Friday, February 16, 2018

आजी !

आज मीच केलेल्या कोशिंबीरीचा पहिला घास खाल्ला आणि आजीची आठवण आली. ती करायची तशी चव झालीये आज अगदी! तिच्या हातची आमटी, ताक-लोणी सगळं आठवलं एकदम. तिच्या त्या छोट्या फुलांचं डिझाईन असलेल्या पांंढ-या शुभ्र साड्या, पोलक्याची छोटीशी घडी करून त्या त्या साडीत ठेवण्याची सवय, घरी असली तरी तिन्हीसांजेला वेणी-फणी करून बसण्याची सवय, लोकसत्तेतलं शब्दकोडं सोडवायचा नित्यक्रम आणि टिव्हीवरच्या आवडत्या मालिकांचे भाग, रिपीट भाग म्हणजे जीव की प्राण! दामिनी, घरकूल पासून कसौटी जिंदगी की पर्यंत सगळ्याच्या स्टो-या मला टिव्ही न बघताच कळायच्या! प्राणीप्रेमही माझ्यात तिच्याकडूनच आलं असावं. अलिबागला आमच्या जुन्या घरातल्या ओटी, पडवी, माजघरात कित्येक मांजरींची बाळंतपणं प्रेमाने केली तिने. आज या कोशिंबीरीमुळे स्वयंपाकघरात कामात असणा-या आजीच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज येतोय की काय असंही वाटून गेलं! असो! आणखी लिहवत नाही! असतात अशी काही समीकरणं जुळलेली...कायमची! 
Miss you आज्जी! 

Thursday, January 25, 2018

माझं कौतुक !


    I have clicked this picture and I liked it ! 😊
    आपण बरेचदा आपल्या प्रयत्नपूर्वक केलेल्या कामाची स्तुती झाली तरी लगेच "छे हो, तुमच्याएवढं छान कुठे जमतं आम्हांला!" म्हणून स्वतःचं स्थान मोजण्यासाठी दुस-याची फूटपट्टी वापरतो किंवा मग "जो है, भगवान की दया से है" म्हणून त्या बिचा-याच्या खांद्यावरून बंदूक चालवतो.
    पण का ना?! एखादा फोटो असतो खरंच प्रयत्नपूर्वक काढलेला, एखादं पेंटिंग असू शकतं आपल्या विचारांतून प्रत्यक्षात आलेलं, असते एखादी घोटलेली मूरकी, असतो कसलेला कमाल अभिनय! घ्यावी की जबाबदारी त्याची, घ्यावं की कौतूक करून आणि मारावी आपल्याच कामाला एक घट्ट मिठी!
    दुस-याच्या लेखी नसेल कदाचित ते तितकं भारी! पण आपलं आपल्याला मिळालेलं समधान असतंयंच की भारी! आधी आपणच आपल्या कामाला आहे तसं स्विकारलं नाही, त्याच्यावर प्रेम केलं नाही तर टीका, सुचना, सल्ले झेलायचं बळ कसं यायचं?!!
    आपलं मन आपल्याला सांगत असतं नेहमी. कधीतरी काम नाही येत छान जमून! पण ते काट मारलेले ड्राफ्टस्, डिलीट केलेले फोटो, वाया गेलेले canvas आपलेच आहेत की! 'ड' तुकडीतल्या मुलांना जीव लावणारा शिक्षकही असतो की! त्या शिक्षकाने त्या मुलाला दिलेली स्विकाराची भावना त्या मुलाला कुठलातरी चांगला विचार देऊन जाते!
    मला तो शिक्षक व्हायचंय. आपल्या सगळ्या कलाकृतींची जबाबदारी घेणारा आणि मग त्यांना अधिकाधिक समृद्ध करणारा!

Saturday, January 20, 2018

शब्दपुष्प..

"अच्छे राग के साथ जब एक अच्छी कविता की शादी होती है, तब अच्छे गाने का जन्म होता है!" इति सुश्री अजय चक्रवर्ती. 
'रागों से बने धून' कार्यक्रम सुरू आहे. अजयजी रागांतून होणा-या गाण्यांच्या जन्माबाबत सांगतायत, थोडं गातायत, बाकी शिष्यांकडून आणि सहगायकांकडून गाऊन घेतायत. अजयजींची गाणं शिकवण्याची पद्धत दुस-यांदा अनुभवण्याचं भाग्य लाभतंय. यांना ऐकताना आजूबाजूचं सगळं एका जागी स्तब्ध झालंय आणि ही व्यक्ती संगीतासाठी प्राण ओतून काम करत्ये, असं वाटतं आणि वाटतं की यांच्यानंतर, यांच्यासारख्यांनंतर काय? हा आजच्या पिढीबाबतचा अविश्वास अजिबात नाही! परंतू 'उत्तम शिक्षक' आणि 'उत्तम गायक' या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीच्या ठायी असणा-या अनेक व्यक्ती निर्माण झाल्या हव्यात असं मनापासून वाटतं, संगीतावर प्रेम करणारे तयार झाले पाहिजेत असं वाटतं. अजयजींसारखी माणसं सगळ्या गायन प्रकारांपलिकडे, सगळ्या घराण्यांपलिकडे गेली आहेत. हिंदी सिनेमांतली गाणी रागांवर कशी आधारलेली आहेत हे सांगताना ते केवळ शास्त्रीय संगीताच्या श्रेष्ठत्वावर भर देत नाहीत, प्रेक्षकांनी ओत:प्रोत भरलेल्या सभागृहात ते 'मेरे नैना सावन भायो' गाणा-या किशोरदांचंही मोठ्या मनाने कौतुक करतात. पण त्याच वेळी शास्राचं महत्त्व सांगायला विसरत नाहीत. त्यांचा प्रत्येक शब्द म्हणजे नि:स्वार्थी भावाने संगीत सेवेला अर्पण केलेलं पुष्प आहे जणू!
आपल्या मनात रूजलेल्या त्यांच्या शब्दरूपी बीजांचं पुष्पात रूपांतर होण्याच्या प्रतिक्षेत! 

Friday, November 24, 2017

पनीर कबाब !

जनरली फिक्स टायमिंगची नोकरी असणाऱ्या लोकांचे ट्रेनमध्ये ग्रुप असतात. आणि एकंदरीतच आयुष्यात लांबचा पल्ला गाठायचं ध्येय असल्याने लग्नाआधी कळवा ते छशि(म)ट आणि नंतर बोरिवली ते चर्चगेट असा प्रवास होता. मला प्रवासाचं टेन्शन नव्हतं पण परदेशात कसं समोरची व्यक्ती ओळखीची असो वा नसो हलकं हसून ते समोरच्या व्यक्तीकडे बघतात आणि ग्रीट करतात. तसं माझंही बहुतांश वेळा होतं. त्यामुळे माझ्या मनात ही भीती होती की रोज तेच तेच चेहरे बघून कितीही प्रयत्न केला तरी अगदी मिनिमम स्मितहास्य तरी उमटेलच माझ्या चेहऱ्यावर आणि मग चक्रीवादळासारखं खेचलं जाईल मला एखाद्या ग्रुपमध्ये. त्यामुळे नोकरीच्या पहिल्या दिवसापासून मी ठामपणे ठरवलं होतं की ट्रेनमध्ये ग्रुप करायचा नाही. काही दिवसांनी बिचाऱ्या माझ्या आईने विचारलं, की ग्रुप वगैरे झाला की नाही ट्रेनमध्ये ? म्हटलं मी होऊच दिला नाहीये ! आई अपेक्षेप्रमाणे म्हणाली अशी कशी गं तू ! पण बाबांच्या डोळ्यांतले ते अभिमानाचे भाव मला आईला माझा विचार पटवून देण्याचं बळ देत होते. मी म्हटलं आई, बटाटा पटकन शिजायला हवा असेल तर काय करावं किंवा समुद्री मेथीचे पराठे कसे करावेत ? पिठलं करताना चण्याच्या पिठाच्या गुठळ्या होऊ न देता स्वादिष्ट पिठलं कसं मॅनेज करावं हे सगळं सांगायला तू आहेस, इंटरनेट आहे आणि अन्नपूर्णा पुस्तक आहे की ! त्यासाठी जातानाचा एक तास आणि येतानाच एक असे दिवसातले दोन तास मी का वाया घालवू ? "अगं असं नाही, उद्या काही मदत लागली, बरं वाटेनासं झालं अचानक तर या बायका करतात मदत!", इति आई. "हो गं, तुझी काळजी काळत्ये मला, पण असं कद्धीतरी शठी सहामाशी एकदा आणि तेही झालं तर होणार आणि त्यासाठी मी माझा इतका वेळ फुकट घालवू ? आणि यू डोन्ट वरी, माझा माझा वेगळा ग्रुप आहे. यातले मेम्बर्स रोज बदलत असतात. कधी लता दीदी, आशाबाई, किशोरीताई, देवकीताई...रोज ग्रुप बदलतो. पण दोघीजणी मात्र कायम माझ्या बरोबर असतात. निरीक्षण शक्ती आणि विचार शक्ती. या दोघी सॉलिड वेळ पाळतात. त्यांची ट्रेन कधीच चुकत नाही. त्यामुळे या दोघी माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणी झाल्यायत ट्रेन मधल्या. मजा येते त्यांच्याबरोबर गप्पा मारायला, कधी गाण्यांबद्दल, कधी सिनेमाबद्दल, कधी चित्रांबद्दल! काही ना काही सुचतंच मला लिहायला यांच्याशी गप्पा झाल्या की. मग नोट्सकरून ठेवते मी मोबाईलमध्ये किंवा कितीतरी वेळा तेव्हाच्या तेव्हा फेसबुक स्टेटस पण टाकते. मज्जा!" हं - आईला खात्री पटली की मुलगी एकटीच प्रवास करत असली चांगल्या संगतीत आहे!
आज कित्येक दिवसांनी पुन्हा त्या नेहमीच्या ट्रेनने गेले. हेडफोन्स घरी विसरले. पनीर कबाब कसे करायचे शिकायला मिळालं !

Wednesday, November 8, 2017

विस्तिर्ण नभाच्या वरती...

तीन दिवस होऊन गेले. पण हे दृश्य काही माझ्या डोळ्यांपुढून जात नाहीये.
विस्तिर्ण नभाच्या वरती, रात्रीचे काजळ काळे,
कुठे अलगद दडून बसले आकाश सुंदर निळे!
आता विमानाने ब-यापैकी प्रवास झाला. म्हणजे अनेकांच्या तुलनेत संख्येने कमी हे; पण 'विमानात बसण्याची' माझी हौस फिटली, म्हणून आपलं हे 'I am done' फिलींग. तरी अजुनही विमानाचा प्रवास हवाहवासा वाटतो तो एका वेगळ्या कारणासाठी. मला खूप गंमत वाटते की "एअरपोर्टला चाल्ल्ये" किंवा आम्हां मुंबईकरांना "T2ला चाल्ल्ये" हे सांगणं कसं असं छान प्रेस्टिजियस वाटतं. अर्थात, T2 आहेच तसं. पण विमानाचा प्रवास सुरू झाला की त्या अथांग आकाशाकडे पाहून, त्याचे सतत बदलणारे patterns पाहून, डोळ्यांत, मनांत साठवून घ्यावेत इतके मोहक रंग पाहून माझ्या ताठ झालेल्या अदृश्य कॉलरचा मला विसर पडतो आणि त्या निर्गुणाचं कौतुक करण्यातच माझा वेळ निघून जातो. म्हणजे मी अशी कल्पना करते की पुढे कधी मी कुठूनतरी माझ्याबाबत झालेल्या कौतुकाची पोतडी भरून घेऊन येत असेन विमानातून. मग मी तो वर म्हटल्याप्रमाणे सगळा नजरीया पाहेन. विमानाची खिडकी थोडीशी खाली करेन आणि कोण आहे रे तिकडे, हात करा जरा इकडे अशी दिशाहीन आरोळीवजा ऑर्डर ठोकेन आकाशात. मग पलिकडून एक हात माझ्या विमानाच्या खिडकीच्या दिशेने येईल. मग मी त्या हातात ज्या काही स्वरूपात माझं झालेलं कौतुक घेऊन येत असेन, ते ठेवेन. पलिकडच्यासाठी किंवा इतर कोणासाठीही त्याची किंमत काय असेल माहिती नाही. पण मला मात्र हे केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. पण मला खात्री आहे की पलिकडचा मनाने खूप चांगला असेल. नाहीतर इतक्या विस्तीर्ण, खोल आणि विशुद्ध आभाळाची निर्मिती कशी शक्य होती?!

Saturday, July 8, 2017

चांगुलपणा is the new COOL !

                   माझा चांगुलपणावर खूप विश्वास आहे हे मी आधीच्याही काही फेसबुक पोस्टमध्ये, ब्लॉग्जमध्ये म्हटलं आहे. तो कसा तर अगदी रोजच्या रूळलेल्या ट्रेनप्रवासात येणाऱ्या अनुभवापासून ते आडगावात केवळ गाडीचा लाईट सोबतीला असताना अनोळखी माणसाबरोबर एका प्रोजेक्टनिमित्त केलेला प्रवास असो, आजवरच्या आयुष्यात तरी चांगुलपणा माझ्या वाट्याला भरभरून आलाय. कधी कधी वाटतं की हा आपल्या नशिबाचा भाग असावा, कधी वाटतं समोरच्याचा उदारपणा असावा पण बरेचदा असं जाणवतं की हा प्रकार वन वे नाहीये, हा 'टू वे कम्युनिकेशन'चा भाग आहे. कम्युनिकेशन शब्दांचं नव्हे; भावनांचं, माणुसकीचं. 'पेरावे तसे उगवते' या उक्तीची प्रचिती घेते मी बरेचदा. वर आडगावाचा उल्लेख केला तो किस्सा सांगते. एका फिल्मच्या रिसर्चसाठी मी कोकणात गेले होते. एका काकांनी त्यांच्या ओळखीच्या सद्गृहस्थाची गाडी माझ्यासाठी बुक केली. या सद्गृहस्थाने दीड दिवस मला त्याच्या गाडीतून आसपासच्या छोट्या छोट्या गावांमध्ये फिरवलं. तिथे जाऊन मी आमच्या फिल्मसाठी आवश्यक ती माहिती घेतली. गावं खरंच खूप छोटी आणि बरीच आत आत होती. म्हणजे एखाद्या गल्लीच्या तोंडाशी आहोत असं वाटावं आणि पुढे गेल्यावर अक्खं गाव वसलेलं दिसावं. बरं, दिवसा ठीके. रात्रीचं काय? रस्त्यावर एकही लाईट नाही. एकावेळी एकच गाडी रस्त्यावरून जाईल इतक्या रूंदीचे रस्ते. दोन्ही बाजूला पाच फूट उंचीची दाटी करून उभी असलेली गवतं. एरवी 'हिरवे हिरवे गार गालिचे' असणारं तेच गवत काळोखाच्या वेळी मात्र उगाच 'काजळ रातीनं ओढून नेला' या गाण्याची आठवण करून देतं. माझंही काहीसं तसं झालं आणि ते या सद्गृहस्थाच्या लक्षात आलं असावं. कारण त्याने लगेच 'मुंबई' या विषयावर गप्पा सुरू केल्या. त्यातही सब-टॉपिक काय होता तर...मुंबईतली महागाई. म्हणजे किती चाणाक्ष असावं एखाद्याने! या महागाईच्या भूतापुढे हा आत्ताचा काळोख ही मुलगी हमखास विसरून जाईल हे या पठ्ठ्याने ओळखलं असावं. पण हे gesture किती सुंदर आहे! त्या दोन तासांच्या प्रवासात आपल्याबरोबरच्या व्यक्तीला comfortable करण्याची गरज कधी आहे हे ओळखून त्यासाठी प्रयत्न करणं! आणि खरं सांगते, त्या अख्ख्या प्रवासात मला एका क्षणासाठीही त्या माणसाबरोबर unsafe वाटलं नाही आणि असं चांगलं वागून त्याला काय मिळणार होतं ? आमची पुन्हा भेट होण्याची शक्यताही दुरापास्तच होतं ! मग याला चांगुलपणा नाही म्हणायचं तर काय! 
               तसंच 'मुंबईची ट्रेन म्हणजे बेक्कार!' असे संवाद आपण बरेचदा ऐकतो! पण ती वापरणारे आणि तिला बेक्कार करणारेही आपणच सगळे असतो ना ! असं असलं तरीही भगवद्गीतेतल्या निष्काम कर्माचा कित्येक वेळा अनुभव मी याच ट्रेनमध्ये घेतलाय, प्रचंड गर्दी असणाऱ्या लोकलमध्ये 'सीट विचारण्यात काही पॉईंटच नाहीये, त्यामुळे उभं राहूया ना यार !' असा आपल्याच एका मनाचा दुसऱ्या मनाशी चाललेला संवाद शेजारच्या बाईच्या मनाला ऐकू येतो. मग आपल्याला 'अहो वाहिनी, हळदी-कुंकवाला आलात आणि डिश न घेताच कशा काय जाऊ शकता ?' या इंटेन्सिटीने बसायचा आग्रह ती बाई करते. तसंच बरेचदा तिसऱ्या सीट वर बसलेल्या बाईला काहीही न बोलता जितकी जागा आहे तेवढ्यात बसणं झेपत असेल तर बसलं आणि आपल्या पायांमुळे कुणाला दोन सीट्सच्या मधनं जाता येत नसेल तर (मनातही) शिव्या-शाप न देता उठलं की तिसऱ्या सीट वरच्या बाईतली निरुपा रॉय जागी होते आणि ती दुसऱ्या साईटवरच्या बाईने केलेली वाकडी तोंडं बघूनही आपल्याला मात्र आणखी थोडी जागा करून देते. हे असं कसं होतं ?!   
        माझे मित्र-मैत्रिणी म्हणतात बरेचदा, तुला जग चांगलंच दिसतं नेहमी. त्या ट्रीपमध्येही त्या माणसाने अशा आडजागी तुला काही केलं असतं म्हणजे? प्रश्न, मतं यांचा भडीमार होतो कधीकधी. त्यांची काळजी चुकीची नसते. पण मला असं वाटतं की त्यावेळच्या vibes आपल्याला कसं वागावं याबाबत गाईड करत असतात आणि आपण प्रेमाने, चांगूलपणाने वागलो तर समोरून बहुतांश वेळा चांगलाच प्रतिसाद मिळतो. पण यात मुख्य वाटा आपल्या कृतीचा आहे. तुम्ही म्हणाल की म्हणजे आजवर कधी वाईट अनुभव आलेच नाहीयेत का तुला ? तर असं नाही. चांगल्या अनुभवांचं मोल वाढवतात वाईट अनुभव. त्यामुळे तेही यायलाच हवेत. पण आपण ती सिच्युएशन कशी हॅण्डल करतो त्यावर आपला त्यावेळचा एकूण अनुभव काय असणारे हे ठरतं ना. समोरच्या 'अरे'ला 'कारे' उत्तर दिल्यानंतर तो प्रसंग पॉझिटिव्ह नोट वर संपू शकणारच नाही! पण तेच जर आपण थोडंसं सामंजस्याने घेतलं तर समोरची व्यक्तीही शांत होऊ शकते. कदाचित् आपल्याकडून प्रेरणा घेऊन रागावलेली व्यक्ती आपल्याकडून चांगलं शिकून जाईल ! 
           मला रँडम विचार येत असतात मनात कधीकधी. तसंच वाटून गेलं की कुठल्याही गॅजेटची किंवा फॅशनची लाट जशी आपल्याकडे पसरत जाते, तशी चांगुलपणाची लाट पसरत गेली तर काय मजा येईल ना! म्हणजे कोणीच कोणाशी भांडत नाहीये, कोणी कोणाला तुच्छ लेखत नाहीये, दान..मग ते कुठल्याही स्वरूपातलं असेल ते गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचतंय, दानशूर व्यक्ती ते चॅरीटी सर्टिफिकेटसाठी नाही तर समाधानासाठी करतायत, वयस्कर व्यक्ती खूप आनंदात आहेत, सगळे त्यांची काळजी घ्यायला तत्पर आहेत, प्रत्येकजण आपला परिसर आपल्या घरासारखा स्वच्छ करतोय, षड्-रिपूंचा कुठे नामोनिशान नाहीये इत्यादी. काय वेगळंच होईल आपलं जगणं, वावरणं ! पण दुसरा करेल याची वाट बघत बसलो की संपलं. आयुष्यात आपण कधीतरी कुठल्यातरी गोष्टीची सुरुवात करूया की ! बाकी आपण धार्मिक चालीरीतींपासून ते तिकिटाच्या रांगेपर्यंत सगळीकडे कुणाला ना कुणाला फॉलोच करत असतो. त्यामुळे चांगुलपणाची फॅशन आपल्यापासून सुरु करूया. आपले फॉलोअर्स तयार होण्यातली गंमत अनुभवूया !
      कधी कधी काही व्यक्ती इतक्या चांगल्या भेटतात आपल्याला की कळत नाही की नेमकी ही व्यक्ती खरीच चांगली आहे की हा देखावा आहे? यातल्या काही खरंच अत्यंत शुद्ध चित्ताच्या व्यक्ती असतात. कारण हल्ली आपल्याला कोणी अतिशय चांगलं असण्याची सवयच राहिली नाहीये बहुदा. कोणी खूप चांगलं वागलं की आपल्यातला शंकासूर जागा होतो. पण मोठ्या विश्वासाने आपण आपल्यात चांगुलपणा रूजवायला सुरूवात केली तर हळुहळू विश्वास बसेल आपला लोकांतल्या चांगुलपणावरही!
       पण या सगळ्यात 'चांगुलपणा' हे लेबल नेमकं लावायचं कशाला? आपण चांगलं वागतोय की नाही हे तपासायचं कसं ?  असे प्रश्न पडतात. सोपं आहे. पुन्हा कधीच भेट होण्याची किंवा संपर्क होण्याची शक्यता नसलेल्या कुणाही अगदी कुणाही व्यक्तीशीसुद्धा आपण चांगले वागतोय का ? हे आपलं आपल्याशीच तपासत राहायचं. बरंं या परीक्षेत प्रश्न विचारणारेही आपणच आहोत आणि उत्तर देणारेही आपणच. त्यामुळे किती प्रामाणिकपणे परीक्षा घ्यायची आणि द्यायची हेही आपणच ठरवायचं ! :)

Wednesday, March 15, 2017

संगीत : राम का गुणगान करिये...

राम का गुणगान करिये,
राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिये
राम का गुणगान करिये॥

राम के गुण गुणचिरंतन,
राम गुण सुमिरन रतन धन,
मनुजता को कर विभूषित,
मनुज को धनवान करिये, ध्यान धरिये॥

राम का गुणगान करिये,
राम का गुणगान करिये॥

सगुण ब्रह्म स्वरुप सुन्दर,
सुजन रंजन रूप सुखकर।
राम आत्माराम,आत्माराम का सम्मान करिये,
ध्यान धरिये,राम का गुणगान करिये॥

कित्येकदा हे गाणं ऐकलं आहे. पण इतके दिवस रामाकडे एका देवत्वाच्या दृष्टिने बघत होते. आज वाटलं की राम दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या सर्वांमध्ये त्याचा अंश आहे. गरज आहे ते प्रत्येकातल्या रामगुणांची ओळख करून घेण्याची. दुस-याठायी असलेल्या रामगुणांचा आदर करून त्याप्रमाणे वर्तन करण्याची. 'राम - आत्मा, आत्माराम का सम्मान करिये' असंही असेल ते कदाचित! जगातल्या चांगूलपणावर माझा प्रचंड विश्वास आहे. आजुबाजूला अनेक दुष्कृत्य घडताना दिसत असली तरी सरसकट 'जगात काही राम उरला नाही' हे लेबल लावायला तयार होत नाही मी. रामराज्य येईल याची आशा कायम आहे! कदाचित इतक्यात नाही, माझ्या उभ्या जन्मात नाही; पण भविष्यात कधीतरी सही! 

गाणं ऐकताना आणि हे लिहिताना डोळे नेमके कशासाठी पाणावलेत कळत नाहीये! पण अनुभव छान आहे!