Monday, July 6, 2020

इतर : गुरु

छायाचित्र सौजन्य : www.tinybuddha.com

    'गुरुपौर्णिमे'च्या दिवशी आपले किती गुरु आहेत आणि किती म्हणून आयुष्यात शिकायचं बाकी आहे हे जरा अधिकच प्रकर्षाने मनात अधोरेखित होतं. 'ज्ञानापुढे' आपण खूप लहान असल्याचं जाणवतं. आज सहजच 'गुरु' ही संकल्पना माझ्या मनात कशी घडत गेली याविषयी थोडा विचार केला. त्याविषयी...
.
सुविचार १ : 'माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो'
शाळेत फळ्यावर सगळ्यात वरती सुवाच्च्य अक्षरात रंगीत खडूने रोज एक नवीन सुविचार लिहिलेला असायचा. आता विचार करताना आठवतंय की अक्षर सुवाच्च्य असो किंवा नसो, हे सुविचार नेहमीच माझं लक्ष वेधून घ्यायचे. पण तो सुविचार वाचायचा आणि स्वतःच्या मनाला समजवायचं की 'माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो हं !' यापुढे काही त्या शालेय जीवनातल्या विचारांची उडी जायची नाही. आता वयाचं तिसरं दशक almost संपत आलेलं असताना, आपलं कुटुंब, आपले मित्र-मैत्रिणी, आपले छंद, आपलं शहर, देश यांच्या परे कवेत मावणार नाही इतकं ज्ञान आजमवायचं राहिलंय अजून हे प्रत्येक गाणं ऐकताना, पुस्तक वाचताना, फिल्म पाहताना, नवनव्या लोकांना, जागांना भेटी देताना लक्षात येतं, तेव्हा पटतं की ही 'विद्यार्थीदशा' never ending आहे आणि ती आनंददायक आहे !
.
सुविचार २ : Reading between the lines is very important!
पुन्हा एकदा शाळेचा reference देते. अगदी पहिली ते तिसरीचा. तीन विषय असायचे - भाषा, गणित आणि विज्ञान. गणित आणि विज्ञानापुढे मी कायमच आदरपूर्वक शरणागती पत्करली आहे ती आजतागायत. त्यामुळे मी त्यांना 'buddies' zone मध्ये कधी येऊच दिलं नाही आणि 'भाषा' मात्र पहिल्यापासूनच bff ! त्यातही नुसते धडे वाचून नाही, पण त्या धड्यांवर कधीतरी माझी मैत्रिणींशी किंवा स्वतःशी नकळत चर्चा झाली की धडा खऱ्या अर्थाने 'शिकल्याचं' समाधान मिळायचं ! तेव्हा चर्चेसाठी conscious efforts घेता येऊ शकतात हे मला कळलं असल्याचं स्मरत नाही ! Organically घडतील तेवढ्याच चर्चा व्हायच्या ! 'वाचणं' - 'शिकणं' आणि 'शिक्षक' - 'गुरु' यात फरक आहे हे नंतर उमगलेलं ज्ञान !
.
सुविचार ३ : प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं !
हळुहळू कळत गेलं की शिकण्यासाठी प्रत्यक्ष गुरु समोर असायला हवा असं नाही. समोर असण्यासाठी प्रत्येक गुरु मूर्त रूपात असेलच असंही नाही. प्रत्येक गुरु आपल्यापेक्षा वयाने मोठाच असेल असंही नाही. त्या व्यक्तीला/गोष्टीला आपण त्याला/तिला गुरु मानलंय हे माहिती असेल असंही नाही आणि अमुक एका व्यक्तीकडून/गोष्टीतून/घटनेतून/परिस्थितीतून आपण काहीतरी शिकल्याचं आपल्या प्रत्येक वेळी लक्षात येईल असंही नाही. या सगळ्या माझ्या 'गुरु'विषयी संकल्पनांतून 'Heal the world' म्हणणारा Micheal Jackson ही माझा गुरु होतो. संगीताविषयी सहजतेने बोलणारे अजय चक्रवर्तीही माझे गुरु होतात. एखादं विचार करायला लावणारं आणि त्यातून एखादा विचार मनात रुजवून जाणारं पेंटिंगसुद्धा गुरुस्थानी असू शकतं. निर्व्याज गोष्टी आपल्याला देणारा 'निसर्ग' तर all-time favourite गुरु आहेच आणि इतकंच कशाला, जिथे धड बसायला बाकही नाहीत, अशा शाळेत जेव्हा मी भेट द्यायला जाते, तेव्हा एखादं तिसरी-चौथीतलं मूलही एखादं असं वाक्य बोलून जातं की त्या निरागसतेतूनही बरंच काही शिकता येतं !
.
सुविचार ४ : अहं ब्रह्माsस्मि।
बऱ्याच लोकांना वाटतं की हे वाक्य हे over confidence चं लक्षण आहे किंवा 'स्वतःला काय समजते / समजतो' ही त्यावरची default रिऍक्शन असू शकते किंवा काही लोक त्याला हिंदुत्ववादाचा किंवा धार्मिक touch वगैरे सुद्धा देऊ शकतात किंवा मग स्वतःला किती संस्कृत येतं हे दाखवायचंय, असा एक उथळ विचार सुद्धा यामागे असू शकतो. असो. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना l माझ्यासाठी हे वाक्य self-confidence देणारं वाक्य आहे.
रुईया कॉलेजमध्ये शिकत असताना संस्कृत विषय होता अभ्यासाला पाचही वर्ष. त्यातल्या कुठल्या वर्षी या वाक्याशी ओळख झाली ते नेमकं आठवत नाही. पण ओळख झाल्यापासून या वाक्याने हाच आशय माझ्यापुढे कायम अधोरेखित केला. शब्दश: बघायला गेलं तर या वाक्याचा अर्थ होतो, 'मी ब्रह्म आहे'. आता यापैकी 'ब्रह्म' हा शब्द ते वर सगळे म्हटलं ते अर्थ उपस्थित करतो. पण मला असं वाटतं 'ब्रह्म' म्हणजे 'जग' किंवा 'आयुष्य'. प्रत्येकाचं ब्रह्म वेगळं. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं. आणि प्रत्येकाच्या आयुष्याचा आणि जगाचा कर्ता पण वेगळा. ती व्यक्ती स्वतः. आपण बाहेरच्या जगाकडे उघड्या डोळ्यांनी खूपदा बघतो. पण आपल्या आतल्या space ला तितका वेळ देत नाही, महत्त्व देत नाही. आपल्याकडची बुद्धी, विचारशक्ती, समज वेगवेगळ्या प्रमाणात माणसाला मिळालेली असते. पण इतक्या वर्षांच्या काळात बाहेरून आलेली माहिती आपण आपल्या आत प्रयत्नपूर्वक process करतो, cultivate करतो. त्यामुळे या आपल्या आत असलेल्या शक्तीला-जाणिवेलासुद्धा आजच्या दिवशी योग्य ते महत्त्व दिलं गेलं पाहिजे, तिचं योग्य तितकं कौतुक केलं गेलं पाहिजे, असं मला वाटतं.
.
    बाह्यजगातून अंतरंगात ज्ञान पोहोचवणाऱ्या प्रत्येक घटकाला आणि जाणिवेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी कृतज्ञतापूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार.

No comments:

Post a Comment