Monday, November 7, 2011

एका अनुभवातून; बरंच काही !

      
         काल संध्याकाळी ट्रेन मधून जात होते. समोर एक ३०-३५ वर्षे वयाच्या बाई बसलेल्या..अगदी सामान्य...फोन वर बोलत होत्या. त्याचं बोलणं ऐकून मीच थोडी nervous झाले..आणि  जरी नोट्स वाचत असले  तरी कान पूर्ण बंद होत नाहीत ना ! त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे कानाडोळा करायचं ठरवूनसुद्धा तसं होत मात्र नव्हतं.  त्या बाईंचा फोन झाल्यावर माझ्या शेजारच्या बाईंना त्या समोरच्या बाई एकूणच  परिस्थितीबाबत सांगू लागल्या. शेजारच्या बाईंच्या मुलीबरोबरसुद्धा  असाच काहीसा प्रकार घडलेला असल्याने त्या त्याचं बोलणं ऐकून घेत होत्या आणि त्याचवेळी स्वतःचा अनुभव पण share करत होत्या. सारखीच घटना घडूनसुद्धा वयोमानानुसार प्रतिक्रियांमध्ये कसा फरक पडत जातो ह्याचा मोठा दाखला त्यावेळी ऐकायला-पहायला मिळत होता. माझ्या शेजारच्या बाईंची वयाची किमान ५५ वर्षे उलटलेली असल्याने त्यांचा बोलण्याचा रोख - 'काय करणार ? मुलीची बाजू पडली' असा होता आणि माझ्या समोरच्या बाई वयाची तिशी उलटलेली असल्याने  'मुली काय रस्त्यावर पडल्या आहेत का ?' असा सवाल करत होत्या !
       
       माझ्या शेजारच्या बाई उठून गेल्यावर मी आणि त्या बाई अशा दोघीच त्या compartment मध्ये शिल्लक राहिलो. अश्या वेळी कितीही नाही म्हटलं तरी एकदा तरी त्या अनोळखी व्यक्ती कडे पाहून हसलं जातं. कोणत्या भावनेने ? माहित नाही. मी त्या बाईंकडे पाहून हसले. त्याबरोबर त्या बाई ते सगळं मला सांगू लागल्या-  "माझ्या बहिणीच्या पाठीशी आम्ही भावंडच आहोत. आमच्या वडिलांच्या जाण्यानंतर ह्या जावयाचं विचित्र वागणं वाढलंय. माझी बहिण म्हणजे अगदी साधी. दोन फटके मारले तरी रडत बसेल अशी. घरच्यांना त्रास नको म्हणून आम्हाला काही सांगतही नाही. पदरी तीन वर्षाचा मुलगा आहे आणि तरी divorce साठी हा माणूस मुलासकट तिला गाडीखाली जीव द्यायला सांगतो काय ? बघतेच त्याला. दोन ठिकाणच्या पोलीस स्टेशन मध्ये कम्प्लेंट केलीच आहे , एक वकील पण केलाय. सोडणार नाही असं त्याला. महिला संघटनेची प्रमुख माझी चांगली मैत्रीण आहे. तिला पण सोबत घेतलंय. चांगला मार खायला लावते. आपण मुलीची बाजू म्हणून गप्प बसतो, म्हणूनच माजतात हि माणसं !"
        
      आत्तापर्यंत माझ्यासाठी एका स्त्रीचा तडफदारपणा, कणखरपणा वगैरे गोष्टी  इतिहासाच्या, मराठीच्या पुस्तकात म्हणा किंवा किरण बेदी , मेधा पाटकर अश्या स्त्रियांना टी.व्ही.मध्ये बघण्यापर्यंतच  मर्यादित होत्या. सुदैवाने एवढ्या तडफेने कोणाशी भांडण्याची वेळ माझी आजी, आई, काकू , मावशी , मामी, बहिण, मी स्वतः किंवा माझ्या चांगल्या परिचयातल्या महिलेवर आली नव्हती. पण आज मी तो  'बाणेदारपणा' याची देही याची डोळा अनुभवला होता...पहिल्यांदाच ! त्यामुळे सामान्य रूप असणाऱ्या  त्या असामान्य बाईंची माझ्यावर मोठी छाप पडली. त्यांच्यातली तडफ, तो आवेश, निर्भीडपणा, स्वतःच्या बहिणीसाठी कोणाशीही लढण्याची तयारी आणि  हे सगळं स्वतःचा संसार आणि  नोकरी सांभाळून ! त्यांची हि धडपड निश्चितच कौतुकास्पद आणि भारावून टाकणारी होती. त्यांचं  नुसतं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या. त्या उतरण्यासाठी उठत होत्या. शेवटी न रहावून मी त्यांना म्हटलं - "तुम्ही हि जी सगळी खटपट करताय तुमच्या बहिणीसाठी त्यासाठी तुम्हाला hats off ! आजकाल अनेकदा ट्रेन मध्ये उभ्या असलेल्या एखाद्या बाईला चक्कर आली, तर तिला पाणी द्यायचं सोडून "सीट साठी आजकाल काहीही करून दाखवतात" अशी कुजबूज ऐकू येते. अशा परिस्थितीत तुमचे हे प्रयत्न खरंच वाखाणण्याजोगे आहेत. तुम्ही ज्या ह्या चांगल्या गोष्टीसाठी एवढं लढताय त्यासाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा !". ह्या एक- दोन वाक्यांमुळे  त्या बाईंच्या चेहऱ्यावरचा 'कोणीतरी आपल्याला ऐकून घेतंय' ह्या जाणीवेने झालेला आनंद अतिशय समाधानकारक होता - त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठीही ! आणि आपसूकच त्यांचाच हात आधी पुढे आला माझ्याकडून त्या शुभेच्छा 'हातोहात' स्वीकारण्यासाठी  !
       
     ह्यावेळी एक गोष्ट निश्चितच जाणवली की मदत आपण फक्त 'ऐकूनही' करू शकतो. १५ मिनिटांपूर्वी त्या बाई आणि माझा काही काडीमात्र संबंध नसताना मी फक्त 'हो - नाही' अशी मान डोलावल्याने त्यांना झालेला आनंद हा त्यांच्यासाठी अवर्णनीय होता पण तरीही मला तो नीट  जाणवला. उपकार म्हणून ११/-  देऊन मंडळाची पावती फाडायला लावून कार्यकर्त्यांना 'कृत्रिम-वरवरची' मदत करण्यापेक्षा हि अशी मनापासून मदत करणं मला फार आवडलं !
       
    दुसरी एक गोष्ट त्यांच्याकडून शिकायला मिळाली ती म्हणजे 'पांढरपेशा समाजात' राहून मोठमोठ्या philosophies झाडणं सोपं असतं पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची वेळ आली की संदीप खरेंच्या - "मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही !"  ह्या ओळी आचरणात आणल्या जातात आणि आपण "जाउंदे ना !" म्हणून सोडून देतो. पण ह्या बाई जेमतेम graduate असतील असं वाटत होतं. तरीसुद्धा एखाद्या 'हिरकणी' सारख्या मोहीम लढवत होत्या त्या आणि म्हणूनच एकीकडे so called "buisness school" ची theory वाचत असताना त्या बाईंचा "practical experience" मला जास्त आकर्षित करून बरंच काही शिकवून गेला....फक्त एका अनुभवातून; बरंच काही !

Sunday, October 16, 2011

एक eye-opening प्रवास !

 कालच्या एवढा सुखावणारा कळवा-डोंबिवली प्रवास आधी कधीच झाला नव्हता...खरंतर सकाळी १० ला घराबेहेर पडलेले मी कळवा - ठाणे - कुर्ला - कालिना - कुर्ला stn असं करत आता डोंबिवली कडे प्रवास करत होते. त्यात कलिनाच्या traffic ने डोकं उठवलेलं...डोंबिवली लोकल डोळ्यांसमोरून मला टाटा करत गेली त्यामुळे Jab We Met मधल्या करीना सारखी अवस्था झाली माझी...आता fast train साठी bridge चढायचा म्हणजे आणखी कटकट आणि कुर्ल्याला Fast local मध्ये चढायचं हे त्याहून दिव्य ! पण काहीही करून ५.३० पर्यंत गाण्याच्या rehersal साठी डोंबिवलीला पोहोचणं must होतं. गर्दीमुळे एक ट्रेन सोडायला लागल्यावर मोठा निर्धार करून पुढच्या train मध्ये सगळ्यात आधी चढणारी मी होते ! काहीसा अभिमानच वाटला स्वतःचा ! बसायला मिळेल हि अपेक्षा माझ्या मनाला शिवून सुद्धा गेली नाही. थोडे धक्के खात का होईना, without शिव्या-शाप , भांडणं मला उभं राहायला मिळाला इथेच मी भरून पावले. "Fast Train" सुसाट धावत होती. ठाणे cross केल्यावर 'अतिदक्षता' विभागाच्या कर्माचाऱ्याप्रमाणे मी आधीच पुढे जाऊन उभी राहिले ; डोंबिवलीला उतरण्यासाठी म्हणून. कळवा cross केलं आणि मग मेघादूतासाराखा "October Rain" अचानक आपलं दर्शन देऊ लागला आणि माझं पुढचं वाक्य होतं "Oh shit, मी छत्री विसरले  !" पण train पारसिकच्या बोगद्यात शिरली आणि डोंगराने डोळयांच पारणं फेडलं ! काय सुंदर नजारा होता ! वा वा ! 'तू जोरात धावतेस की मी' असं म्हणत काळेभोर ढग ट्रेन शी जणू स्पर्धाच करत होते ! एका शुभ्र ओढणीच्या आडून कोवळ्या वयातल्या मुलीने लाजून 'एखाद्याला' चाहूल द्यावी अश्यागत ते 'जलपटल' वाऱ्याच्या झुळुकी बरोबर अव्याहतपणे पुढे पुढे सरकत होते. 'डोंगर' आणि 'ढगांची' 'black and white chemistry' तर काही औरच होती ! त्या सुंदर वातावरणाचा जास्तीत जास्त अनुभव घेता यावा म्हणून तो वळणावळणाचा रस्ता डोंगराभोवातीच घिरट्या घालत होता. पक्षी एकजुटीने पण स्वच्छंदपणे उडत होते. डोंगरावरची निळी, पिवळी, पांढरी घरं त्या दृश्यावर sparkle colours शिंपडत आहेत की काय असं वाटलं ! आणि अचानक माझ्यातला जुना चित्रकार पुन्हा जागा झाला. त्यावेळी तर तिथे चित्र काढणं शक्य नव्हतं. म्हणून जेवढं साठवता येईल तेवढं ते चित्र मी डोळ्यात साठवून ठेवण्याच्या प्रयत्नात होते. तेवढ्यात असं जाणवलं की शाळेत, drawing class मध्ये मी अनेक चित्र काढली, रंगवली. सगळी काही superclass नव्हती. काही चित्र मला आवडली , काही माझ्या बाईंना , काही शाळेतल्या drawing hall च्या भिंतीवर विराजमान झाली, तर काही खास म्हणून माझ्या file मध्ये मोठ्या प्रेमाने जपून ठेवली गेली...आजच्या समोरच्या दृश्यातले डोंगर, पक्षी , वळणावळणाचा रस्ता , ढग , घरं हे सगळं माझ्या "त्या" चित्रांमध्ये पण होतं ! पण मग आपोआप तुलना केली गेली की चौथीत-पाचवीत काढलेल्या 'त्या' चित्रांमधले डोंगर टोकदार त्रिकोणी होते ; पण 'हा' नाही, 'ते' पक्षी अगदी शिस्तीत रांगेने उडायचे पण हे तर 'free-birds' आहेत; अनेक 'C' एकत्र करून आमचा ढग तयार व्हायचा; पण ह्यांना तर ठराविक आकारच नाही ! हे असं कसं ??? शाळेत चित्राचा एक प्रकार म्हणून free-hand drawing शिकवलं जातं पण "drawing freely म्हणजे तुम्हाला हवं तसं , तुमच्या प्रत्येकाच्या imagination प्रमाणे साचेबद्ध चौकटीच्या बाहेर जाऊन चित्र काढा. तुम्हाला वाटेल तसं पण वाट्टेल तसं नाही !" असं का नाही सांगितलं जात ? असं एक विचार मनाला टोचून गेला. आणि  'Intermediate Drawing Exam मध्ये B Grade' तर आपण मिळवली पण ती चित्र 'काढून'; 'साकारून' नाही ह्याची खंतदायक जाणीव झाली !

Wednesday, October 5, 2011

Newspaper आणि चहा !

       सकाळचा चहा हातात पडायच्या आधी दाराला लावलेला newspaper हातात 'पाडून घेणे' हि माझी "आवडती सवय". बरेचदा पेपर आला की लगेच त्याच्या वाचनासाठी त्यातल्या पुरवण्यांच्या आपापल्या आवडीप्रमाणे निवडी होत असत. पण हल्ली फार दिवसांत असा योग जुळूनच आला नव्हता ! कारण संपादक पेपर छपाई साठी वेळेशी बांधील असले तरी आमचा पेपरवाला नाही ना ! कोण जाणे , कदाचित माझी आणि त्याची "आवडती सवय " सारखीच असावी !...होतं काय, की आल्या आल्या लगेच पेपर वाचला की आपण जगातल्या घडामोडींबाबत इतरांच्या आधी किती updated आहोत ह्याचं समाधान मिळतं (निदान घरातल्या उरलेल्या ३ डोक्यांच्या आधी).

     
       असो....तर सांगायचा मुद्दा असा , की आज कधी नव्हे तो  चहा आणि पेपर हे दोन्ही एकाच वेळी माझ्या हातात पडलं.काल रात्री २.३०-३ वाजेपर्यंत घडलेल्या घटनांबाबत आपण कसे 'सर्वज्ञानी' आहोत याचा feel यायला  हळुहळू  सुरवात झाली. चहाचा पहिला भुरका आणि पेपरची घडी व्यवस्थित उघडून तो वाचण्यासाठी मी एकदम सज्ज झाले.पाहिलं पान अपेक्षेप्रमाणेच "आमच्या software मध्ये इतकेsssss रंग आहेत आणि आम्हांला 'हिरवा हा हिरवा म्हणूनच' छापता येतो' हे जणू बजावून सांगत होतं.

      दुसरं पान होतं नाटकं, सिनेमा, वाद्यवृंद यांच्या updates देणारं. हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. प्रचंड जाहिराती पाहून मनाचा 'सांस्कृतिक कोपरा' सुखावला आणि त्यानंतर कुठे खऱ्या अर्थाने front page चं दर्शन झालं. पहिलीच बातमी कोणीतरी कोणाविरुद्धतरी चालू केल्या जाणार असलेल्या मोहिमेबाबतची... झालं...आधीच 'राजकारण' हा नावडीचा विषय. त्यामुळे मनाचा 'राजकीय कोपरा' म्हणाला, "जाउंदे गं, आमचं हे असंच असतं ! पुढे वाच तू". वाचन सुरु- आंदोलनं... आव्हानं...भाड्यात वाढ...कोकेन घेतल्याचा आरोप निश्चित...जिवंत काडतुसांचा साठा सापडला... ह्यांनी त्यांना डिवचले...नवा वाद...स्फोटात ७० ठार... बालमजूर उत्पादकांमध्ये भारताची आघाडी...धमकी...वरिष्ठांचे दुर्लक्ष... अधिकाऱ्याला लाच प्रकरणी अटक...


      अशा बातम्या वाचत वाचत पुढे जात असताना लक्षात आलं, की २२ पानांच्या पेपराची २ च पानं राहिली वाचायची - क्रीडाविषयक पुन्हा एकदा मनाच्या "playing ground"ने हुश्श केलंआणि पेपर संपला ! तेवढ्यात आई आली - "बघूदे गं पेपर मला ! आज काय विशेष ?" "विशेष ???" - मलाच प्रश्न पडला. काही सांगताच येईना. साधारण ३५ '-ve sense' च्या बाताम्यांमागे ६ '+ve' बातम्या असा ratio  होता (जाहिराती , अग्रलेख , daily informative columns , खेळ , नाटक हे सोडून)...खूप down feeling आलं...तेवढ्यात आई ओरडली - "अग्गंssss चहा हा 'गरम' म्हणून  पिण्यासाठी असतो !" त्याबरोबर मी तो 'थंड चहा' एका घोटात पोटात ढकलला...फक्त तहान भागल्यासारखं वाटलं...पण समाधान झालं नाही....तसंच काहीसं पेपराच्या बाबतीतही !