Saturday, February 15, 2020

A gentle reminder!

Happy Valentine's Day, Bhakti !!!

    कालच मनात एक विचार येऊन गेला, की माणसं आपल्याला आणि आपण माणसांना कुठल्या फेज मधे भेटतो यावर कुणाही; अगदी कुणाही दोन व्यक्तींमधलं equation किती अवलंबून आहे ना ! त्यात आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, बदलणाऱ्या गोष्टी या कुणाही दोन व्यक्तींमधल्या नात्याला खूप वेगवेगळे आकार आयुष्यभर; म्हणजे त्या नात्याचं जितकं काही आयुष्य असेल; त्या काळात सतत वेगवेगळे आकार देत असतात. काही नात्यांची वीण घट्ट होते, काहींची सैल होते, काही नाती तोंडदेखली उरतात, काही विरून जातात. पण एक नातं आयुष्यभर आपल्यासोबत राहतं. आता 'आयुष्यभर' म्हणजे खरंच, जितकं आपलं आयुष्य आहे, तितकं. ते म्हणजे स्वतःचं स्वतःशी असलेलं नातं. पण आपण जितकं दुसऱ्यावर निःस्वार्थी, मनमोकळं प्रेम करतो, तितकं स्वतःवर करतो ? जितका दुसऱ्याच्या बारीक सवयींचा आढावा घेतो, तितकं स्वतःच्या बदलत आलेल्या सवयी, आवडी-निवडींकडे लक्ष देतो ? जितकं सहज बरोबरच्या व्यक्तीला माफ करतो, तितकं स्वतःला करतो ? जितकं दुसऱ्याचं आपल्यावरचं प्रेम टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करतो, तितकं आपलं स्वतःवरचं प्रेम वाढावं यासाठी वेळ काढतो ?

    स्वतःवर प्रेम असणं मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठीही फार महत्वाचं आहे. आपणही कधीतरी emotionally दमू शकतो, चुकू शकतो, नेमकं काय वाटतंय, कशाचं रडू येतंय, कशामुळे negative फिलिंग आलंय हे कळेनासं झालंय असं होऊ शकतं, insecurity वाटू शकते, भीती वाटू शकते. आपण आपल्याबरोबरच्या कुठल्याही व्यक्तीला जेव्हा हे सगळं वाटतं, तेव्हा it's ok असं सहज म्हणून जातो, तीच सहजता आपल्याही हक्काची आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे, मी कायमच बरोबर असं मत असण्याचा फाजील आत्मकेंद्रीपणा अजिबात नाही, पण स्वतःशी थोडं अधिक चांगलं वागायला काय हरकत आहे?! आधी स्वतःला आपलं म्हटल्याशिवाय दुसऱ्याला आपलंस कसं करता यावं ?! Let's remind ourselves to love ourselves as well on this beautiful day!


Wednesday, January 1, 2020

Thank you 2019 !

    कुठलंही वर्ष संपत आलं की त्या वर्षाला थँक्यू म्हणून संपेपर्यंत एकीकडे नवीन वर्षाकडून आपल्या असलेल्या मागण्यांची यादी वाढायला मनात सुरुवात झालेली असते. पण हे वर्ष माझ्यासाठी खूप खास आहे. त्यामुळे वेळ घेऊन या वर्षाला थँक्यू म्हणणार आहे.

    सगळेच अनुभव काही ना काही शिकवून जातात. एखाद्या अनुभवावर 'बरा' किंवा 'वाईट' हा मारलेला शिक्का हा एखाद्या तळ्याकडे आपण लांबून पाहणं आणि त्याच्या जवळ जाऊन तळाशी काय सापडतंय हे पाहणं यातला जो फरक आहे, तसा काहीसा आहे. २०१९ ने मला काय दिलं असा विचार करताना कुठून सुरवात करू असं होतंय. कारण या वर्षाने माझी मला एक नवी ओळख करून दिली. या वर्षाने मला संयम शिकवला. चांगुलपणा आणि भोळेपणा यात फरक आहे, हे समजावून दिलं. प्रसंगी राग व्यक्त करणं गरजेचं असतं हे शिकवलं. खूप महत्वाचं म्हणजे 'नाही' म्हणायला शिकवलं. जास्तीत जास्त स्वावलंबी व्हायला शिकवलं. आपल्या जवळच्या माणसांची नव्याने ओळख करून दिली. त्यांचं महत्व जाणवून दिलं. आयुष्य लहान आहे! ते शक्य तितकं भरभरून जगून घ्यावं, या पुस्तकी वाक्याची खऱ्या अर्थाने जाणीव करून दिली. मला धीट केलं. स्वतःच्या मतांबद्दल ठाम रहायला शिकवलं. 'लोक काय म्हणतील' हा विचार किती दुय्यम आहे, याची जाणीव करून दिली आणि लोक 'त्यांच्या मतांप्रमाणे' काही ना काही म्हणतच राहतील, याची खात्री करून दिली. अतिशय महत्वाचं म्हणजे स्वतःला महत्व द्यायला शिकवलं. स्वतःचं महत्व जाणून घ्यायला शिकवलं. स्वतःवर, स्वतःच्या गुणांवर विश्वास ठेवायला शिकवलं आणि योग्य त्या वेळी स्वतःला शाबासकी द्यायलाही शिकवलं.

    दुसऱ्या कुणाशी स्पर्धा नाही आणि आदर्शतेची आस नाही, आयुष्यभराचं ज्ञान मिळवून झालं, असा दावा तर अजिबातच नाही. पण माझ्या नजरेत माझ्या लेखी माझी जी काही थोडीशी 'सेल्फ ग्रोथ' झाली, ती घडवण्यास हातभार लावणाऱ्या अनुभवांना आणि माझ्या आप्तेष्टांना मन:पूर्वक धन्यवाद !
२०१९, आजन्म तुझ्या ऋणांत,
- भक्ती


Wednesday, November 13, 2019

प्रवास : अमृतसर : गोल्डन टेम्पल

    'गोल्डन टेम्पल'बद्दल खूप ऐकलं होतं. 'रंग दे बसंती'मुळे एकंदरीतच पंजाबच्या कल्चरबद्दल थोडं आकर्षण वाढलं होतं. ए. आर. रेहमानच्या 'इक ओंकार सतनाम'मुळे त्यात मोलाची भर पडली होती. सिनेमातल्या गोष्टी शंभर टक्के खऱ्या मानून त्याला भुलून जाणाऱ्यातली मी नाही. पण एखाद्या गोष्टीबद्दल कुतूहल निर्माण झालंच, तर चांगलंच आहे की ! आता गोल्डन टेम्पल प्रत्यक्षात बघता येणार याचा खूप आनंद होता. पण एकीकडे एक भाबडी भीती होती मनात. मला श्रीमंत आणि ग्लॅमरस देवळांत जाण्यात फारसा रस नसतो. म्हणजे कळत्या वयाप्रमाणे तो रस कमी होत गेला. कारण मला अशा देवळांमध्ये कधीच हवं तितका वेळ शांतपणे मनाचं समाधान होईपर्यंत बसता आलेलं नाही. यात मी देवळांना दोष देत नाहीये, मी कुठेतरी कमी पडले असेन. पण थोडक्यात, याआधी तरी माझं आणि अशा देवळांचं हार्ट-टू-हार्ट कनेक्शन काही झालं नव्हतं. त्यामुळे पुन्हा एकदा हाच अनुभव येणार की काय याची थोडी भीती होती. पण गर्दीतल्या शांततेचा अनुभव मी तिथे घेतला. बरं, बसले कुठे होते, तर झाडाखाली. गाभाऱ्यात गेलेच नाही. मी काहीतरी कदाचित मिस केलं असेन, पण मला जी शांतता अपेक्षित होती, ती आजूबाजूला अनेक माणसं असतानाही मिळाली याचा आनंद आहे. कबीर म्हणतातच की, मोको कहाँ ढूंढें बन्दे, मैं तो तेरे पास में । खरंय !


Monday, February 18, 2019

सिनेमा : आनंदी गोपाळ

    बरेचदा ऐकलंय, माणसं काही कार्यासाठी जन्म घेतात. कार्य झालं की पुढच्या प्रवासासाठी निघून जातात. काल आनंदी बाईंचं आयुष्य पडद्यावर पाहताना मला पहिल्यांदा या विचाराची प्रचिती आली. अवघ्या २२ वर्षांच्या आयुष्यात लग्न, बाळंतपण आणि डॉक्टरेट? त्यांच्या काच-बांगडी खेळायच्या वयापासूनच आयुष्य किती वेगाने बदलत गेेलं! आपली आपल्यालादेखिल हळुहळू ओळख होत असते. पण एखाद्या भावनेशी मैत्री होईपर्यंत ती नाहीशी होऊन नव्या परिस्थितीशी जुळवाजुळव सुरू!

    ज्या बाईने इतक्या कष्टाने स्वत:चं आणि गोपाळरावांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं, त्यांना योग्य वेळी उपचार न मिळाल्याने मृत्यूने गाठावं याहून दुर्दैवं ते काय! पण त्यांचं कार्य स्वत: डॉक्टर होण्यापेक्षाही पलिकडचं होतं. इतर स्रियांना प्रेरित करण्याचं होतं. समाजाची प्राथमिक घडी बसल्यानंतर आपण जन्म घेतलाय, आपल्याला सगळं तयार मिळालंय, म्हणजे आपण किती भाग्यवंत?!

    काळाच्या पुढे विचार करणा-या माणसाला इतरांकडून होणा-या प्रतारणेला सामोरं जावंच लागतं. गोपाळरावांनी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून आपल्या पत्नीने आपल्यापेक्षाही जास्त शिकावं यासाठी त्यांनी घेतलेल्या प्रयत्नांबाबत तर काय बोलावं?!
सिनेमाच्या सगळ्याच बाजू उत्कृष्ट! गोष्टीचा वेग अगदी संयत. सर्वांचा अभिनय अगदी साजेसा! गोष्ट पुढे नेणारं काळाला साजेसं संगीत. संवेदनशील दिग्दर्शन! थोडक्यात सिनेमा अगदी सुरेख आणि प्रेरणादायी!
सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा आवर्जुन पहा!


Monday, November 12, 2018

सिनेमा : '...आणि डॉ. काशीनाथ घाणेकर'

    '...आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' सिनेमा पाहिला. सिनेमा किती उत्तम आहे हे मी काही पुन्हा नव्याने सांगण्याची गरज नाही. पण सिनेमा बघताना मला एका गोष्टीचं वाईट वाटलं ते असं की सोशल मीडिया आणि दूरदर्शनच्या चॅनल्सनी आपण इतके वेढले गेलो आहोत, की त्यामुळे आपल्याकडची कलाकारांविषयीची नाविन्याची भावना थोडी लुप्त झालीये. म्हणजे एखाद्या सुपरस्टारचं आकर्षण कोणाला नसतं, पण चित्रपटाच्या पोस्टरवरचा कलाकार (तेही बहुतेकदा त्या कलाकाराचं पोर्ट्रेट रंगवलेलं, फोटो नव्हेच!) कधीतरीच प्रत्यक्षात बघायला मिळणं, गर्दीतून वाट काढून त्याला सेकंदभरासाठी स्पर्श करता येणं आणि त्यानंतर 'अमुक एका कलाकाराला प्रत्यक्षात बघणाऱ्या काही मोजक्या भाग्यवंतांपैकी आपण एक आहोत' ही निर्माण झालेली कमालीची फिलिंग दुर्दैवाने आमच्या पिढीच्या वाट्याला येणे नाही ! आपण आपल्या आवडत्या कलाकारांना वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, सोशल मीडियावरच्या त्यांच्या पोस्टमध्ये सतत पाहत असतो; इतकंच कशाला 'facebook / instagram live' मधून थेट संवादही साधत असतो. त्यामुळे '#fan moment' ही routine चा भाग झालेली असताना आपण डॉ. काशीनाथ घाणेकरांच्या आजूबाजूच्या गर्दीइतके भाग्यवंत नाही, असं वाटतं. सोशल मीडिया ही आजची गरज आहे, त्यामुळे त्याला दोष देण्याचा अजिबातच उद्देश नाही, फक्त ती 'नवखेपणाची' मजा मिस करत असल्याचं छोटंसं दुःख आहे! 

    लेखक-दिग्दर्शक, कलाकार मंडळी, संगीताची बाजू सांभाळणारे कलाकार, संपूर्ण टेक्निकल टीम आणि या चित्रपटाच्या टीममधला प्रत्येक कलाकार; यांचं अतिशय मनापासून अभिनंदन ! सगळ्यांचीच उत्कृष्ट कामं ! ज्यांनी सिनेमा पहिला नाही त्यांनी बघा, तिकीट मिळालं तर नक्की जा पाहायला ! 


Monday, August 27, 2018

संगीत : ये वो बंधन है जो कभी टूट नही सकता...

    आत्ता नाशिक-मुंबई प्रवास करत्ये. गाणी ऐकता ऐकता 'स्वदेस'मधलं 'ये जो देस है तेरा' गाणं लागलं. माझं फार आवडतं गाणं. आजपर्यंत कितीतरी वेळा ऐकलं. पण गाण्याची ही जादू आहे. ज्यावेळी आपण गाणं ऐकतो, त्यावेळच्या मनातल्या भावनांप्रमाणे ते ते गाणं आपण अनुभवतो. आज रक्षाबंधन. माझ्या भावांना भेटले नाही. खूप मिस करत्ये त्यांना. सगळ्यांचे आपापल्या भावांबरोबरचे फोटो पाहून तर ही भावना शतपटीने दुणावली. मनात हे सगळं उपर-निचे घडत असतानाच, 'ये जो देस है तेरा, स्वदेस है तेरा, ये जो बंधन है वो कभी टूट नहीं सकता!' हे शब्द ऐकत होते. एक विचार आला मनात. वाटलं, देश आपलं रक्षण करतो, आपण या देशाची काळजी घेतो ? त्याच्यावर प्रेम करतो? किती केलं पाहिजे आपण त्याच्यासाठी?

    मला 'रक्षाबंधन' हा सगळ्यांचा सण वाटतो. भाऊ-बहिण हे नातं extra स्पेशल आहेच. पण एकमेकांचं रक्षण करण्याची जबाबदारी, त्यातलं प्रेम हे सगळं भाऊ-बहिण, पुरूष-स्त्री, माणूस-माणूस यांच्या पलिकडे गेलं तर किती छान होईल?! म्हणजे रस्त्यावरच्या कुठल्याही प्राण्यापासून, झाडापासून, पक्ष्यापासून, माणसांपासून ते अगदी वस्तूंपर्यंत. सगळ्यांचं रक्षण करण्याची भावना आपल्यात निर्माण झाली तर किती मजा येईल! आणि रक्षण करण्यासाठी कुठली आपत्ती यायची कशाला वाट बघायला हवीये! रोज एखाद्या रोपाला खत-पाणी घालणं हेही त्याचं रक्षणच आहे की! त्याच्यावरल्या प्रेमापोटी केलेलं ! असं प्रेम निर्माण झालं की किती सोपंय एकमेकांविषयी ही भावना निर्माण होणं! ओघाने आपल्या देशाविषयी! 
Let's respect, love and protect everybody, everything! Happy रक्षाबंधन!


Saturday, August 4, 2018

संगीत : सहेला रे...

    लहानपणी शास्त्रीय संगीत शिकत असताना हळुहळू जेव्हा त्याची व्याप्ती लक्षात येऊ लागली, आपण शास्त्रीय संगीत ऐकलं पाहिजे हे जेव्हा कळू लागलं, तेव्हा एकएका स्वररत्नांची नावं कानावर पडू लागली. त्यातलंच एक नाव गानसरस्वती किशोरीताई आमोणकर. ताईंबद्दल ऐकलं होतं. त्यांचं गाणं अद्वितीय आहे, त्यांनी संगीताबद्दल प्रचंड चिंतन मनन केलं हे सगळं माहिती होत होतं. पण त्यावेळी माझ्या बालबुद्धीकडे त्यांच्या विचारांची व्याप्ती काय असेल याची कल्पना करण्याची शक्ती नव्हती.

    २०११ मध्ये 'पु. लं. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी'मध्ये एका कार्यक्रमाच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी गेले होते. पत्रकारीतेमध्ये बरेचदा असं होतं की तुम्हांला फक्त ठिकाण आणि वेळ सांगितली जाते एखाद्या कार्यक्रमाची. तिथे जाऊन आयत्यावेळी विषय पूर्ण कळल्यावर आपल्या बुद्धीच्या जोरावर पत्रकार शेवटी डेस्कला काय कंटेन्ट आणतो, त्यावरून त्याच्या चतुरस्रतेचा अंदाज येतो. अशीच पत्रकारीतेत नुकतीच प्रवेश केलेली मी त्या प्रेस कॉन्फरन्सला गेले होते. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेममुळे बराच वेळ प्रेस कॉन्फरन्स सुरूच होत नव्हती. सगळे पत्रकार ताटकळत थांबले होते. तेवढ्यात एकदम शांतता झाली. मी दाराकडे पाठ करून बसलेले असल्यामुळे कोणीतरी आलं हे कळलं. पण कोण ते कळेना. आणि बघते तर एखाद्या शाईच्या डोहाचा रंग ल्यालेली टेम्पल बॉर्डर आणि डाळींबी रंगाची साडी नेसलेल्या अतिशय देखण्या किशोरीताई आत आल्या आणि स्थानापन्न झाल्या. त्या दिवशी त्यांनी उच्चारलेलं प्रत्येक वाक्य हे खोल डोहाप्रमाणे होतं. डोहाकडे बघत असताना त्यावरचे तरंग पाहून आपल्याला आनंद होतो, पण डोहाच्या खोलाची व्याप्ती लक्षात घेतली तर काहीतरी नवं गवसतं! त्यांचं बोलणं फार आनंददायी होतं, त्यांचे विचार प्रत्यक्ष ऐकता आले मला, तेही पत्रकारितेच्या सुरूवातीलाच, याहून भाग्य ते काय! आज काही वर्षांचा कामाचा अनुभव गाठीशी घेऊन किशोरीताईंचे जेष्ठशिष्य आणि सुप्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर यांचा कार्यक्रम एनसीपीएमध्ये कत्ये. किशोरीताई आणि मोगुबाई कुर्डीकरांनी रचलेल्या बंदिशी ते सादर करतायत. आज डोहाच्या गाभ्याच्या खोलीचा नुसता अंदाज आलाय, गाभा जाणून घेण्यासाठी किशोरीताईंचं अजून बरंच गाणं ऐकाचंय, आत झिरपवायचंय, कायम प्रयत्न सुरू ठेवेन!
सौजन्य : wikimedia commons