द म्हणजे नि:स्वार्थी भावाने संगीत सेवेला अर्पण केलेलं पुष्प आहे जणू!
आपल्या मनात रूजलेल्या त्यांच्या शब्दरूपी बीजांचं पुष्पात रूपांतर होण्याच्या प्रतिक्षेत!

Friday, November 24, 2017
पनीर कबाब !
आज कित्येक दिवसांनी पुन्हा त्या नेहमीच्या ट्रेनने गेले. हेडफोन्स घरी विसरले. पनीर कबाब कसे करायचे शिकायला मिळालं !
Wednesday, November 8, 2017
विस्तिर्ण नभाच्या वरती...
कुठे अलगद दडून बसले आकाश सुंदर निळे!
आता विमानाने ब-यापैकी प्रवास झाला. म्हणजे अनेकांच्या तुलनेत संख्येने कमी आहे; पण 'विमानात बसण्याची' माझी हौस फिटली, म्हणून आपलं हे 'I am done' फिलींग. तरी अजुनही विमानाचा प्रवास हवाहवासा वाटतो तो एका वेगळ्या कारणासाठी. मला खूप गंमत वाटते की "एअरपोर्टला चाल्ल्ये" किंवा आम्हां मुंबईकरांना "T2ला चाल्ल्ये" हे सांगणं कसं असं छान प्रेस्टिजियस वाटतं. अर्थात, T2 आहेच तसं. पण विमानाचा प्रवास सुरू झाला की त्या अथांग आकाशाकडे पाहून, त्याचे सतत बदलणारे patterns पाहून, डोळ्यांत, मनांत साठवून घ्यावेत इतके मोहक रंग पाहून माझ्या ताठ झालेल्या अदृश्य कॉलरचा मला विसर पडतो आणि त्या निर्गुणाचं कौतुक करण्यातच माझा वेळ निघून जातो. म्हणजे मी अशी कल्पना करते की पुढे कधी मी कुठूनतरी माझ्याबाबत झालेल्या कौतुकाची पोतडी भरून घेऊन येत असेन विमानातून. मग मी तो वर म्हटल्याप्रमाणे सगळा नजरीया पाहेन. विमानाची खिडकी थोडीशी खाली करेन आणि कोण आहे रे तिकडे, हात करा जरा इकडे अशी दिशाहीन आरोळीवजा ऑर्डर ठोकेन आकाशात. मग पलिकडून एक हात माझ्या विमानाच्या खिडकीच्या दिशेने येईल. मग मी त्या हातात ज्या काही स्वरूपात माझं झालेलं कौतुक घेऊन येत असेन, ते ठेवेन. पलिकडच्यासाठी किंवा इतर कोणासाठीही त्याची किंमत काय असेल माहिती नाही. पण मला मात्र हे केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. पण मला खात्री आहे की पलिकडचा मनाने खूप चांगला असेल. नाहीतर इतक्या विस्तीर्ण, खोल आणि विशुद्ध आभाळाची निर्मिती कशी शक्य होती?!
Saturday, July 8, 2017
चांगुलपणा is the new COOL !
कधी कधी काही व्यक्ती इतक्या चांगल्या भेटतात आपल्याला की कळत नाही की नेमकी ही व्यक्ती खरीच चांगली आहे की हा देखावा आहे? यातल्या काही खरंच अत्यंत शुद्ध चित्ताच्या व्यक्ती असतात. कारण हल्ली आपल्याला कोणी अतिशय चांगलं असण्याची सवयच राहिली नाहीये बहुदा. कोणी खूप चांगलं वागलं की आपल्यातला शंकासूर जागा होतो. पण मोठ्या विश्वासाने आपण आपल्यात चांगुलपणा रूजवायला सुरूवात केली तर हळुहळू विश्वास बसेल आपला लोकांतल्या चांगुलपणावरही!
पण या सगळ्यात 'चांगुलपणा' हे लेबल नेमकं लावायचं कशाला? आपण चांगलं वागतोय की नाही हे तपासायचं कसं ? असे प्रश्न पडतात. सोपं आहे. पुन्हा कधीच भेट होण्याची किंवा संपर्क होण्याची शक्यता नसलेल्या कुणाही अगदी कुणाही व्यक्तीशीसुद्धा आपण चांगले वागतोय का ? हे आपलं आपल्याशीच तपासत राहायचं. बरंं या परीक्षेत प्रश्न विचारणारेही आपणच आहोत आणि उत्तर देणारेही आपणच. त्यामुळे किती प्रामाणिकपणे परीक्षा घ्यायची आणि द्यायची हेही आपणच ठरवायचं ! :)
Wednesday, March 15, 2017
संगीत : राम का गुणगान करिये...
राम का गुणगान करिये,
राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिये
राम का गुणगान करिये॥
राम के गुण गुणचिरंतन,
राम गुण सुमिरन रतन धन,
मनुजता को कर विभूषित,
मनुज को धनवान करिये, ध्यान धरिये॥
राम का गुणगान करिये,
राम का गुणगान करिये॥
सगुण ब्रह्म स्वरुप सुन्दर,
सुजन रंजन रूप सुखकर।
राम आत्माराम,आत्माराम का सम्मान करिये,
ध्यान धरिये,राम का गुणगान करिये॥
कित्येकदा हे गाणं ऐकलं आहे. पण इतके दिवस रामाकडे एका देवत्वाच्या दृष्टिने बघत होते. आज वाटलं की राम दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या सर्वांमध्ये त्याचा अंश आहे. गरज आहे ते प्रत्येकातल्या रामगुणांची ओळख करून घेण्याची. दुस-याठायी असलेल्या रामगुणांचा आदर करून त्याप्रमाणे वर्तन करण्याची. 'राम - आत्मा, आत्माराम का सम्मान करिये' असंही असेल ते कदाचित! जगातल्या चांगूलपणावर माझा प्रचंड विश्वास आहे. आजुबाजूला अनेक दुष्कृत्य घडताना दिसत असली तरी सरसकट 'जगात काही राम उरला नाही' हे लेबल लावायला तयार होत नाही मी. रामराज्य येईल याची आशा कायम आहे! कदाचित इतक्यात नाही, माझ्या उभ्या जन्मात नाही; पण भविष्यात कधीतरी सही! :)
गाणं ऐकताना आणि हे लिहिताना डोळे नेमके कशासाठी पाणावलेत कळत नाहीये! पण अनुभव छान आहे!