Wednesday, November 13, 2019

प्रवास : अमृतसर : गोल्डन टेम्पल

    'गोल्डन टेम्पल'बद्दल खूप ऐकलं होतं. 'रंग दे बसंती'मुळे एकंदरीतच पंजाबच्या कल्चरबद्दल थोडं आकर्षण वाढलं होतं. ए. आर. रेहमानच्या 'इक ओंकार सतनाम'मुळे त्यात मोलाची भर पडली होती. सिनेमातल्या गोष्टी शंभर टक्के खऱ्या मानून त्याला भुलून जाणाऱ्यातली मी नाही. पण एखाद्या गोष्टीबद्दल कुतूहल निर्माण झालंच, तर चांगलंच आहे की ! आता गोल्डन टेम्पल प्रत्यक्षात बघता येणार याचा खूप आनंद होता. पण एकीकडे एक भाबडी भीती होती मनात. मला श्रीमंत आणि ग्लॅमरस देवळांत जाण्यात फारसा रस नसतो. म्हणजे कळत्या वयाप्रमाणे तो रस कमी होत गेला. कारण मला अशा देवळांमध्ये कधीच हवं तितका वेळ शांतपणे मनाचं समाधान होईपर्यंत बसता आलेलं नाही. यात मी देवळांना दोष देत नाहीये, मी कुठेतरी कमी पडले असेन. पण थोडक्यात, याआधी तरी माझं आणि अशा देवळांचं हार्ट-टू-हार्ट कनेक्शन काही झालं नव्हतं. त्यामुळे पुन्हा एकदा हाच अनुभव येणार की काय याची थोडी भीती होती. पण गर्दीतल्या शांततेचा अनुभव मी तिथे घेतला. बरं, बसले कुठे होते, तर झाडाखाली. गाभाऱ्यात गेलेच नाही. मी काहीतरी कदाचित मिस केलं असेन, पण मला जी शांतता अपेक्षित होती, ती आजूबाजूला अनेक माणसं असतानाही मिळाली याचा आनंद आहे. कबीर म्हणतातच की, मोको कहाँ ढूंढें बन्दे, मैं तो तेरे पास में । खरंय !


Monday, February 18, 2019

सिनेमा : आनंदी गोपाळ

    बरेचदा ऐकलंय, माणसं काही कार्यासाठी जन्म घेतात. कार्य झालं की पुढच्या प्रवासासाठी निघून जातात. काल आनंदी बाईंचं आयुष्य पडद्यावर पाहताना मला पहिल्यांदा या विचाराची प्रचिती आली. अवघ्या २२ वर्षांच्या आयुष्यात लग्न, बाळंतपण आणि डॉक्टरेट? त्यांच्या काच-बांगडी खेळायच्या वयापासूनच आयुष्य किती वेगाने बदलत गेेलं! आपली आपल्यालादेखिल हळुहळू ओळख होत असते. पण एखाद्या भावनेशी मैत्री होईपर्यंत ती नाहीशी होऊन नव्या परिस्थितीशी जुळवाजुळव सुरू!

    ज्या बाईने इतक्या कष्टाने स्वत:चं आणि गोपाळरावांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं, त्यांना योग्य वेळी उपचार न मिळाल्याने मृत्यूने गाठावं याहून दुर्दैवं ते काय! पण त्यांचं कार्य स्वत: डॉक्टर होण्यापेक्षाही पलिकडचं होतं. इतर स्रियांना प्रेरित करण्याचं होतं. समाजाची प्राथमिक घडी बसल्यानंतर आपण जन्म घेतलाय, आपल्याला सगळं तयार मिळालंय, म्हणजे आपण किती भाग्यवंत?!

    काळाच्या पुढे विचार करणा-या माणसाला इतरांकडून होणा-या प्रतारणेला सामोरं जावंच लागतं. गोपाळरावांनी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून आपल्या पत्नीने आपल्यापेक्षाही जास्त शिकावं यासाठी त्यांनी घेतलेल्या प्रयत्नांबाबत तर काय बोलावं?!
सिनेमाच्या सगळ्याच बाजू उत्कृष्ट! गोष्टीचा वेग अगदी संयत. सर्वांचा अभिनय अगदी साजेसा! गोष्ट पुढे नेणारं काळाला साजेसं संगीत. संवेदनशील दिग्दर्शन! थोडक्यात सिनेमा अगदी सुरेख आणि प्रेरणादायी!
सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा आवर्जुन पहा!