Monday, August 11, 2014

प्रेमाचा जाहीरनामा !


Photo Credits & Copyrights - Nupur Nanal
हाय !

आता आपली पहिली भेट आठवून सॉलिड गंमत वाटते ! हाहाहा ! माझी अत्यंत जवळची मैत्रीण (जी तुझी लंगोटीयार आहे) तुझ्या बरोबर इतकी छान बोलत्ये, इतकी मस्त मैत्री आहे पाहून मला इनसिक्युरिटी, तुझा राग, आश्चर्य, तिच्याबद्दल पझेसिव वाटणं असं काय काय सगळं वाटून गेलं होतं... अंss...४ वर्षांपूर्वी. (नेमकं किती वर्षांपूर्वी हे शोधण्यासाठी मी गुगलवर 'पिपली लाइव्ह' कधी रिलीज झाला होता हे पाहिलं. तारखा लक्षात राहण्याबाबत मला तू कायमच माफ केलं आहेस, त्याबद्दल thanks.) तर, सांगायचा मुद्दा असा की इतके दिवस आधी हाती पत्र लिहून त्याचा फोटो काढणे किंवा ई - मेल द्वारे पत्र लिहिणे यांची जागा आज या 'जाहीरनाम्या'ने घेतली आहे, हे पाहून आपलाच हेवा वाटतोय ! :D 

काही लोक आपलं समोरच्या व्यक्तीवर असलेलं प्रेम व्यक्त करायला कचरतात तर काहींच्या बाबतीत 'प्रेम झालेल्याला अख्खं जग गुलाबी दिसतं', असं म्हणावं इतकं असतं. आपल्याबाबत हे दोनही नाही. "मला तू कित्तीSSS आवडतेस माहितीये का ?" असं म्हणून तू ते व्यक्तही केलंस तर कधी "जाऊदे..मी नाही सांगत" असं म्हणून सोडून दिलंस. वेळप्रसंगी भक्ती, मला तुझी अमुक एक गोष्ट पटत नाहीये, असंही सांगितलंस. बापरे ! लिहायला बसल्यावर आता काय काय आठवतंय ! नाईट आउट साठी भेटून मनात साचलेलं सगळं शेअर करणं, मला आत्ता कंटाळा आला आहे. माझ्याशी थोडावेळ बोल, असं म्हणून दिवसाच्या कुठल्याही वेळी फोनवर तासन तास मारलेल्या गप्पा ! हेच कशाला, मला किंवा तुला एकमेकांचे फक्त नावाने ठाऊक असलेले मित्र - मैत्रिणी पण आपल्या आता इतक्या परिचयाचे झाले आहेत की बघ हं, काही सांगता येत नाही, त्यातल्या कुणाबरोबर तरी मी एखादा सरप्राईज प्लान ठरवू शकेन ! ;) 

तुला तुझ्या आजी - आजोबांची आठवण येत्ये म्हणून मला रडू येऊ शकतं, माझ्या कॉलेजच्या चहावाल्याला तुझा फोन जातो आणि तुमच्या तासन तास गप्पा होतात, तुझी आत्येबहीण आणि मी तुझ्या अनुपस्थितीत फिरायला  जाऊ शकतो, माझी इथली मैत्रीण तिच्या परदेशातल्या मैत्रिणीला अमुक एक पदार्थ आवडतो, तो तिला करून दे असं तुला हक्काने सांगू शकते !! अरे, हे काये ??!!! केवढा आनंद आणि आठवणी आहेत या छोट्या छोट्या गोष्टींत !

हुश्श ! हे लिहित असताना मनातल्या मनात मी ३-४ वेळा आपली दृष्ट काढली आहे! मला छानसं काही तुझ्यासारखं क्रिएटिव्ह सुचत नाही प्रत्येक वेळी ! त्यामुळे म्हटलं पत्रच लिहू तुला आज, पण थोड्या वेगळ्या format मध्ये.

तर ! प्रिय अर्निका परांजपे, हा वरचा फोटो युके मधेच क्लिक केलेला आहे. म्हणून परांजप्यांच्या घरी टेबल वर असं माझं गिफ्ट मी ठेवलंय तुझ्यासाठी, असं ठरवलंय. फोटोतल्या बॉक्समध्ये हा केक आहे आणि बाजूला हेच लेखी पत्र.


अर्निके, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!!! उदंड आयुष्य, यश आणि समाधान लाभो तुला ! जे जे काही हवंय ते ते मिळो, तुझ्याकडून सतत छान लेखन होत राहो, छान छान माणसं भेटत राहोत. आणखी काय लिहू यार ! माझं तुझ्यावर केवढं प्रेम आहे माहितीये का ??!!


छे ! जाऊच दे ! ;)