Wednesday, June 3, 2020

सिनेमा : Parasite (2019) - The South Korean Film

Parasite (2019) : A film by Bong Joon Ho

    सध्या आपण घरांमध्ये अडकून राहिलो असलो तरी वेगवेगळ्या जगात डोकावून पाहिलं जातंय ते फिल्म्सद्वारे. फिल्मच्या शेवटी हाती फक्त झगमगाट आणि चार सुंदर मुलं आणि मुली पाहून झाले हा विचार देणाऱ्या फिल्म्सपासून ते एखादा विचार नकळतपणे मनावर कोरून जाणाऱ्या फिल्म्सपर्यंत किंवा 'The Blue Umbrella' सारख्या लहान मुलांच्या फिल्मपासून गुप्तहेर खात्याच्या रंजक कथा समोर आणणाऱ्या फिल्म्सपर्यंत सगळं पाहत्ये सध्या. परवा कुठली फिल्म पाहूया म्हणून surfing करत होते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या कंफर्ट झोनच्या बाहेर जाता येतंय का बघूया म्हटलं आणि 'Parasite' ही ब्लॅक कॉमेडी थ्रिलर फिल्म बघायचं ठरवलं. गेल्यावर्षी Cannes Film Festival मध्ये या फिल्मचा प्रीमियर झाला आणि ही या फेस्टिवलमधली पहिली साऊथ कोरियन अवॉर्ड विनिंग फिल्म ठरली. कोरियन भाषा ही अगदीच वेगळी असल्याने इंग्लिश सबटायटल्सचा आधार घेण्यावाचून पर्याय नव्हता. सिनेमाचं कथानक तसं खूप छोटं आणि साधं आहे. पण फिल्म पूर्ण झाल्यानंतर मनात आलेला पहिला विचार हा होता की सगळीकडची माणसं सारखीच असतात. हातात 'सत्ता' असण्याचं माणसाला प्रचंड आकर्षण आहे. कुणासाठी 'सत्ता' हा शब्द फक्त आर्थिक गणितांपुरता मर्यादित असतो तर कुणाला एखाद्या गोष्टीवर, ठिकाणावर, माणसांवर आपलं वर्चस्व निर्माण करून सत्ताधारी असल्याचा आनंद मिळतो.या सिनेमात सब-वे खाली राहणाऱ्या एका गरीब चौकोनी कुटुंबाची गोष्ट आहे. योगायोगाने या कुटुंबातल्या मुलाला एका श्रीमंत घरातल्या तरुण मुलीला इंग्रजी शिकवायची संधी मिळते. त्यानंतर एक-एक करत या गरीब कुटुंबातली चारही माणसं या श्रीमंत कुटुंबात वेगवेगळ्या कामांद्वारे प्रवेश मिळवतात आणि मग पुढे ही फिल्म अतिशय अनपेक्षित वळण घेते. 'मर्यादेयं विराजते' किंवा 'अति तिथे माती' अशा म्हणी फक्त आपल्या संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या नसून त्या मानवी विचारांच्या आणि परिस्थितीच्या घर्षणातून जन्माला येऊन त्या त्या संस्कृतीचा वेश परिधान करून जगभर वावरत आहेत, असं वाटतं आणि जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात इच्छेची जागा हावेने घेतली कि त्याचा अंत हा विनाशकारीच होतो हे पटतं. असे चांगले सिनेमे घरात राहूनसुद्धा आपल्या मनातल्या बंद असलेल्या विचारांच्या खिडक्यांवर ठोठावतात आणि आपलाच आपल्याशी संवाद सुरु करतात. जागरूक करतात. प्रगल्भ करतात.. आणि हे सगळं होतं कारण Lockdown बाहेर आहे, आत नाही !

No comments:

Post a Comment